Wednesday, December 4, 2013

माझ्या प्रेमाचं आता काय होणार



माझ्या प्रेमाचं आता काय होणार हे कळतंच नाही !

ज्या मनाने प्रेमाचं बीज रोवलं
ज्याने त्याचा वृक्ष फुलवला
आज तेच मन मला सांगतंय ---
“तू तुझ्या प्रेमाला विसरून जा !”
मी अचंबीत ...
“काय घडलं?” असं विचारलं तर
म्हणे –
“तुझं तूच शोध,
मला काय हवं आहे,
याचा कधी विचार केलास का तू ?
स्वतःचंच खरं करायचं असतं तुला...
असंच जर वागायचं असेल ना
तर तू विसर तुझ्या प्रेमाला !”

अचानक एवढं टोक .... अजबच आहे !  
माझ्या प्रेमाचं आता काय होणार हे कळतंच नाही !


बुद्धी तर काय याचीच वाट पाहत होती
तिने प्रेमाला शिस्त लावली,
वागण्या-बोलण्याचे नियम लावले नि
मनाला कायमचं खट्टू करून ठेवलं.  
तर्क, मर्म, वर्म नि कर्म या सर्व पातळीवरील
दैनंदिन पृथक्करण, आढावा नि सिंहावलोकन
या गराड्यात मनाला भरडून काढले. 
मनाविरुद्ध तिने आता बंडाचे निशाण फडकावले..
मला सांगते –
“त्या मनाच्या पोकळ गप्पांना भुललास तू ,
मनासक्त प्रेमापेक्षा तू शास्त्रोक्त प्रेम समजून घे,
थोडी अक्कल वापर,
प्रेमासारखी व्यवहार्य, जीवन समृद्ध करणारी गोष्ट तुला मिळवायची असेल
तर मनाचे अव्यवहार्य मार्ग तुला कामाला येणार नाहीत
माझा आधार घे, रचनात्मक भक्कम अशी आखणी कर
जीवनसुत्रांचा प्रभावी वापर कर नि
बघ ...
तुला तुझे प्रेम निश्चित मिळेल!
त्या मनाच्या प्रचंड उर्जेचे, प्रचंड शक्तीचे एवढे काय ते कौतुक ?
माझ्या वापराशिवाय तुला ती कळणारदेखील नाही,
माझा वापर कर, ऐक माझं -
शास्त्रोक्त प्रेम कर
मित्रा, तेच शाश्वत आहे ” 
   
एवढा आत्मविश्वास .... अजबच आहे !
माझ्या प्रेमाचं आता काय होणार हे कळतंच नाही !

त्यात भरीला भर म्हणजे हे शरीर !
ते तर काय सोकावलेलेच आहे
बुद्धी मुक्त वागू देत नाही
मन साथ देत नाही, त्यात
हे संधिसाधू शरीर जिभल्या चाटत म्हणतंय –
“बुद्धीसारखे यम-नियम मी मागत नाही
मनासारखी सोज्वळता, सात्विकता मी मागत नाही
मला काहीही चालते....
भोगाला काही नियम नाही नि सात्विकता लागत नाही
तू फक्त ‘हो’ म्हण ...
एका क्षणात अगणित सुख मी दिले नाही
तर नाव लावणार नाही तुझं ? वचन देतो तुला !
त्या मनासारखं  नि बुद्धीसारखं झुलवत नाही ठेवणार
आपलं कसं सर्व काही “तात्काळ” असतंय !
ते फुकटचं मन आणि त्या दीड दमडीच्या बुद्धीपेक्षा
हे बहुमोल शरीरच तुझ्या आयुष्याचा एकमेव साथी आहे.
ते ‘खास’ क्षण केवळ मीच तुला देवू शकतो...
विसर तू त्या मनाला, विसर तू त्या बुद्धीला
तू तुझ्या प्रेमालाही विसरून जा ! नि  
ये माझ्या बाहुपाशात ....
स्वर्गीय, स्वर्गीय जे तू शोधत आहेस ना
ते याच मिठीत तुला मिळेल... !”
 
एवढी आसक्ती ...  अजबच आहे !    
माझ्या प्रेमाचं आता काय होणार हे कळतंच नाही !

शरीराची मिठी उपभोगण्यासाठी हाथ पसरवले...
इतक्यात...
खाड्कन कानामागे जाळ झाला
मुस्काडीत खाल्ली होती मी !
कोणी मारली हे कळायच्या आत मी खाली आडवा पाडला गेलो
वर पाहतो तर काय ... दस्तुरखुद्द श्रीयुत अहंकार !
नेहमीप्रमाणे याहीवेळी त्यांनी आमच्या उरावर नाचायला सुरुवात केलीदेखील !!
मोठमोठ्याने ओरडून म्हणाले ---
“माझ्यामुळे तुला मन मिळालं,
माझ्यामुळे तुला एवढी बुद्धी प्राप्त झाली,
माझ्यामुळे तुला शरीरसौष्ठव मिळालं,
मीच आहे तो जो तुझं मन, शरीर नि बुद्धी नियंत्रित करतो,
नि तू मला विसरतोस ... तुला शरम नाही वाटत ?
अरे, तुझ्या प्रेमाची भिक तू या तिघांकडे काय मागतोस ?
माझ्याकडे ये ... माझ्याकडे माग
मी तुला काही कमी पडू देणार नाही
मला महत्व दे, मी सांगेन तसंच कर
लक्षात ठेव... गाठ माझ्याशी आहे !  

एवढा आक्रस्ताळेपणा .... अवघड आहे !!
माझ्या प्रेमाचं आता काय होणार हे कळतंच नाही !


मन, बुद्धी, शरीर नि अहंकार या
चांडाळ चौकडीच्या तावडीत माझं प्रेम अडकलंय हो ...
सुटता सुटत नाहीये...!
कधी मनाच्या तर
कधी बुद्धीच्या तावडीत
कधी शरीराच्या तर
कधी अहंकाराच्या तावडीत
तर कधी कधी
एकाच वेळी सर्वांच्या तावडीत
अडकतच चाललंय... अडकतच चाललंय ...!
या प्रत्येकाच्या स्वार्थाने माझं प्रेम अगदी बरबटून गेलंय हो ...
माझ्या डोळ्यासमोर माझ्या प्रेमाचं असं कोमेजून जाणं आता पाहवत नाहीये
माझ्याच मनाने, माझ्याच बुद्धीने, माझ्याच शरीराने नि माझ्याच अहंकाराने
माझ्याच प्रेमाचा असा छळ मांडलाय ...
खरंच ...
माझ्याच प्रेमाचं आता काय होणार हो ?
काही कळत नाही ! 

आणि तो माझा ‘आत्मा’ ....
ज्याच्या भरवशावर एवढा प्रेमाचा खटाटोप केला
तो नेमका ह्यावेळी कुठे गायब झालाय कोण जाणे !
भरवशाच्या आत्म्याला ही चांडाळ चौकडी !
ही सगळी त्याचीच अनौरस पिलावळ !!
नि म्हणे तो अनादी अनंत, निर्गुण निराकार !!??!!
हे माझ्या आत्म्या
त्या ‘परमात्म्या’ वर युगानुयुगे प्रेम करणारा तू ...
जरा त्याच्यावर प्रेम करणं सोड ...
माझ्याही प्रेमाकडे थोडं लक्ष दे !
माणसाने जसा स्वतःपुरता विचार करू नये
तसा माणसाच्या आत्म्यानेही स्वतःपुरता विचार करू नये...
माझं प्रेम खरंच कोमेजून चाललंय रे ...
अन मला ‘काय बी सुधारना’ झालंय ...
मला वेळ दे ... तुझा सहवास दे
सहवासाने प्रेम वाढतं, टिकतं अस ऐकलं होतं
ऐक माझं ...
तू ये ...
...
हलो ...
हलो ...
...
अरे.. हा ऐकतच नाहीये
...
संपलं आता...
...
माझ्या प्रेमाचं आता काहीच होवू शकत नाही !
माझ्या प्रेमाचं आता काहीच होवू शकत नाही !!

Wednesday, August 7, 2013

तू बुम पाव गं

ऊठ ऊठ इकॉनॉमी आई, तूला नवस करीतो आई
                                                      तू बुम पाव गं II

पूर्वेचे लयी थोर, चपट नाकही होयी शिरजोर
पश्चिमेचे सारे चोर, त्यांचा सहन केलाय मुजोर
कोणामागं जावू, कुठवर जावू, काय बी सुधरना आई
जरा मंधी बी ध्यान दे गं आई, तूला नवस करीतो आई
                                                      तू बुम पाव गं II

बाजार पडतोय, रुपया घसरतोय, रोज नवं आर्थिक झेंगाट
पैसा हाय पन लावयचा नाय, आता रोकडींनी भरलं कपाट
धोरणांचं नाव मोठं, अंमलाचं लक्षाण खोटं, रोजचंचं गं हे आई
डोक्यात थोडी अक्कल घाल गं आई, तूला नवस करीतो आई
                                                      तू बुम पाव गं II

शहरं वाढली मोकाट, मोडलंय त्याचं पेकाट
नाजूक त्येंचा जीव, लगेच पसरतंय भोकाड
भूक लयी छोटी, हाव त्याची मोठी, कसं गं जमायचं आई
समतोल साधाया हवा गं आई, तूला नवस करीतो आई
                                                      तू बुम पाव गं II

कोरडा दुष्काळ ह्यो, आम्हा मारून गेलाय
औंदाचा हाय वल्ला, वरून अंदाज आलाय
गुदमरे जीव, येतीया कीव, आता आक्षिजन दे गं आई
एकशेवीस कोटींची आन हाये आई, तूला नवस करीतो आई
                                                      तू बुम पाव गं II

धोरणांची राखू लाज, अमलाचा ठेवू बाज
भ्रष्टाचार नको नको, कष्टाला देवू मान
पैसा वाचवा, पैसा गुंतवा, तुझ्या हाकेला ओ देवू आई 
देशासंगट जगाचं भलं कर आई, तूला नवस करीतो आई
                                                      तू बुम पाव गं II

Saturday, July 27, 2013

सखया

बोल ऐसे जीव्हारी
का बोलसी सखया
प्रेम आहे मनी तरी
का डावली प्रणया  

नाही' सदाचीच उरी
का लादसी सखया
होकाराची चाख गोडी
का सोडिशी प्रणया

इतरांची भीती मनी
का ठेविसी सखया
स्वप्रेमाचा देवून बळी
का मारीशी प्रणया

रे मी प्रेमाची भुकेली
भागव ती भुक सखया
दे प्रेम, घे प्रेम, जीवनी
आता रंगु दे रे प्रणया 

Wednesday, July 17, 2013

प्रेम कर आयुष्यावर !

तू भीती तिच्या पतिव्रताची
तू स्त्रोत तिच्या अपराधीपणाचा
तू अडगळ तिच्या आयुष्याची
तू मरण तिच्या जगण्याचं !

तू प्रेम केलंच नाहीस,
तू आता ते कशाला मागतोस ?
सरणाच्या वाटेवरील प्रेमाला
आता शुक्राणूंची साद का घालतोस ?

एकटेपणा तुला नवा नाही, नि
सोबतीपणा तुला धार्जिणा नाही
एकटेपणाची सोबत कर
तोच तुला धार्जिणा आहे

जगणं थांबवू नकोस
त्याचा अपमान करू नकोस
रडू नकोस, प्रेम कर स्वतःवर
प्रेम कर आयुष्यावर !

Tuesday, July 16, 2013

या दु:खांनो या

या दु:खांनो या
अपेक्षांच्या बाजारात अपेक्षाभंगांना घेवून या
कोमल माझ्या मनास आता, सक्षम करण्यास या
सुधारणेच्या यात्रेतला हा आनंद मोठा करण्यास या
या दु:खांनो या

या द्विधांनो या
बहुविध मार्गांच्या जंजाळात संभ्रमांना घेवून या
गोंधळलेल्या मनास आता, प्रकाशवाटा देण्यास या
सुधारणेच्या यात्रेतला हा प्रकाश लख्ख करण्यास या
या द्विधांनो या

या दुष्टांनो या
विकारांच्या  गर्दीतला उपद्रव सारा घेवून या
विकारी मनास माझ्या, निर्विकार करण्यास या
सुधारणेच्या यात्रेतली ही धिटाई वाढविण्यास या
या दुष्टांनो या


या दुर्दैवांनो या
अगतिक करणाऱ्या नियतीच्या कुचेष्टांना घेवून या
सत्याच्या प्रवासात माझ्या, धीर शिकवण्यास या
सुधारणेच्या यात्रेतला हा दैववाद मारण्यास या
या दुर्दैवांनो या

या साऱ्यांनो या
गगनचुंबी यशास माझ्या जमिनीची धूळ चारण्यास या
उंच फिरणाऱ्या धुंद मनास, माझ्या खोली दाखवण्यास या 
सुधारणेच्या यात्रेतले हे संतुलन कायम टिकवण्यास या

या दु:खांनो या, द्विधांनो या, दुष्टांनो या, या दुर्दैवांनो या !

Saturday, July 6, 2013

प्रवासी

========
प्रवासी
========


आस्तिक म्हणतो ---
"तो आहे , नि मी आहे
तो आहे म्हणून मी आहे
तो नसेल तर मी काहीच नाही
त्याच्यावर माझी श्रद्धा आहे "

नास्तिक म्हणतो ----
"तो नाही, तो मीच आहे,
तो नि मी वेगळा नाहीच
तो नसला म्हणून काय झाले
मी आहे ना !
माझी माझ्यावर श्रद्धा आहे "

आस्तिक नास्तिकाची
ही जुगलबंदी ऐकून
एकजण म्हणाला ----
"अरे, भांडू नका रे असे !
मी सांगतो -
तो ही नाही, तुम्हीही नाही
नी मीही नाही ! कुणीही नाही !! 
जे आहे असे वाटते ते नाहीये
जे नाहीये त्याची केवळ अनुभूती आहे
अनुभूती आहे म्हणजे उगम आहे
हा उगम म्हणजे तो ही नाही,
तुम्हीही नाही नि मी ही नाही,
तो पाचवा असा कुणीतरी आहे की
ज्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही,
पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा
प्रवास आपण सर्व (तो, तुम्ही नि मी ) करू शकतो --
असा प्रवास - ज्याला गंतव्य स्थान नाही
आपण फक्त प्रवास करायचा,
आपण हा प्रवास जगायचा
पाचव्याचा शोध घेत घेत !
माझी या पाचव्यावरही श्रद्धा नाहीये
पण या प्रवासावर माझी नितांत श्रद्धा आहे !!"

हे ऐकून न सापडलेला पाचवा म्हणतो --
"नशीब, एक तरी 'प्रवासी' सापडला !"

---- यम

अव्यक्त

एक होता तो, एक होती ती,
तो होता प्रेमस्वरूप, ती होती प्रेममयी,
ती होती मुक्त, तिचे प्रेम होते ' व्यक्त '
तो मात्र अबोल, त्याचे प्रेम 'अव्यक्त '
त्याचे प्रेम असूनही दिसत नव्हते
तिच्यालेखी त्याच्या मनी प्रेमच नव्हते
अव्यक्त प्रेम तिला कळेना, त्याला बोलते होता येईना
प्रेम असूनही प्रेमाला पारखे ! नियतीला काही पहावेना

नियतीने एक 'हा' तयार  केला !

'हा' केला 'व्यक्त', शब्दांचा पुजारी 
'हा' ला दिली विचारांची खोली 
अलंकृत शब्दांनी 'हा'चे प्रेम नटले
दोन्ही हात पुढे करून 'ती'च्या समोर थाटले

'ती' ला 'हा' भेटला !!

श्रावणसरी घेवून 'हा' ग्रीष्मातही बरसला
'हा'ने स्वप्नांचा ताफा 'ती'च्यापुढे मिरवला
'मुक्त' आणि 'व्यक्त' प्रणय हरेक क्षणी रंगला
प्रेमाला आता स्वर्ग केवळ दोनच बोटे उरला

हे घडूनही 'तो' अजून 'अव्यक्त'च  होता
शाश्वत प्रेमाला 'तो' अजून जपून होता

'ती'चे  प्रेम  फ़ुलत होते, मुक्तपणे विहरत होते
'हा' सोबत नांदत होते, स्वर्गसुख भोगत होते
प्रेमाला प्रेम भेटत होते, पण नियतीला हेही पाहवत नव्हते

तिने पुन्हा डाव साधला !

'हा' चे शब्द संपवले, विचार सारे थकवले
'हा'ला पुरते  रिक्त केले, मुक्त 'ती'ला थांबवले

'ती' आता 'हा' चे प्रेम शोधत  होती
नवल ! ते 'ती'ला सापडलेच नाही !!

आता 'अव्यक्त' होण्याची वेळ 'ती'ची होती !!!
     
'हा' ने केवळ शब्द दिले, विचार दिले
देव नसलेल्या मंदिराचा सोनेरी कळस दाखवला
व्यक्त प्रेमाची फसवी वाट दाखविली
प्रेम दिलेच नाही

'ती' आता 'एकटी' होती,
'ती' आता 'शांत' होती
'ती' आता 'अव्यक्त' होती 

हे घडूनही 'तो' अजून 'अव्यक्त'च  होता
शाश्वत प्रेमाला 'तो' अजूनही जपून होता

'तो' 'ती'च्याकडे गेला,
'ती'च्याजवळ तासंतास बसून राहीला
न बोलता - अव्यक्त !

'शब्देविन संवादु'  होत होता
'ती' आता खऱ्या अर्थाने
'मुक्त' होत होती