माझ्या प्रेमाचं आता काय
होणार हे कळतंच नाही !
ज्या मनाने प्रेमाचं बीज
रोवलं
ज्याने त्याचा वृक्ष फुलवला
आज तेच मन मला सांगतंय ---
“तू तुझ्या प्रेमाला विसरून
जा !”
मी अचंबीत ...
“काय घडलं?” असं विचारलं तर
म्हणे –
“तुझं तूच शोध,
मला काय हवं आहे,
याचा कधी विचार केलास का तू
?
स्वतःचंच खरं करायचं असतं
तुला...
असंच जर वागायचं असेल ना
तर तू विसर तुझ्या प्रेमाला
!”
अचानक एवढं टोक .... अजबच
आहे !
माझ्या प्रेमाचं आता काय
होणार हे कळतंच नाही !
बुद्धी तर काय याचीच वाट
पाहत होती
तिने प्रेमाला शिस्त लावली,
वागण्या-बोलण्याचे नियम
लावले नि
मनाला कायमचं खट्टू करून
ठेवलं.
तर्क, मर्म, वर्म नि कर्म
या सर्व पातळीवरील
दैनंदिन पृथक्करण, आढावा नि
सिंहावलोकन
या गराड्यात मनाला भरडून
काढले.
मनाविरुद्ध तिने आता बंडाचे
निशाण फडकावले..
मला सांगते –
“त्या मनाच्या पोकळ
गप्पांना भुललास तू ,
मनासक्त प्रेमापेक्षा तू
शास्त्रोक्त प्रेम समजून घे,
थोडी अक्कल वापर,
प्रेमासारखी व्यवहार्य,
जीवन समृद्ध करणारी गोष्ट तुला मिळवायची असेल
तर मनाचे अव्यवहार्य मार्ग
तुला कामाला येणार नाहीत
माझा आधार घे, रचनात्मक भक्कम
अशी आखणी कर
जीवनसुत्रांचा प्रभावी वापर
कर नि
बघ ...
तुला तुझे प्रेम निश्चित
मिळेल!
त्या मनाच्या प्रचंड
उर्जेचे, प्रचंड शक्तीचे एवढे काय ते कौतुक ?
माझ्या वापराशिवाय तुला ती
कळणारदेखील नाही,
माझा वापर कर, ऐक माझं -
शास्त्रोक्त प्रेम कर
मित्रा, तेच शाश्वत आहे
”
एवढा आत्मविश्वास .... अजबच
आहे !
माझ्या प्रेमाचं आता काय
होणार हे कळतंच नाही !
त्यात भरीला भर म्हणजे हे
शरीर !
ते तर काय सोकावलेलेच आहे
बुद्धी मुक्त वागू देत नाही
मन साथ देत नाही, त्यात
हे संधिसाधू शरीर जिभल्या
चाटत म्हणतंय –
“बुद्धीसारखे यम-नियम मी
मागत नाही
मनासारखी सोज्वळता,
सात्विकता मी मागत नाही
मला काहीही चालते....
भोगाला काही नियम नाही नि
सात्विकता लागत नाही
तू फक्त ‘हो’ म्हण ...
एका क्षणात अगणित सुख मी
दिले नाही
तर नाव लावणार नाही तुझं ?
वचन देतो तुला !
त्या मनासारखं नि बुद्धीसारखं झुलवत नाही ठेवणार
आपलं कसं सर्व काही
“तात्काळ” असतंय !
ते फुकटचं मन आणि त्या दीड
दमडीच्या बुद्धीपेक्षा
हे बहुमोल शरीरच तुझ्या
आयुष्याचा एकमेव साथी आहे.
ते ‘खास’ क्षण केवळ मीच
तुला देवू शकतो...
विसर तू त्या मनाला, विसर
तू त्या बुद्धीला
तू तुझ्या प्रेमालाही
विसरून जा ! नि
ये माझ्या बाहुपाशात ....
स्वर्गीय, स्वर्गीय जे तू
शोधत आहेस ना
ते याच मिठीत तुला मिळेल...
!”
एवढी आसक्ती ... अजबच आहे !
माझ्या प्रेमाचं आता काय
होणार हे कळतंच नाही !
शरीराची मिठी उपभोगण्यासाठी
हाथ पसरवले...
इतक्यात...
खाड्कन कानामागे जाळ झाला
मुस्काडीत खाल्ली होती मी !
कोणी मारली हे कळायच्या आत
मी खाली आडवा पाडला गेलो
वर पाहतो तर काय ...
दस्तुरखुद्द श्रीयुत अहंकार !
नेहमीप्रमाणे याहीवेळी
त्यांनी आमच्या उरावर नाचायला सुरुवात केलीदेखील !!
मोठमोठ्याने ओरडून म्हणाले
---
“माझ्यामुळे तुला मन
मिळालं,
माझ्यामुळे तुला एवढी
बुद्धी प्राप्त झाली,
माझ्यामुळे तुला शरीरसौष्ठव
मिळालं,
मीच आहे तो जो तुझं मन,
शरीर नि बुद्धी नियंत्रित करतो,
नि तू मला विसरतोस ... तुला
शरम नाही वाटत ?
अरे, तुझ्या प्रेमाची भिक तू
या तिघांकडे काय मागतोस ?
माझ्याकडे ये ... माझ्याकडे
माग
मी तुला काही कमी पडू देणार
नाही
मला महत्व दे, मी सांगेन
तसंच कर
लक्षात ठेव... गाठ माझ्याशी
आहे !
एवढा आक्रस्ताळेपणा ....
अवघड आहे !!
माझ्या प्रेमाचं आता काय
होणार हे कळतंच नाही !
मन, बुद्धी, शरीर नि अहंकार
या
चांडाळ चौकडीच्या तावडीत
माझं प्रेम अडकलंय हो ...
सुटता सुटत नाहीये...!
कधी मनाच्या तर
कधी बुद्धीच्या तावडीत
कधी शरीराच्या तर
कधी अहंकाराच्या तावडीत
तर कधी कधी
एकाच वेळी सर्वांच्या
तावडीत
अडकतच चाललंय... अडकतच
चाललंय ...!
या प्रत्येकाच्या
स्वार्थाने माझं प्रेम अगदी बरबटून गेलंय हो ...
माझ्या डोळ्यासमोर माझ्या
प्रेमाचं असं कोमेजून जाणं आता पाहवत नाहीये
माझ्याच मनाने, माझ्याच
बुद्धीने, माझ्याच शरीराने नि माझ्याच अहंकाराने
माझ्याच प्रेमाचा असा छळ
मांडलाय ...
खरंच ...
माझ्याच प्रेमाचं आता काय
होणार हो ?
काही कळत नाही !
आणि तो माझा ‘आत्मा’ ....
ज्याच्या भरवशावर एवढा
प्रेमाचा खटाटोप केला
तो नेमका ह्यावेळी कुठे
गायब झालाय कोण जाणे !
भरवशाच्या आत्म्याला ही
चांडाळ चौकडी !
ही सगळी त्याचीच अनौरस
पिलावळ !!
नि म्हणे तो अनादी अनंत,
निर्गुण निराकार !!??!!
हे माझ्या आत्म्या
त्या ‘परमात्म्या’ वर
युगानुयुगे प्रेम करणारा तू ...
जरा त्याच्यावर प्रेम करणं
सोड ...
माझ्याही प्रेमाकडे थोडं
लक्ष दे !
माणसाने जसा स्वतःपुरता
विचार करू नये
तसा माणसाच्या आत्म्यानेही
स्वतःपुरता विचार करू नये...
माझं प्रेम खरंच कोमेजून
चाललंय रे ...
अन मला ‘काय बी सुधारना’
झालंय ...
मला वेळ दे ... तुझा सहवास
दे
सहवासाने प्रेम वाढतं,
टिकतं अस ऐकलं होतं
ऐक माझं ...
तू ये ...
...
हलो ...
हलो ...
...
अरे.. हा ऐकतच नाहीये
...
संपलं आता...
...
माझ्या प्रेमाचं आता काहीच
होवू शकत नाही !
माझ्या प्रेमाचं आता काहीच
होवू शकत नाही !!
No comments:
Post a Comment