एक मंदीर,
समुद्र किनारी,
डोंगरमाथ्यावर
भोवतालच्या गर्द झाडीत
लपलेलं,
लाटा, वारा, पक्षी यांचे
नाद कानावर घेणारं !
....
मंदिरास फक्त पाया आणि चार
खांब,
भिंती नाही, घुमट नाही आणि
कळसही नाही.
मंदिरासमोर एक नंदी आणि एक
त्रिशूळ,
सदैव फडफडणारा एक भगवा ध्वज
आणि
मंदिराच्या पायावर मध्यभागी
एक पिंड !
...
पिंडीवर नागोबा आणि
पिंडीत शंकर !
....
बाहेर, निर्मनुष्य नयनरम्य
निसर्ग !
....
बाकी सगळं शांत ! अनाहत !!
अद्वैत !!!
--------------------------------------------------------------
एक मंदीर,
शहराच्यामध्यावरील, टेकडीवर
भोवतालच्या सुपर्ब लॉन आणि प्लीजिंग
लँडस्केपमध्ये लपलेलं,
रेकॉर्डेड आरत्या, गाणी आणि
मंत्रोच्चारांनी न्हावून निघालेलं !
...
मंदिरास संगमरवरी पाया,
संगमरवरी खांब,
संगमरवरी घुमट आणि सोनेरी कळस.
मंदिरासमोर दिमाखदार संगमरवरी
कासव
मंदिराच्या संगमरवरी
गाभाऱ्यात
चकाकणारी लोभसवाणी, संगमरवरी
गणेशमूर्ती !
...
मूर्तीवर मनमोहक सजावट आणि
मूर्तीत चैतन्य !
...
बाहेर
देणगीदारांचे पुतळे,
फ्लेक्स, टाइल्स,
गर्दी, गर्दीत क्लिक्स आणि गर्दीच्या
तोंडात न मावणारे गॉसिप्स !
प्रवेशद्वाराबाहेर दुतर्फा
बहरलेला बिजनेस !!
...
गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात
भक्तांच्या भिकेतून ‘कमावलेली’
एक राईसप्लेट खावून, तृप्त
होवून
गाभाऱ्यातील संगमरवरी
गारव्यावर
निवांत झोपलेला
एक भिकारी
तोच एकमेव शांत ! अनाहत !!
अद्वैत !!!
बाकी सर्वत्र मानवी कोलाहल,
अस्वस्थता, बेचैनी !!
--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर २४, २०१४ .
No comments:
Post a Comment