Tuesday, February 18, 2014

पाया




आमच्या राष्ट्रपित्याचा आदर्शवाद सांगतो -   
वाईट पाहू नका,
वाईट ऐकू नका,
वाईट बोलू नका

आमच्या लोकशाहीचे तीन खांब अजब चालतात -    
न्यायसंस्था काहीच पाहत नाही
सरकार कुणाचे ऐकत नाही
प्रशासनाला बोलू दिले जात नाही

लोकांचा आवाज असलेला चौथा खांब - माध्यमे  -
रोज काहीतरी पाहतात
सदा काहीबाही ऐकतात
तासंतास काहीही बोलतात  

आणि लोक तर पूर्ण गोंधळलेले आहेत - 
      पाहू नये ते पाहत आहेत
      ऐकू नये ते ऐकत आहेत
बोलू नये ते बोलत आहेत

आदर्शवादाचा कळस फार दूर आहे
खांबांची अवस्थाही तशी बिकट आहे
लोकशाही पार मोडकळीला आली आहे

कारण -
ज्यावर हे दोघे उभे आहेत, ते लोक
आणि त्या लोकांनी दिलेला पाया
‘साठी’ ओलांडली तरी कच्चाच आहे !   
 
--- यम (यशवंत महाकाळ)
फेब्रुवारी १८ , २०१४ 


वारस




शिवसेना काय नि मनसे काय, बोलाचीच आहे चुरस 
दोन्ही पक्षात भरला आहे, नुसता आळस एके आळस

धोरणांच्या जागी निघतात, केवळ तोंडातून वाफा
नसलेल्या मुद्द्यांवर गुद्दादेण्या निघे यांचा ताफा

टोल, मराठी, भैय्या, छट यांचेच पडले मनसेला
शिवस्मारक, शिववडा, जैतापूर याशिवाय सुचेना सेनेला

रोगापेक्षा यांचा असतो इलाजच येथे जालीम
बोंबा आणि ठोसा यांची रोजच मिळते तालीम

साहेबांच्या बोंबांमागे सुद्धा होता एक पवित्र उद्धेश
साहेबांच्या गुद्दयात नव्हता कधी नौटंकीचा लवलेश

साहेबांची दिशा स्वतःची, संघटनेची, जनकल्याणाची
शिवसेनेची दिशा सेक्रेटरीची, मनसेची दिशा सरकारची

साहेबांनी घडवल्या प्रेमाने कार्यकर्त्यांच्या पिढ्या,
नि घामाने उभारल्या वेळोवेळी कर्तृत्वाच्या गुढ्या

आता कार्यकर्तेच घडवत आहेत पुढल्या काही पिढ्या
त्या घडवतानाही या नेत्यांच्या कपाळी पडती आढ्या

वारस म्हणवती बाळासाहेबांचे, नसे एकही गुण
प्रदर्शन नि भाषण तेवढे घेतले, कस दिला टाकून

शिवसैनिक घडवणाऱ्या साहेबांनी स्वतःचा वारस घडवला नाही
साहेबांना ‘महाराष्ट्राचे काय होईल?’ असे जराही वाटले नाही !

शिवरायानंतर मावळ्यांनी चालविली, जशी दीड शतके शिवशाही
तशी सेना सैनिकही चालवतील, पण आड येते नेत्यांचीच ठाकरेशाही   

--- यम (यशवंत महाकाळ)
फेब्रुवारी १७ , २०१४ 
 

Friday, February 7, 2014

बदलाच्या बदल्यात बदली



‘शरदा’च्या चार चांदोबांनी, आज दाखविले षंढत्व
पराजित ढोंगी नामर्दांनी, आज हरविले ‘अजित’त्व
‘पृथ्विराजा’च्या संमतीने, जनता भोगी नरकत्व
फुकाचे रे लोकशाहीत्व, फुकाचेच रे पालकत्व !
  
‘श्री-कर’ छाटुनी सर्व, पत्करी अफजुल्याचे पाईकत्व
अतिक्रमणाच्या बदल्यात पाडती लोकशाहीचेच तत्व,
सरकारी वाघनखांनी, पहा, शिवराय मरती रोज 
‘स्वदेशी’ मोगलांनी, सुराज्या, ‘परदेशी’ धाडिले आज       
       
--- यम (यशवंत महाकाळ)
फेब्रुवारी ८, २०१४

(पिंपरी-चिंचवडचे आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशींच्या बदलीच्या निमित्ताने)


Thursday, February 6, 2014

एकल्या मुसाफिरास ...





एकाकी मना रे, का गर्दीची आस तुला ?
एकला जीव रे, एकला रिझव त्याला !

गर्दीने कधी रे, आनंद तुझा मिरवला ?
एकला नाच रे, एकला पसरव त्याला !

गर्दीने कधी रे, दर्द तुझा कवटाळला ?
एकला साही रे, एकलाच मिटव त्याला !

गर्दीने कधी रे, सूर तुझा रे ऐकला ?
एकला लाव रे, सूर एकाकी जीवनाला !

गर्दीने कधी रे, विचार तुझा जाणला ?
एकला गाठ रे, एकल्या त्या सत्याला !

गर्दीस कधी रे, वाट तुझी कळेल का ?
एकला चाल रे, एकल्या तू मुसाफिरा !     
  
--- यम (यशवंत महाकाळ),
फेब्रुवारी ६, २०१४