Tuesday, December 4, 2012

असा त्रास करून घेण्यात काय हशील ?

शरीर हा विषय आपल्याकडे 'बावू' केल्याशिवाय संपत नाही.
प्रत्येकजण त्याची सांगड मन आणि बुद्धीशी चुकीच्या पद्धतीने घालत असतो.
मन आणि बुद्धी यांच्या अस्तित्वाची प्रचिती शरीर देत असले, तरी ते म्हणजे सर्वस्व नाही.
त्याने केलेली प्रत्येक कृती ही मनातून प्रेरणा घेवून,आणि  बुद्धीने नियंत्रण केल्याने घडते.
मनावर कुणाचे नियंत्रण नाही. मन कोणत्या वेळेस काय प्रेरणा घेवून येईल याचा नेम नाही.
कधी ते शरीराद्वारे परमोच्च सुखाचा आनंद देवून जाईल तर
कधी अगदी घृणास्पद, किळसवाणे वाटावे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आणि अनुभूती देवून जाते.
या प्रेरणा कधी आपल्याकडून निर्माण होतात तर कधी दुसऱ्याकडून... !
याच प्रेरणा जशाच्या तशा जर येवून भिडल्या तर पंचाईत होते.
बुद्धी इथे कामाला येते. ती सर्व भावनांवर नियंत्रण आणते.
बुद्धीवर संतुलनाचा संस्कार करत रहावे.
अनियंत्रित मन आणि अतिनियंत्रित शरीर यावर हा संतुलनाचा संस्कार खरेच रामबाण आहे.
मन आणि शरीर दोघेही फार फसवे असतात. त्यांच्या  आहारी जाणे, हे बुद्धी दौर्बल्ल्याचे लक्षण आहे.
विशेष काही घडले नसताना तसे  घडल्याचा उगाच आव आणणे तसेच खूप काही घडून सुद्धा काहीच झाले नाही अशी बतावणी करणे या चुका मन आणि शरीर कायम करीत असते.
म्हणून तर एखादी लहान गोष्ट, एखादा शब्द, एखादे वाक्य खूप त्रास देवून जाते. आणि उलटपक्षी खूप महत्वाची गोष्ट आपण विसरायलाही मागे पुढे पहात नाही.
बऱ्याच लोकांना शरीरापलीकडे काहीही दिसत नाही. तर काहींना मन हेच सर्वस्व वाटते. ही माणसे कायम आजार ओढवून घेतात .... कधी मानसिक तर कधी शारीरिक.
जरा विचार केला तर असे लक्षात येते, की हा फक्त आजारी असल्याचा भास असतो.
गंमत म्हणजे आपण सारे या भासावरच उपाय शोधत राहतो .... कधीच न संपणारा हा शोध असतो...
कारण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिला नष्ट करण्याच्या उपायांचा हा शोध असतो.
मनाला आणि शरीराला बुद्धीची जोड न मिळाल्यामुळे असे होत असते.

इतरांच्या वागण्याने आणि बोलण्याने त्रास करून घेण्यात मजा कधी असते?
जेंव्हा हा त्रास समृद्धीकडे नेणारा असतो तेंव्हा. असा त्रास आपल्याला अभिमानाने मिरवावासा वाटतो.
ज्या वाईट वागण्या, बोलण्याने आपण नकळत अधोगतीकडे प्रवास करतो ... स्वतःला नाहक शिक्षा करून घेतो ....
न स्वतःचा सुधार, न बोलणाऱ्याचे प्रायश्चित्त ... काहीही साध्य होत नाही... !
असा त्रास करून घेण्यात काय हशील ?

No comments:

Post a Comment