Sunday, December 2, 2012

सर, तुम्ही याल ना ..!

सर,
तशी आपली ओळख जुनीच आहे,
शाळेचा पहिला दिवस ... आईचा सुटलेला हात...
तुम्ही पुढे केलेला हात... तुम्ही दिलेला धीर ...
शांत झालेलो आम्ही..... सगळे तसेच्या तसे आठवतेय अजूनही...!

पुढे आपली ही ओळख वाढत गेली...
आम्ही तुम्हाला ... तुम्ही आम्हाला कळू लागलो...
तुम्ही घडवत राहिलात... आम्ही घडत राहिलो...

एके दिवशी अचानक आपली सोबत सुटली...
आमचा पुढचा प्रवास सुरु झाला ... एकटे वाटू लागले...
अडचणी आल्या... धीर खचला...
पण नकळत सोबत आलेल्या 'संस्कार शिदोरी'ने तितक्याच 'नकळत' मदत केली...
पुन्हा उभे राहिलो...
या सगळ्या प्रवासात सर तुमची आठवण नाही आली...

काळ लोटला .... आम्ही मोठे झालो...

आज आम्ही सर्वच आपापल्या कर्तृत्वाने एका उंचीवर आहोत...
आता कधीही धीर खचत नाही...
कितीही मोठी आव्हाने आली तरी घाबरत नाही...
कितीही उंची गाठली तरी पाय जमीन सोडत नाहीत...
हे असे का होते ? .

आम्ही  साहजिकच याची कारणे शोधतो...
नकळत सोबत आलेली 'संस्कार शिदोरी' आता कळायला लागते ...
ती चक्क सर्वात मोठे 'कारण' बनते...
या 'संस्कार शिदोरी'चे कारणही आम्ही शोधतो...
सवयीने आम्ही मूळ शोधतो... खूप मागे जातो..
शाळा आठवते... तुम्ही आठवतात...
साक्षात्कार होतो...
सर, तुम्हीच तिचे 'कारण' ...!

सर, जुनी ओळख आता खऱ्या अर्थाने पटते ...!

आता मात्र तुमची आठवण येणे थांबत नाही...
ती येतच राहते ... येतच राहते ...

सर, आता, रहावत नाही... 
तुम्हाला भेटण्याची प्रचंड इच्छा होतेय ...
तुम्हाला भेटून हे सर्व सांगायचे आहे...
...
जुन्या आठवणींमध्ये पुन्हा रमायचे आहे...
आमचे यश तुमच्या चरणी अर्पण करायचे आहे
तुम्ही लावलेली रोपटी  कशी बहरून आली आहेत हे दाखवायचे आहे...
आणि हो...
पुढील प्रवासासाठी
ती 'संस्कार शिदोरी' पुन्हा मिळवायची आहे...
पुढील पिढ्या तयार करण्यासाठी...!

सर, आपण भेटणार आहोत
हॉटेल रोडास, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई  येथे...!
दुपारी ३ ते ८ या वेळेमध्ये..!
आम्ही मुलांनी एक छानसा सोहळा आयोजित केला आहे ...!

सर, तुम्ही याल ना ..!
नक्की या !!

वाट पाहतोय...!!
  
तुमचीच
'वात्रट' मुले...!

No comments:

Post a Comment