Tuesday, December 18, 2012

कर्मकांड

कर्मामागचा विचार जेंव्हा लुप्त होतो तेंव्हा कर्माचे रुपांतर कर्मकांडात होते.
---- श्री. अविनाश धर्माधिकारी

लोक अनेकदा प्रत्यक्षापेक्षा प्रतिकांचीच पूजा अधिक तन्मयतेने करतात आणि फसतात.प्रत्यक्ष माणसाऐवजी प्रतिकात्मक मुर्तीवरच अधिक प्रेम करतात
जावू द्या !
माणसांचे नशीबच फुटके ! त्याला आपण तरी काय करणार ?

Friday, December 14, 2012

EGO

Ego due to possession of Knowledge is more difficult to crack than ego due to possession of money, because knowledgeable person knows that knowledge will always remain with him... but man with money is not sure whether money will always remain with him.

Possession of knowledge should make you feel more unknowledgeable, humble and dissatisfied at the same time.

Possession of money should make you feel more poorer and dissatisfied at the same time.

(Outcome of discussion with my college friend - Amit Lodha, yesterday morning)

Monday, December 10, 2012

रेखा

अमर्याद प्यार अमित का
मर्याद न कर पाई रेखा
अमित आनंद ढूंढ़ पाया
लाँघकर रेखा पाए जया
खो कर मित अमित सा
सहे उम्र भर पीड़ा रेखा
अमित-जय मिलन देखा
पीड़ा भूली आनंदी हो रेखा
अमर्याद आनंद का पाना 
रेखा-अमित मिलन माना
---- यम
( पुन्हा एक न जमलेली कविता )

guys n girls ... i am not happy with it.

Saturday, December 8, 2012

भय

भयासी भिवूनी कधी ना रडावे
धिटाई करोनी भयासी भिडावे
निर्धारा धरोनी नियोजा करावे
भयाधीन रातीं स्वप्नांनी सजावे

माझी पहिली वृत्तबद्ध कविता...
वृत्त - भुजंगप्रयात

Tuesday, December 4, 2012

असा त्रास करून घेण्यात काय हशील ?

शरीर हा विषय आपल्याकडे 'बावू' केल्याशिवाय संपत नाही.
प्रत्येकजण त्याची सांगड मन आणि बुद्धीशी चुकीच्या पद्धतीने घालत असतो.
मन आणि बुद्धी यांच्या अस्तित्वाची प्रचिती शरीर देत असले, तरी ते म्हणजे सर्वस्व नाही.
त्याने केलेली प्रत्येक कृती ही मनातून प्रेरणा घेवून,आणि  बुद्धीने नियंत्रण केल्याने घडते.
मनावर कुणाचे नियंत्रण नाही. मन कोणत्या वेळेस काय प्रेरणा घेवून येईल याचा नेम नाही.
कधी ते शरीराद्वारे परमोच्च सुखाचा आनंद देवून जाईल तर
कधी अगदी घृणास्पद, किळसवाणे वाटावे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आणि अनुभूती देवून जाते.
या प्रेरणा कधी आपल्याकडून निर्माण होतात तर कधी दुसऱ्याकडून... !
याच प्रेरणा जशाच्या तशा जर येवून भिडल्या तर पंचाईत होते.
बुद्धी इथे कामाला येते. ती सर्व भावनांवर नियंत्रण आणते.
बुद्धीवर संतुलनाचा संस्कार करत रहावे.
अनियंत्रित मन आणि अतिनियंत्रित शरीर यावर हा संतुलनाचा संस्कार खरेच रामबाण आहे.
मन आणि शरीर दोघेही फार फसवे असतात. त्यांच्या  आहारी जाणे, हे बुद्धी दौर्बल्ल्याचे लक्षण आहे.
विशेष काही घडले नसताना तसे  घडल्याचा उगाच आव आणणे तसेच खूप काही घडून सुद्धा काहीच झाले नाही अशी बतावणी करणे या चुका मन आणि शरीर कायम करीत असते.
म्हणून तर एखादी लहान गोष्ट, एखादा शब्द, एखादे वाक्य खूप त्रास देवून जाते. आणि उलटपक्षी खूप महत्वाची गोष्ट आपण विसरायलाही मागे पुढे पहात नाही.
बऱ्याच लोकांना शरीरापलीकडे काहीही दिसत नाही. तर काहींना मन हेच सर्वस्व वाटते. ही माणसे कायम आजार ओढवून घेतात .... कधी मानसिक तर कधी शारीरिक.
जरा विचार केला तर असे लक्षात येते, की हा फक्त आजारी असल्याचा भास असतो.
गंमत म्हणजे आपण सारे या भासावरच उपाय शोधत राहतो .... कधीच न संपणारा हा शोध असतो...
कारण जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिला नष्ट करण्याच्या उपायांचा हा शोध असतो.
मनाला आणि शरीराला बुद्धीची जोड न मिळाल्यामुळे असे होत असते.

इतरांच्या वागण्याने आणि बोलण्याने त्रास करून घेण्यात मजा कधी असते?
जेंव्हा हा त्रास समृद्धीकडे नेणारा असतो तेंव्हा. असा त्रास आपल्याला अभिमानाने मिरवावासा वाटतो.
ज्या वाईट वागण्या, बोलण्याने आपण नकळत अधोगतीकडे प्रवास करतो ... स्वतःला नाहक शिक्षा करून घेतो ....
न स्वतःचा सुधार, न बोलणाऱ्याचे प्रायश्चित्त ... काहीही साध्य होत नाही... !
असा त्रास करून घेण्यात काय हशील ?

रक्त

इथे प्रत्येकजण फक्त स्वतःच्या अश्रूंची काळजी वाहतोय 
आम्ही आणि आमच्या रक्ताचा पडलेला प्रत्येक थेंब,
गर्भ शोधतोय.... पुन्हा एकदा जन्म घेण्यासाठी,
अश्रूंचा धिक्कार करत, पुन्हा एकदा मरण्यासाठी !
--- यम

Sunday, December 2, 2012

नजदीकियाँ

न जाने क्यूँ आजकल
नजदीकियों से डरता हूँ
शायद, मैं किसीसे
दूर नहीं रहना चाहता...!

तू

निश्चय तू, निष्ठा तू
नियम तू,  संयम तू
तू तर्करवी, तू कार्यकवी
तू ध्येय्यवादी, तू प्रयत्नवादी 
श्वास तू, विश्वास तू,
आधार तू, शिखर तू
तू नेता, तू त्राता
तू कर्ता, तू जेता
तूच प्रकृति, अन तूच पौरुष
तू एकच, परि अनेकांचा आदर्श !

मर्यादा

प्रत्येक गोष्ट काही नैसर्गिक मर्यादा सोबत आणते. याला सदगुण आणि षडरिपू दोनीही अपवाद नाहीत. परंतु मेख ही कि मर्यादा ओलांडल्याशिवाय प्रगती अथवा अधोगती दोनीही शक्य नाही... सदगुण मर्यादा ओलांडतात तेंव्हा ते एकतर दुर्गुण बनतात अथवा निष्क्रिय निर्गुणाचे सोंग घेतात... दुर्गुण मर्यादा ओलांडतात तेंव्हा ते एकतर सदगुण बनतात अथवा विनाश निश्चिती करतात. मर्यादित सदगुण व मर्यादित दुर्गुण हेच नैसर्गिक आहेत... या मर्यादा जोपर्यंत माणसाला कळत नाहीत तोपर्यंत दोषांचे पद्धतशीर उदात्तीकरण आणि अतीव सद्गुणांच्या हव्यासातून आलेली निष्क्रियता हे दोनीही होतच राहणार....

थोडक्यात काय --- माणसाने माणूस असण्याच्या नैसर्गिक मर्यादा ओलांडून त्याने देव अथवा दानव बनण्याचा प्रयत्न केला तर तो मानवी संस्कृतीच्या मुळावर उठलाच म्हणून समजा.  अमेरिका किंवा आपले अध्यात्मिक सट्टेबाज या दोघांनाही मर्यादा समजल्या नाहीत, म्हणून मर्यादा उल्लंघन झाले. आपले अध्यात्मिक सट्टेबाज आपल्याला शतकानुशतके गरिबीत ठेवत आले आणि अमेरिकेची काही दशकांत कमावलेली श्रीमंती काही वर्षांत भिकेला लागली.... !

"जीवन तो संतुलन का नाम हैं, पार्थ... उसे तौलना सीखो"...हा श्रीकृष्णाचा संदेश आपण  सारेच भौतिक आणि अध्यात्मिक सुख मिळाल्यावर विसरतो हेच खरे...! 

आमच्या आत्म्याला आमचाच सलाम...!

आपण झाडाचे गोड फळ खातो...
त्याची गोडी चाखतो..
त्यावेळी ते झाड ज्या आजोबांनी लावले
त्यांची आठवण येत नाही ...पण
फळ खाल्ल्यानंतर "व्वा ! फारच छान...!"

ही जी दाद मिळते ती त्या आजोबांसाठीच असते ...
त्यांच्या प्रेरणेला असते .... तसेच
त्यांच्या दूरदृष्टीलाही असते ...

अनेक उंच इमारतींचा पाया दिसत नाही
पण तो असतो...
किंबहुना इमारत जेवढी उंच
तितकाच तो खोल असतो ...
त्याचं असणं दिसत नाही पण
त्याच्या नसण्याचे परिणाम मात्र दिसतात ...
पाया जितका मजबूत ... तितकीच त्या कळसाची शान ...!

क्रिकेटच्या सामन्यामध्ये
फलंदाजाने किती धावा केल्या किंवा
गोलंदाजाने किती बळी घेतले हेच मोजले जाते ...
सामनावीरही तेच ठरतात .... पण
विजय आणि पराजय यांमधील खरा फरक करणारे असतात ते क्षेत्ररक्षक ...
त्याचं कौशल्यच खर तर धावा आणि बळी ठरवतात ...
आणि अर्थातच विजयही ...!

दहीहंडी फोडणाऱ्यावर सर्वांचेच लक्ष असते...
पण
गोपाळांना जमा करणारे
त्यांच्यात चैतन्य निर्माण करणारे
सर्व थरांसाठी आपला खांदा देणारे ...
तो प्रचंड भार सहन करणारे
कोसळणाऱ्या थरांचा 'जीव' वाचवणारे
आणि त्यांना पुन्हा उर्जा देणारे
सर्व फार कमी वेळा लक्षात राहतात
कारण
हे सर्व म्हणजे एक गर्दी असते
या गर्दीला चेहरा नसतो .... पण
'आत्मा' जरूर असतो ....

आजोबांची दूरदृष्टी आणि प्रेरणा होती म्हणूनच फळाला गोडी आली
पाया खोल होता म्हणूनच इमारतीने कळस गाठला...
क्षेत्ररक्षक होते म्हणूनच फलंदाज-गोलंदाज सामनावीर ठरले
दहीहंडीच्या गर्दीला 'आत्मा' होता म्हणूनच ती फोडणाऱ्याचा 'चेहरा' गाजला

आमच्यातही असेच आजोबा आहेत,
पाया रचणारे आहेत, क्षेत्ररक्षक आहेत
आणि आमच्या या 'चेहऱ्याला' 'आत्मा' बहाल करणारेही आहेत..

त्या अविनाशी, अनंत आणि अथांग अशा
आमच्या आत्म्याला आमचाच सलाम...!

ऐका हो ऐका ....!

एक दवंडी

ऐका हो ऐका ....!

एकवीस वर्षापूर्वी
एकाच शाळेतले
एकाच बैचचे
एकमेकांना ओळखणारे,
एकमेकांना न ओळखणारे,
एकमेकांशी खूप बोलणारे,
एकमेकांशी कधीही न बोललेले...
एकमेकांना रोज पाहणारे
एकमेकांना कधीही न पाहिलेले...
एकाच उद्दिष्टाने
एकवीस वर्षानंतर
एकत्र येणार आहेत हो....!

एकमेवाद्वितीय अशा त्यांच्या शिक्षकांसाठी
एक 'गुरुदक्षिणा' अर्पण करण्यासाठी
एकवीस एप्रिल रोजी
एकमेव महानगर - मुंबईच्या 
एकमेव पवई तळ्याकाठी
एका भव्य 'हॉटेल रोडास' मध्ये
एका मंगल समयी - दुपारी अडीच वाजता
एकून एक सगळेच
एकत्र येणार आहेत हो .... !

ऐका हो ऐका ....!

सर, तुम्ही याल ना ..!

सर,
तशी आपली ओळख जुनीच आहे,
शाळेचा पहिला दिवस ... आईचा सुटलेला हात...
तुम्ही पुढे केलेला हात... तुम्ही दिलेला धीर ...
शांत झालेलो आम्ही..... सगळे तसेच्या तसे आठवतेय अजूनही...!

पुढे आपली ही ओळख वाढत गेली...
आम्ही तुम्हाला ... तुम्ही आम्हाला कळू लागलो...
तुम्ही घडवत राहिलात... आम्ही घडत राहिलो...

एके दिवशी अचानक आपली सोबत सुटली...
आमचा पुढचा प्रवास सुरु झाला ... एकटे वाटू लागले...
अडचणी आल्या... धीर खचला...
पण नकळत सोबत आलेल्या 'संस्कार शिदोरी'ने तितक्याच 'नकळत' मदत केली...
पुन्हा उभे राहिलो...
या सगळ्या प्रवासात सर तुमची आठवण नाही आली...

काळ लोटला .... आम्ही मोठे झालो...

आज आम्ही सर्वच आपापल्या कर्तृत्वाने एका उंचीवर आहोत...
आता कधीही धीर खचत नाही...
कितीही मोठी आव्हाने आली तरी घाबरत नाही...
कितीही उंची गाठली तरी पाय जमीन सोडत नाहीत...
हे असे का होते ? .

आम्ही  साहजिकच याची कारणे शोधतो...
नकळत सोबत आलेली 'संस्कार शिदोरी' आता कळायला लागते ...
ती चक्क सर्वात मोठे 'कारण' बनते...
या 'संस्कार शिदोरी'चे कारणही आम्ही शोधतो...
सवयीने आम्ही मूळ शोधतो... खूप मागे जातो..
शाळा आठवते... तुम्ही आठवतात...
साक्षात्कार होतो...
सर, तुम्हीच तिचे 'कारण' ...!

सर, जुनी ओळख आता खऱ्या अर्थाने पटते ...!

आता मात्र तुमची आठवण येणे थांबत नाही...
ती येतच राहते ... येतच राहते ...

सर, आता, रहावत नाही... 
तुम्हाला भेटण्याची प्रचंड इच्छा होतेय ...
तुम्हाला भेटून हे सर्व सांगायचे आहे...
...
जुन्या आठवणींमध्ये पुन्हा रमायचे आहे...
आमचे यश तुमच्या चरणी अर्पण करायचे आहे
तुम्ही लावलेली रोपटी  कशी बहरून आली आहेत हे दाखवायचे आहे...
आणि हो...
पुढील प्रवासासाठी
ती 'संस्कार शिदोरी' पुन्हा मिळवायची आहे...
पुढील पिढ्या तयार करण्यासाठी...!

सर, आपण भेटणार आहोत
हॉटेल रोडास, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई  येथे...!
दुपारी ३ ते ८ या वेळेमध्ये..!
आम्ही मुलांनी एक छानसा सोहळा आयोजित केला आहे ...!

सर, तुम्ही याल ना ..!
नक्की या !!

वाट पाहतोय...!!
  
तुमचीच
'वात्रट' मुले...!

गुरुदक्षिणा

सर,
तुम्ही 'मराठी' शिकवलंत, आज तिने आमच्या अस्मितेची जाणीव प्रगल्भ केलीय ...!
तुम्ही 'हिंदी' शिकवलंत, आज तिने आमची राष्ट्रीय बांधिलकी अधिक दृढ केलीय ...!
तुम्ही 'इंग्रजी' शिकवलंत, आज आम्ही जगाच्या जवळ पोहोचलोय  ...!
तुम्ही 'संस्कृत' शिकवलं, आज आम्ही गीतेसारखं गुह्यतम ज्ञान आपलंसं केलंय ...!
तुम्ही 'गणित' शिकवलं, आज आम्ही 'व्यवहार चातुर्य' आत्मसात केलंय    ...!
तुम्ही 'भूमिती' शिकवली, आज आम्ही अनेक जटील आकृतिबंध सोपे केलेत  ...!
तुम्ही 'भौतिकशास्त्र' शिकवले, आज आम्ही निर्जीवांतीलही 'अंतिम सत्याचा' ध्यास धरतोय  ...!
तुम्ही 'जीवशास्त्र' शिकवले, आज आम्ही सजीवांचा 'आत्मा' आणि निर्जीवांचा 'जीव' शोधतोय ....!
तुम्ही 'रसायनशास्त्र' शिकवले, आज आम्ही  मानवी मनाचेही 'रसायन' शोधण्याचे धाडस करतोय...!
तुम्ही 'इतिहास' शिकवलात, आज आम्ही नवा इतिहास रचू लागलोय ...!
तुम्ही 'भूगोल' शिकवला, आज आम्ही जग पादाक्रांत केलंय....!
तुम्ही 'नागरिक शास्त्र' शिकवले, आज आमच्यातला नागरिक 'सुजाण' बनलाय ..!
तुम्ही 'अर्थशास्त्रशिकवले, आज आम्ही अर्थकारणात 'माणूस' पुढे आणतोय ...! 
तुम्ही खेळायला शिकवले, आज आम्ही 'खिलाडूवृत्ती' मनापासून जोपासतोय ....!
तुम्ही 'चित्रकला' शिकवली, आज आम्ही आनंदरंगाची उधळण करतोय ...!
तुम्ही 'अभियांत्रिकी' शिकवली, आज आमचा प्रत्येक क्षण एक नित्यनवा 'आविष्कार' घेऊन येतो...!
तुम्ही अनेक 'विषय' शिकवले, आज तुम्ही स्वतः आमचा 'विषय' झाला आहात...!
तुम्ही आमच्या आयुष्याचा 'पाया' रचलात, आज आम्हाला 'कळस' दूर नाही...!

सर, तुम्ही अनोख्या प्रेरणेने आणि अविरत प्रयत्नांमधून
अगदी सहजतेने आमच्या चिमुकल्या मनांवर संस्कार केले
पण हे करताना तुम्ही आमच्याकडे आमचे 'यश' सोडून दुसरे काहीच मागितले नाही
हा निस्वार्थीपणा केवळ दुर्मिळच ...!
आज आमचे हेच तुटपुंजे यश आम्ही तुम्हाला समर्पित करत आहोत.

सर, 'समर्पण' हाही तुमचाच संस्कार !

संस्कारांनी काठोकाठ भरलेली तुमची ओंजळ
तुम्ही कायमच आमच्यासाठी रिती केलीत
आज तीच ओंजळ
आम्ही एक जबाबदारी म्हणून
आता आमच्याकडे घेत आहोत,
अनेकांची जीवने समृद्ध करण्यासाठी !

कदाचित,
हीच असेल आमची खरी 'गुरुदक्षिणा' !

वर्तूळ

प्रत्येक माणूस स्वतः भोवती एक वर्तूळ आखून घेत असतो... 
या  वर्तुळाच्या कक्षेच्या आतील जागा फक्त त्याची स्वतःची असते ....
या जागेवर त्याच्या जन्मदात्या आईचा अथवा विश्वाची निर्मिती करणाऱ्या विधात्याचाही अधिकार नसतो...
मुले, बायको, मित्र यांचा तर नाहीच नाही....!
.
पण
कधी कधी काही नाती एवढी प्रगल्भ होतात...
माणसे एकमेकांच्या एवढी जवळ येतात ...
नात्यांमधील ओलावा एवढा वाढतो की वाटायला लागते -
'आपण समोरच्याला पूर्ण ओळखले आहे, आता त्याच्याबद्दल जाणून घ्यावे असे काहीच उरले नाही'...
समोरच्याचे वर्तूळ आपण भेदले आहे असेच वाटत राहते ...
.
इथेच खरी गल्लत होते...
माणूस चुकतो....
.
खरे तर ते वर्तूळ त्याने भेदलेले नसतेच ...
मनाची घातलेली ती एक समजूत असते ...
अथवा
त्या ओलाव्याला, जवळीकेला, प्रगल्भतेला दिलेली दाद असते... असे म्हणूया हवं तर..!
वर्तूळ भेदल्याचा तो केवळ एक भास असतो.
.
ह्या भासाचा परिणाम म्हणजेच 'गैरसमज'
आणि याचे टोकाचे स्वरूप म्हणजेच 'विश्वासघात'...
.
आणि
यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग म्हणजे
'कुठलाही माणूस, कधीही, कसाही वागू शकतो, मग तो कितीही जवळचा असला तरीही ... रक्ताने आणि मनाने सुद्धा !'   
यावर प्रचंड विश्वास ठेवणे,
समोरच्याने आखलेल्या 'त्या' वर्तुळाचा प्रचंड आदर करणे
आणि ते वर्तूळ आपल्याला कधीच कळणार नाही
या 'व्यवहार्य' समजात कायम राहणे...!

नसतेस घरी तू जेंव्हा

बहर गीत .....

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव सुटका सुटका गातो
जगण्याची बळकटे वीण
संसार नेटका होतो

नभ चुंबून आतष व्हावी
जल्लोष तसा हा घडतो
ही धरा गतिशील  होते
अन चंद्र चांदण्या टिपतो

येतात मुली दाराशी
न च परतुनी जाती मागे
खिडक्या तोडून  साऱ्या
तव गंधा घालवून देती

तव बेडीतून निघण्याची
मज लाभते एकच  वेळ
तुजवीन हृदय फुलावे
मी तसाच बहरत जातो 
 
मी धन्य बये  तुजवीण 
हे सांगे मी हर जीवा
समई कसली  उदास 
ती मजसव पेटून उठते 
 
हा झालो मी स्वतंत्र
अन स्वैरही आता झालो
तुजसव गमावले जे
तुजवीण कमवत जातो.
 
       - यम (यशवंत महाकाळ)

हाथ

दिमाग का सबसे बड़ा दुश्मन दिल हैं
जो हरदम दिमाग को गुमराह करता हैं 
दिल का सबसे बड़ा  दोस्त दिमाग हैं
जो  दिल को गुमराह होनेसे बचाता हैं

दिल और दिमाग के इस  झगड़े में
हाथोंको कभी न भूले हम...
जो हर भटकी राह को
सही बनाने की ताकत रखता हैं

गुमराह दिल, द्विधा दिमाग से पीड़ित
अर्जुन का भी सहारा हाथ ही तो था
कम दिमाग, कमजोर दिलों का भी
हाथ ही तो सबसे बड़ा सहारा हैं .... और
संतुलित दिल और दिमाग का भी
सहारा भी 'हाथ' ही रहेगा..

शायद, दिल की गहराई और दिमाग की ऊंचाई का सही परिमाण 'हाथ' ही हैं !

बर्फी'

आज 'बर्फी' पाहिला.

स्वमग्न 'झिलमिल', स्वच्छंदी 'बर्फी' आणि वास्तववादी चौकटींच्या जोखडात अडकलेली बंदिनी 'श्रुती' यांचा हा प्रेमळ प्रवास पाहिला.
प्रेम करण्यासाठी संधीची वाट न बघणारी 'झिलमिल',
प्रेमाच्या प्रत्येक संधीत नि:संकोच झोकून देणारा 'बर्फी' आणि
प्रेमाची प्रत्येक संधी येनकेनप्रकारेण गमावणारी 'श्रुती' यांचा हा प्रेमाविष्कार लाजवाब.

झिलमिलचा Autism, बर्फीचा Romanticism and श्रुतीचा Helpless P

ragmatism यांची ही अबोल वादविवाद स्पर्धा आहे.... अर्थात या स्पर्धेत पराजय श्रुतीचा, विजय झिलमिलचा आणि स्पर्धेचा निखळ आनंद बर्फीला मिळाला आहे हे वेगळे सांगायला नको ...!

प्रेम वास्तवाचे भान ठेवून करता येत नाही, आणि करूही नये हाच संदेश देणारी ही अप्रतिम कलाकृती आहे...

आवर्जून बघाच दोस्तहो !

(My first review of a movie)

तू भेटूच नकोस

तू भेटूच नकोस
.....
माझ्या एकांती
मी केवळ तुझाच असतो
तुजसह पेक्षा तुजवीण
अधिक तुझ्याजवळ असतो...
.....
तू भेटूच नकोस
.....
तुझे नसणे हेच आता

तुझे असणे होत आहे ...
तुझ्या नसण्याची आता
सवय करून घेत आहे ....
....
तू भेटूच नकोस...!
....
माझ्या या सरावात
आता खंड पाडू नकोस...
....
तू भेटूच नकोस... त्यापेक्षा
तुही तुझा एकांत शोध...
.....
आणि अनुभव ....
....
जशी तुजवीण तू
माझ्याजवळ आहेस, तसा
माझ्याविना मीही
तुझ्याच जवळ आहे ...!

.... (माझी पहिली विरह कविता )

मी प्रेमात पडत आहे...!

तू खरी मुक्ता,
पण का
भासली बंदिनी,

तू खरी राधा
पण का
भासली रुक्मिणी

तू खरी स्वप्नमयी
पण का
भासली सत्यवती

तू खरी मृदुला,
पण का
भासली शिष्ट

तू खरी झुळूक,
पण का
भासली झोत

तू खरी व्यक्त,
पण का
भासली अव्यक्त

तू खरी एकच,
पण का
भासली दुजा

तू तीच
पण का
भासली वेगळी

हा भासच,
पण का भासला सत्य
तुला उमगता उमगता
मी मलाच उमगतो फक्त !

तू तिच राहतेस
पण मीच बदलत आहे
कारण सोप्पय ...
मी प्रेमात पडत आहे...!

-- यम

आठव

संपतो क्षण, जन्मते आठवण
साठता आठवण, ओढ विलक्षण
ओढ ही वाढता, क्षण चाहूलती
भेटता तू पुनः, क्षण मोहरती
तुझा निरोप मज देतसे ग्वाही
तुझ्याहून तुझा आठव चिरस्थायी

-- यम

प्रेमात पडणे की प्रेम करणे

माझाच संवाद माझ्याशी
=============================

तू पहिल्यांदा दिसलीस, तेंव्हा मन तुझ्या शरीराच्या प्रेमात पडलं
तू बोललीस, तेंव्हा मन तुझ्या बुद्धीच्या प्रेमात पडलं
तू गप्प असायचीस, तेंव्हा मन तुझ्या नि:शब्द सहवासाच्या प्रेमात पडलं
तू जायचीस, तेंव्हा मन तुझ्या आठवणींच्या प्रेमात पडलं
तू आठवायचीस, तेंव्हा मन तुझ्या ओढीच्या प्रेमात पडलं
तू भेटणं लांबवायचीस, तेंव्हा मन तुझ्या विरहाच्याही प्रेम

ात पडलं
तू टाळायला लागलीस, तेंव्हा मन तुझ्या 'त्या' तिरस्काराच्याही प्रेमात पडलं
तू 'नाही' म्हणालीस, तेंव्हा मन तुझ्या नकाराच्या प्रेमात पडलं
तू असं 'एकट' पाडलंस, तेंव्हां मन माझ्या एकांताच्याही प्रेमात पडलं
...
...
आता, हा एकांतच प्रेमाने सांगतोय ---
"ती आता नाहीच आहे, यापुढेही सोबत नसणार आहे,
विचार कर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व आठव
आणि शोध ...
'ती 'सोबत' होती का कधी' ? "

....!
.....!!
.......!!!

"अरे, मग मी कुणाच्या प्रेमात पडलो होतो..?!!!?"
...
"स्वतःच्या!"
...
"काहीही काय !!"
...
"अरे हो, तू तुझ्यावरच प्रेम करू लागला आहेस, तुलाच ओळखायला लागला आहेस...
दुसऱ्याला समजून घेता घेता स्वतःलाच समजून घेवू लागला आहेस..."
...
"मला नाही पटत हा तुझा युक्तिवाद "
...
"ऐक,
प्रेमात पडणं आणि प्रेम करणं यात फरक आहे मित्रा !
तू तिच्या प्रेमात पडला होतास, आणि आता, तू तुझ्यावर प्रेम करतोयस !!
प्रेमात 'पडल्याने' जखमा होतात ...तर प्रेम केल्याने 'शांती' मिळते
प्रेमात पडण्यात 'आसक्ती' आहे ...तर प्रेम करण्यात 'तृप्ती' आहे.
प्रेमात पडण्यात होकाराचे 'सुख' किंवा नकाराचे 'दुःख' आहे,
तर प्रेम करण्यात स्वतःला शोधण्यातला निखळ 'आनंद' आहे..."

"अब्बे, प्रेम करायला समोर कुणीतरी असायला हवं ना...
हे काय खुळचट सारखे स्वतःवरच प्रेम !
पण, मी बदलत आहे हे एक मात्र मान्यच करायला हवं..."

"प्रेमात एकतर्फी वा दुतर्फी असं काहीच नसतं,
असतं ते फक्त एकरूप होणं ...!
'एकरूपता' हीच प्रेमाची एकमेव कसोटी आहे...
ती तुझ्याशी किंवा तू तिच्याशी 'एकरूप' झालाच नाहीत ...
'सहवास' लाभूनही 'समृद्ध' झालाच नाहीत...
सांग , याला 'प्रेम' कसं म्हणायचं?
तुझा एकांतच तुला समृद्ध करत गेलाय...
परिपक्व आणि प्रेमळ करत गेलाय ...
तुझ्यातील बदलाचा हाच तर अर्थ आहे ...
विचार कर,
सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व आठव
आणि शोध ...
तुला कळेल ...
तुझ्यातला 'तूच' अधिक 'सोबत' करत होता तुझी ..!
तू तुलाच प्रेमाच्या वाटेवर घेवून जात होतास..
तुलाच घडवत होतास ...
तू तुझ्याशीच एकरूप होत होतास ...
यालाच मी 'प्रेम करणे' म्हणतो...!"
...
"लय भारी दोस्त..! वाह वाह !!
आता, अजून 'शांत' वाटतंय ...प्रसन्न वाटतंय...!
आयला, पुन्हा प्रेमात पडावंसं वाटतंय "

"खबरदार, पुन्हा प्रेमात पडशील तर, xxxx ?"

ipad चे गर्वगीत

ipad चे गर्वगीत
(चाल - गोरी गोरी पान )

चिंटू पिंटू सान, laptop हून छान
डडा, मला एक ipad आण II धृ II

ipad च्या software मध्ये drawing आहे भारी
drawing च्या सोबतीला painting ही न्यारी
काढताना शिकीन सुंदरता मी छान II १ II

ipad च्या games मध्ये characters चा कल्ला
कल्ला करताना करी दुसऱ्यावर हल्ला
बोटांच्या तालावर नाचवीन मी छान II २ II

ipad च्या स्टोरी मध्ये असे फार मज्जा
मज्जा करता करता मिळे morals ची सजा
morals सारखे वागायचे ठेवीन मी भान II ३ II

ipad च्या गणिताची पद्धत आहे मस्त
पटापट होतात सर्व कोडी फस्त
लवकरच होईन मी scientist महान II ४ II

ipad च्या net ला सर्व काही माहीत
माहित नाही असे त्याला नाही काही माहीत
माहितीच्या खजिन्यावर करीन मी राज II ५ II

ipad वर खेळायला तासभर चालेल
उरलेला वेळ मग अभ्यासाला पुरेल
अभ्यासही करणारा मी ipad शोधणार II ६ II

---- यम
(माझे पहिले बालगीत)

शांतीचे अधिष्ठान

When there is righteousness in heart, there is beauty in character,
When there is beauty in character, there is harmony in the home,
When there is harmony in the home, there is order in nation
When there is order in the nation, there is peace in the world.
--- Honourable Dr APJ Abdul Kalam (based on Tamil literature)

These lines made me restless....

मराठीत त्याचा स्वैर अनुवाद करता करता एक कविताच

तयार झाली ....

सात्विक हृदयी वसे सुंदरतेचा गाव,
सुंदर चारित्र्य ठेवी सर्व सम भाव II १II
उच्च नीच, हीन दीन, मानी न भेद
घडवी कुटुंबे देवूनी विषमतेला छेद II २II
कुटुंब नव्हेच, असे समतेचे मंदिर,
उभारी राष्ट्र, जिथे व्यवस्था ही थोर II ३II
सात्विक, सुंदर नि समभावी मन,
राष्ट्रा करी, उदात्त, उन्नत नि महान II ४II
राष्ट्रांचे ऐसे निर्माण, देई चैतन्या उधाण,
जगी तृप्तीचे हे कोंदण, करी शांतीचे अधिष्ठान II ५II
---- यम

Saturday, December 1, 2012

सिस्टम - शिस्त - शिष्ट - विशिष्ट

'system' या शब्दाचा, 'शिस्त' या शब्दाशी, अन 'शिष्ट' अशा लोकांशी 'विशिष्ट' संबंध आहे.
पण 'विशिष्ट' लोकांचा या तिघांशीही संबंध नसतो. हेच सांगणाऱ्या या चार ओळी ----

'सिस्टम' ही पाळता, अंगी बाणते 'शिस्त'
अतिरेकी आग्रह, तिचा धरी तो 'शिष्ट'
न बाधे ही चौकट, असती सदा मुक्त
निर्माण ते चोखट, जे करी ते 'विशिष्ट'
---- यम

(तळटीप : System हा शब्द मुद्दाम 'सिस्टीम' असा न लिहिता, 'शिस्त' या शब्दाच्या जवळ जावा
म्हणून 'सिस्टम' असा लिहिला आहे.
उच्चारशास्त्राची चौकट मोडल्यानेच हे 'निर्माण' शक्य झाले)