Thursday, January 16, 2014

सरासरी



सरासरी
(जाति बाळानंद, चाल – आनंदी आनंद गडे ) 

सरासरी गं सरासरी l थोर तुझी गं जादुगिरी ll
भिन्नतेस तू एक करी l दिसे खरी तू नसे खरी ll धृ ll  

साऱ्या संख्या एक गटी l प्रत्येकीची भिन्न गती ll 
भांडण केले संख्यांनी l भिन्नगती याकारण की ll १ ll

भांडण होता ते खासी l तूची ते गं थांबविशी ll
गोळा करुनी सर्वांसी l सम वाटे हर एकीसी ll २ ll

बेरजेस त्या नग भागी l भागाकार तु सरासरी ll
गुरुमध्य तू सरासरी l सुत्रसिद्ध तू सरासरी ll ३ ll

कुठे कुठे गं तू असशी  l संख्यांमध्ये तू नसशी ll
वेगळी जरी सरासरी l आपलीच तू सरासरी ll ४ ll

आधारच तू सांख्यमती  l प्रमाण तू गं फारकती ll
आढाव्यांत तु शिरोमणी l तज्ञांसी तव प्यार मनी ll ५ ll     

तत्वज्ञान तुझे भारी l सार नि असार एक करी ll
नसूनही तू असे परी l संख्यांवर तू राज्य करी ll ६ ll

सांख्यिकीय संकल्पनेवर बरेच दिवस कविता करावी असे मनात होते.
आज सरासरीपासून सुरुवात केली. अजून बऱ्याच विचाराधीन आहेत.
मराठी जर तत्वज्ञान पेलू शकते, तर गणित, विज्ञानासकट सारं काही पेलू शकेल.
प्रयत्न सुरु ठेवणे हेच इष्ट !

No comments:

Post a Comment