प्रेमा तुझे काय
नाव-गाव-ठाव
आसक्ती-अनासक्ती होई समभाव ll
धृ ll
धरित्रीच्या प्रेमात
समुद्रा बुडावं
भरतीत गावं, तसं ओहोटी
रडावं
प्रचंड ओढीनं गर्जतच यावं
उद्यासाठी आज माघारी फिरावं
ll १ ll
भास्कराच्या प्रेमात धरेने
जळावं
उजेडी फुलावं तसं अंधारी
निजावं
सोनसकाळी नवं रंग-रूप ल्यावं
उदयासाठी राती अंधारा
पांघरावं ll २ ll
सृष्टीच्या प्रेमात वायुने
फिरावं
श्वासाने भारावं, तसं उच्छवासी
तारावं
अणुरेणु शिरुनी प्राणांनी
जागवावं
नव-प्राणांसाठी अप्राणां
त्यजावं ll ३ ll
आकाशाच्या प्रेमात सर्वांनी
संपावं
अथांगा शोधावं, नि स्वथांगा
विसरावं
चराचर सृष्टीत आकाशा शोधावं
मिटुनी स्वतःच आकाशी मिळावं
ll ४ ll
No comments:
Post a Comment