Monday, January 13, 2014

जीवन शिक्षणी कधी बारसे ?



जीवन शिक्षणी कधी बारसे ?
(जाति नववधू)
(‘नववधू’ या मात्रा वृत्तातील माझी पहिली कविता )

पुस्तकीविद्येसी मोल कायसे ?
जीवनशिक्षणी कधी बारसे ?   ll धृ ll
    
आहारी विहारि  दक्ष नसे
व्यायामी ध्यानी चाड नसे
चिंतन मननही गावी नसे
शरीरशिक्षणी या जीव नसे    ll १ ll

नित्य कामेच्छा वरदान असे
शरीरज्ञान ना कौशल्य नसे
कामांधता, न्यूनगंड डसे
कामशिक्षणी फुका लाज दिसे    ll २ ll

हक्काधिकार सदा मिरवितसे 
कर्तव्य, जिम्मेदारी विसरतसे 
संस्कार, सदाचार, शिस्त नसे 
कुटुंबशिक्षणी पायाच खचे    ll ३ ll

अति कर्ज-उधार, कदा अर्थ नसे
न विनियोग, बचत, अपव्ययी फसे
वाढ-गुंतव-दान टाळतसे 
श्रीमंतीशिक्षणी दळिद्र वसे   ll ४ ll

लोकशाहि कायदे बरेचसे
      नियम अटींचे भांडार जसे
      जाण नि पालन, लवलेश नसे
विधिशिक्षणी कधी मुहूर्त नसे ll ५ ll
     
नेतागिरी भलती लावी पिसे
प्रदर्शनी गुंग, दिशाही नसे  
नीती, धोरण, युक्ती, शक्ती फसे  
नेताशिक्षणी शाळाच नसे            ll ६ ll

संपर्क, संवाद संपलासे 
संकल्प, संघटन संकरतसे
संघर्षात समाज संपतसे 
समाजशिक्षणी संकट खासे    ll ७ ll

      राष्ट्रद्रोह नित्यपाठ पढतसे
राष्ट्रभक्ती पाटी फोडतसे      
राष्ट्रधर्मच शाळा पाडतसे
राष्ट्रशिक्षणी ढांचा ‘ढ’च असे ! ll ८ ll

(टीप : मात्रा वृत्त – नववधू

धृवपदी दोन चरण – मूळ विषय स्पष्ट करणारे,
प्रत्येक अंतऱ्यात चार चरण,
पहिले तीन चरण विषय विस्तारासाठी
आणि चौथा मेळाचा चरण, मूळ विषयाशी सलगी करणारा,

प्रत्येक चरणात सोळा मात्रा
सामान्यतः यति आठव्या मात्रेवर असते
परंतु येथे सातव्या, आठव्या तर कधी दहाव्या मात्रेवर यति योजिली आहे
मुक्तछन्दाकडून वृत्तबद्धकवितेकडे प्रवास करताना
मुक्तछंदातील काही सवयी जात नाहीत, हेच खरे !

शिक्षण सुरु आहे, जाणकारांनी समजून घ्यावे, धन्यवाद ! )    

No comments:

Post a Comment