Wednesday, January 15, 2014

गुजरी हुई जवानी



प्रत्येक बाईकडे प्रेमाने पाहणारा मी,
आज तिच्या
कडेवरच्या मुलाकडे प्रेमाने पाहत आहे
ते मूलही माझ्या नाटकावर हसून दया दाखवत आहे 
हे असे काय बरे होत आहे ? हे असे का बरे होत आहे ?.... १

प्रत्येकिशी हस्तांदोलन करणारा मी,
आज त्यांना
हात जोडून नमस्कार करत आहे
हातांचे आंदोलन संपवून आदराचे संमेलन भरवत आहे
हे असे काय बरे होत आहे ? हे असे का बरे होत आहे ? .... २

बायकोचीच इमानेइतबारे आठवण काढणारा मी,
आज शाळेतल्या
माझ्या शिरोडकरला आठवत आहे,
राहून गेलेल्या प्रेमाचा मनातच पूनर्गणेशा करत आहे  
हे असे काय बरे होत आहे ? हे असे का बरे होत आहे ?.... ३

तुरळक पांढरे केस शिरी मिरवणारा मी,
आज स्वतःच
ते शोधून शोधून काळे करत आहे
जे लपवायचे तेही संपले, आता शिल्लक केस लपवत आहे  
हे असे काय बरे होत आहे ? हे असे का बरे होत आहे ?.... ४

काही गोष्टी कधीच मनापासून न करणारा मी
आज त्याच
गोष्टी मुलगा मनापासून करत नाही म्हणून त्रागा करत आहे
‘आमच्यावेळी-तुमच्यावेळी’ अशी पिढीजात वाद दरवेळी उकरत आहे, दांभिकतेत उरकत आहे     
हे असे काय बरे होत आहे ? हे असे का बरे होत आहे ?.... ५
      
साध्या मतदानासही कधीच न जाणारा मी
आज चक्क
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल हिरिरीने मत मांडत आहे
‘भारताचे काही खरे नाही !’ असा उच्छ्वास रोज उगाच टाकत आहे
हे असे काय बरे होत आहे ? हे असे का बरे होत आहे ?.... ६ 

कधीच बरं वाईट न पाहणारा, मस्तीतला माजोर्डा तू
आज एकदम
‘हे काय बरे होत आहे ? , हे का बरे होत आहे ?’ अशी बोंब का बरे मारत आहे ?
साध्या सोप्या गोष्टींवर लंबीचौडी सहाकडवी कविता करून बोअर का बरे करत आहे ?
अबे, गुजरी हुई जवानी !  एवढं साधं कसं कळत नाही ?
बरंच वय झालंय तुझं !
अरे तू म्हातारा होत आहेस ! अरे तू म्हातारा होत आहेस !! .... ७

No comments:

Post a Comment