Monday, January 20, 2014

अराजक अरविंद



आज आली अरविंदावर
अंधाराची छाया
खुर्ची मिळूनही सुटेना
आंदोलनाची माया

राज्य कराया लागतो
विचारांचा पाया
सामंजस्यही लागे थोडे
विचारां जपाया  

घोषणाबाजी, बोंबाबोंब
थांबव रे सखया
टाक टोपी, विझव मेणबत्ती
हवे आता झटाया

टोकांवर उभे राहून
सुटे ना समस्या
ताणून तुटे परि  
टोके नवी नशिबा

लोकशाहीचा बाशिंदा
लौकिक रे तुझा
अराजकाची भाषा
शोभे कारे तुला ? 

Sunday, January 19, 2014

दिशा



भौतिकवादात              एवढं गैर ते काय ?
वस्तूंच्या प्रेमाचं            इतकं वैर ते काय ?  
निर्जीवांवरील प्रेम           कधी सैरभैर होतं काय ?
भोगातील तृप्ती             कधी स्वैर असते काय ?

दगडातला विठोबा           हा भौतिक आहे काय ?
मर्सिडीजमधला विठोबा       हा अध्यात्म नाही काय ?
पंढरीच्या वाटेतच           विठोबाची ओढ असते काय ?
पब-बारच्या वाटा            विठोबाकडे नेत नाहीत काय ?

टाळ-मृदुंगातूनच            काय संगीत येतं काय ?
डीजे-बँजो-ड्रम              हे गरळ ओकतात काय ?
तल्लीनतेचा मक्ता           काय तुम्हीच घेतलाय काय ?
धिंगाण्यातील तल्लीनता      तुम्हा कधी दिसली आहे काय ?

जीवघेण्या स्पर्धांचा          एवढा तिटकारा तो काय ?
भजन-कीर्तनात             कधी स्पर्धा नसते काय ?
तुमच्या स्पर्धाच            केवळ आनंदासाठी असतात काय ?
आमच्या स्पर्धा             आम्ही दुःखासाठी करतो काय ?

व्यसनाधीन या जगी         फक्त आम्हीच आहोत काय ?
टाळकरी-माळकरी           यांना एकही व्यसन नाही काय ?
जगण्यातल्या नशेतच        फक्त विठोबा आहे काय ?
नशेतल्या जगण्यातसुद्धा      विठोबाच नाही काय ?!  

आम्ही आमचे वागतो       तेंव्हा, तुमच्याबद्दल आदर बाळगत नाही काय ?
तुम्ही कसेही वागोत         आमच्याबद्दल कायम खडे फोडत नाही काय ?
आमची दिशा विनाशाची !    हे आम्ही जाणत नाही काय ?
अध्यात्माच्या भांडवलदारांनो,   खरं सांगा, तुमची नेमकी दिशा काय ?

पुनर्विवाह



लग्नाआधीची ‘सखू’ लग्नानंतर
नाव बदलून ‘ठकू’ झाली,
लग्नाआधीचा ‘दगडू’ मात्र
लग्नानंतरही ‘दगडू’च राहिला

‘ठकु’चे फक्त नाव होते
संसार ‘सखू’ करत होती
‘दगडू’ अजून दगडच राहिला होता
म्हणून संस्कारी ‘सखू’ मन खात होती   

‘सर्वसुखअभिलाषी’ दगडू
हे तिचे दुःख जाणून होता
पण, ‘आपण बदलणार नाही’
असा त्याचा खमक्या संस्कार होता

ठकू म्हणे सखुला – “दगडच आहे गं तो !
नाव बदलायच्याही लायकीचा नाही.
सांग त्याला, - ‘नाव पुन्हा ‘सखू’ कर,
नाहीतर ही ‘ठकू’सुद्धा ‘सर्वसुखविनाशी’ आहे’’  

ऐकताच ही ‘ठकु’गर्जना,
सुखाभिलाषी ‘दगडू’ टरकला
‘दगडू-ठकू घटस्फोट’ फाईल करून
‘दगडू-सखू पुनर्विवाहा’ची पत्रिका छापून आला.





Saturday, January 18, 2014

काळा डाग




एक निर्मल असं गाव होतं, कलाकारांच माहेर होतं
हौश्या-गवश्या-नवश्यांचं, एक पवित्र विद्यापीठ होतं

जिवा-शिवा दोन कलाकार मित्र, एकाच घरात रहात होते
पांढरा रंग, पांढरी वस्रे, पांढऱ्या चारित्र्याचे भक्त होते

कोणजाणे कशी माशी शिंकली, होवू नये ते होवून गेले 
जिवाच्या पांढऱ्या सदऱ्यावर, एकदा काळे डाग पडून गेले

काळा डाग असलेला पांढरा सदरा, जीवाने लगेच टाकून दिला
काळ्या डागाची चीड जपत, नवा पांढरा सदरा विकत घेतला

शिवाने, सुंदर नक्षी काढून तो काळा डाग छान रंगवला
जिवाला सांगून शिवाने तो नक्षीदार सदरा पुन्हा वापरला

जिवाने, काळा डाग नको म्हणून पांढरा सदराच फेकून दिला
शिवाने, पांढऱ्याची सोबत सुटू नये म्हणून काळा डागही सुंदर केला

दोघेही शुभ्र जीवनात, पांढरेपणाच्या भक्तीत आपापल्या मार्गाने रमत गेले
जिवाजी स्वतःची उंची वाढवत गेले, तर शिवाजी कलेची उंची वाढवत गेले

आज ‘दैनिक निर्मल’ला बातमी होती, नगरात अश्रूंचा महापूर आला
जिवाजींनी जीव दिला, तर, शिवाजींना ‘जीवनगौरव’ मिळाला