Monday, January 6, 2014

प्रेमाचे प्रायश्चित



प्रेमाचे प्रायश्चित

“शेखरकाका येवून गेल्यावर
एवढी का गं रडलीस, आई ?”
---------------------
“आमच्या भंगलेल्या प्रेमाचं
प्रायश्चित घेता यावं, म्हणून
मी समीरशी लग्न केलं !
समीरला खूप प्रेम दिलं
चांगला संसार केला, करतेय!!
वाटलं,
मला शेखरचं प्रेम कळालं.”
------------------
“समीर कायम मला म्हणतो –
‘शेखरच्या नजरेतील प्रेम पाहिलं,
शब्दांमधला आवेग पाहिला, 
वागण्यातील खरेपणा पाहिला की
त्याला प्रेमभंग भोगायला लावणाऱ्या
त्याच्या त्या प्रेयसीचा
प्रचंड तिरस्कार करावासा वाटतो.’ “
--------------------
“ज्याला प्रेम द्यायला हवं होतं
त्याचा तिरस्कार केला,
ज्याला प्रेम दिलं, तो ही
नकळत तिरस्कारच करतोय माझा !
कसली गं ही आयुष्यभर मनाची फरफट !!”
---------------------
“आई,
प्रेमाची परतफेड कधी प्रायश्चिताने करायची असते का ?
प्रेमाला प्रेमच हवं असतं गं !
जा, शेखरकाकाला मिठी मारून रड त्याच्या मिठीत !
मोकळी हो ! प्रेम कर !!”
---------------------
काल जेवताना बाबा बोलून गेले –
“शेखरला त्याची प्रेयसी मिळाली !
मी उगाच तिचा तिरस्कार केला.”
---------------------
आज पहिल्यांदा बाबांनी आईसाठी गजरा आणला.
आज खूप वर्षांनी आईने माझा गालगुच्चा घेतला.   

चार गुरु




चार गुरु
 

माझा पहिला गुरु - कुरुळ्या केसांचा
जादूटोणा करताना मरण पावला

माझा दुसरा गुरु - सफेद दाढीचा
बलात्कार करताना पकडला गेला

माझा तिसरा गुरु - पीळदार शेंडीचा
बिअरबारमध्ये झिंगताना सापडला

माझा चौथा गुरु - केसाळ छातीचा
राजकारणातून उडी मारून पळाला

माझंच चुकलं...
मी केस बघून गुरु करायला नको होतं !

पुरुष



पुरुष

इथे सारेच आहेत नर, परि पुरुष एकही नाही
सदा मादी-शोधक नजर, तुला कदर स्रीत्वाची नाही

मैथुनी रमे तव शरीर, तुझ्या मनी प्रेम-बीज नाही
तू वीर्य-स्खलनाने बेजार, तरी वीर्य-संवर्धन नाही  

तुझा क्षणात संपतो धीर, तुझी संयम-साधना नाही
असे कसे घडतील वीर, तुझी बलोपासना ती नाही 

कमजोर रे तुझा निर्धार, तुझी आकांक्षा उदात्त नाही
पद,पैसा,पत तुला प्यार, हे ध्येय सत्य-सुंदर नाही
   
इतर दिशांचा तिरस्कार, रे तुझी स्वतःची दिशा नाही
हा दिशाहीनतेचा आजार, ह्याजन्मी तरी इलाज नाही

जरी साध्यावरी तुझा जोर, तुज साधनांची तमा नाही 
त्वा साधकवृत्तीचा विसर, तव त्या सिद्धीची प्राप्ती नाही

तिचा तुझ्या गुणांवर भर, देहाची तिजला चाड नाही
आकांक्षा-दिशा, यत्न-विचार, खेरीज दुसरी ओढ नाही

ना स्वयंभू, ना घेई आधार, तुला अहं सोडवत नाही  
मिळतील मस्तानी हजार, तुझी औकात बाजीची नाही