Friday, November 14, 2014

मन उरतच नाही


सोनसळी किरणांचा कोवळा अभिषेक
ऊबदार उन्हाची साथ मागवत नाही

डोईवरी भास्कर जेंव्हा जाळी देहकण
लाही लाही अंगाची मन पेटवत नाही

तिन्ही सांजेला नभी रंगांची उधळण
नयनरम्य नजाऱ्यात मन गुंतत नाही

पावसाने चिंब ओलावला अणु रेणू
ओल ही तनुची मना भिजवित नाही

पानेफुले वाऱ्यावरी नाचती डोलती
शांतता मनीची ही अस्थिरत नाही

विसावला भोग, तैसा विस्मरला त्याग
जन्ममरणाची साक्ष मना देववत नाही

संपले, स्थिरावले की सुटले हे मन
मन मोजण्याही मन उरतच नाही

--- यम (यशवंत महाकाळ)
नोव्हेंबर १५, २०१४

हेल्मेटसक्ती

नोंद घ्या नोंद, अखंड जगाने घ्याहो नोंद
पुण्यातल्या जनतेचा हेल्मेटसक्तीला विरोध

विद्येचे हे माहेरघर, येथे सुज्ञांचे आहे घर
सदसदविवेकाला यांच्या लागली आहे घरघर

वाहनांचा वेग कमी, धडकतो कुठे आम्ही ?
धड़कलो जरी कधी, कवटी शाबूत ठेवतो आम्ही !

स्वतःची काळजी नाही, तेथे हे इतरांची काय घेणार ?
राजकारणी जेथे सामिल, तेथे पोलिस काय करणार !

अभ्यास नाही, तर्क नाही, कायम नशिबावर हवाला
मुठेकाठच्या ओंकारेश्वराला यांनी ठेवले आहे कामाला

जेथे डोकेच नाही यांना, तिथे यांचे फुटणार कसे डोके ?
पुणे तेथे 'डोके' उणे, हे यमाचे बोल ठरणार नक्की फुके !

--- यम (यशवंत महाकाळ)
नोव्हेंबर 12, 2014.

'हार हार उद्धव'

राजे, तुम्ही आम्हाला 'हिन्दवी स्वराज्य' का दिलंत ?
आम्ही त्यातंल फ़क्त 'हिंदुत्व' लक्षात ठेवावं, म्हणून ??

राजे, तुम्ही आम्हाला 'भगवा ध्वज' का दिलात ?
आम्ही त्या भगव्यातील 'भागवत' कायमचं विसरून जावं म्हणून ??

प्रबोधनकारसाहेब, तुम्ही आम्हाला 'वाघ' कशासाठी दिलात ?
आम्हाला नुसत्या डरकाळया मारता याव्यात, म्हणून ??

साहेब, तुम्ही आमच्या हातात 'धनुष्यबाण' का दिलात ?
आम्ही तो अतिताणुन, तोडून, अंगावर पाडून घ्यावा, म्हणून ??

साहेब, तुम्ही आम्हाला 'स्वाभिमान' कशासाठी शिकवलात ?
आम्ही जनतेच्या इच्छा स्वाभिमानाखाली चिरडाव्या, म्हणून ??

साहेब, तुम्ही आम्हाला 'इमान राखा' हे शेवटच्या सभेत का सांगितलत ?
आम्ही या मातीची इमानेइतबारे सेवा करण्याची संधी लाथा डावी म्हणून ??

साहेब, तुम्ही आम्हाला 'सरळसोट रोखठोक ताबडतोब' निर्णय घ्यायला का लावलेत ?
आमच्यातील निर्नायकत्व आणि निर्निर्णायकता सदासर्वदा वाढीस लागावी म्हणून ??

छे !
आज, आम्ही ना आदर्शांचे अनुकरण करतोय
ना नवे आदर्श घालून देतोय !

आज जे काही चालू आहे,
त्यात ना मातीत पाय भक्कम रोवण्याची ताकद आहे
ना आभाळाएवढी स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द आहे
आहे ते केवळ पोकळ अधांतर !!

 आणि सोबत ...
पोकळ प्रोत्साहन मिळण्यासाठी सुरु असलेली
'हर हर महादेव' च्या गर्जने ऐवजी
'हार हार उद्धव' अशी कुजबुज !!!

 --- यम (यशवंत महाकाळ )
नोव्हेंबर 12, 2014.

हे साधे तुम्हाला कळत नाही

उद्धव राजे,
आमच्या राजांनी मुघलांशी तह केला होता
आमच्या राजांच्या वडिलांनी मुघलांची चाकरीही केली होती.
हे करताना त्यांना कधीच लाचारी वाटली नाही.
हा त्यांच्या राजकारणाचाच एक भाग होता.
हे साधे तुम्हाला आठवत नाही. 


तुम्हाला नैसर्गिक मित्राबरोबर
साधी दोन चार मंत्री पदांची तडजोड करता येवू नये.
असे करणे म्हणजे तुम्हाला लाचारी वाटावी.
तडजोड़ म्हणजे लाचारी नव्हे
हे साधे तुम्हाला कळत नाही

महाराष्ट्राच्या जनतेने युती तुटूनही
युतीच सत्तेत यावी असे वाटते.
भाजप सत्तेत असताना सेना विरोधी बाकावर
हा कौल जनतेचा नक्कीच नाही.
हे साधे तुम्हाला कळत नाही.

तुम्ही आता पाठिंबा दिला नाही किंवा
पवारांनी काही दिवसांनी काढून घेतला आणि
निवडणुका पुन्हा झाल्या तर
सत्तेत पुन्हा भाजप येणार, हे नक्की.
आणि तेंव्हा स्पष्ट बहुमताने येणार.
हे साधे तुम्हाला कळत नाही.

स्वतःचा आणि मंत्र्यांचा मान जपता जपता
तुम्ही शिवसैनिकांचा आणि जनतेचा अपमान करत आहात.
सत्ता तुमची वाट पहात आहे
तिला लाथाडू नका.
नाहीतर तुमचा केजरीवाल होईल .
आणि तुम्हाला मुंबई राखणेसुद्धा जड़ जाईल.
हे साधे तुम्हाला कळत नाही.

जनता आता शहाणी झाली आहे
अद्दल घडवायला तिला वेळ लागत नाही.
तिचा अंत पाहू नये.
हे साधे तुम्हाला कळत नाही.

--- यम (यशवंत महाकाळ)
नोव्हेंबर 9, 2014.

Friday, November 7, 2014

सच्चे येथे जगणे




सानुले रोप, मातीत जन्मले
उभे वाढले, आडवे रुंदावले

उभे-आडवे झाड, उन्हात वाळले
वाळून, उन्मळून, आडवे मरून पडले

मरून पडताना, मातीतच रुतले
जिथे ते रुतले, तिथेच ते रुजले

आडवे वाढले, उभे रुंदावले
तयारही झाले, झेलण्या उन्हे 

पुन्हा एकवार, नशिबी वाळणे 
वाळून मरणे, नि मरून जन्मणे !

कसले मरणे ? कसले जन्मणे ?
भ्रम रे जाणे-येणे, सच्चे येथे जगणे !!

--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर २४, २०१४

दोन मंदिरे





एक मंदीर,
समुद्र किनारी, डोंगरमाथ्यावर  
भोवतालच्या गर्द झाडीत लपलेलं,
लाटा, वारा, पक्षी यांचे नाद कानावर घेणारं !
....
मंदिरास फक्त पाया आणि चार खांब,
भिंती नाही, घुमट नाही आणि कळसही नाही.
मंदिरासमोर एक नंदी आणि एक त्रिशूळ,
सदैव फडफडणारा एक भगवा ध्वज आणि
मंदिराच्या पायावर मध्यभागी एक पिंड !
...
पिंडीवर नागोबा आणि
पिंडीत शंकर !
....
बाहेर, निर्मनुष्य नयनरम्य निसर्ग !
.... 
बाकी सगळं शांत ! अनाहत !! अद्वैत !!!

--------------------------------------------------------------

एक मंदीर,
शहराच्यामध्यावरील, टेकडीवर  
भोवतालच्या सुपर्ब लॉन आणि प्लीजिंग लँडस्केपमध्ये लपलेलं,
रेकॉर्डेड आरत्या, गाणी आणि मंत्रोच्चारांनी न्हावून निघालेलं !
...
मंदिरास संगमरवरी पाया, संगमरवरी खांब,
संगमरवरी घुमट आणि सोनेरी कळस.
मंदिरासमोर दिमाखदार संगमरवरी कासव    
मंदिराच्या संगमरवरी गाभाऱ्यात
चकाकणारी लोभसवाणी, संगमरवरी गणेशमूर्ती !
...
मूर्तीवर मनमोहक सजावट आणि
मूर्तीत चैतन्य !
...
बाहेर
देणगीदारांचे पुतळे, फ्लेक्स, टाइल्स,
गर्दी, गर्दीत क्लिक्स आणि गर्दीच्या तोंडात न मावणारे गॉसिप्स !
प्रवेशद्वाराबाहेर दुतर्फा बहरलेला बिजनेस !!
...
गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात
भक्तांच्या भिकेतून ‘कमावलेली’
एक राईसप्लेट खावून, तृप्त होवून
गाभाऱ्यातील संगमरवरी गारव्यावर
निवांत झोपलेला  
एक भिकारी
तोच एकमेव शांत ! अनाहत !! अद्वैत !!!

बाकी सर्वत्र मानवी कोलाहल, अस्वस्थता, बेचैनी !!

    
--- यम (यशवंत महाकाळ)  
ऑक्टोबर २४, २०१४ .

  

पिंड




सागरतीरी, धरणीच्या कडेवर, एक हिरवा डोंगर
लाटांचे अखंड अभिषेक, लाटांचेच मंत्रोच्चार गंभीर     
निळं आभाळ, हिरवी झाडी, पक्षांची साथ मधुर
ब्रम्हांडलीलांच्या साक्षीला एक पिंडीतला शंकर

‘निर्गुण निराकारा’त लीन सारे ‘सगुण साकार’
वारा,पक्षी,पाने, लाटा करती ‘अनाहता’शी एकस्वर
सृष्टीचे बहुरंग भक्तिरंग झाले, रंगास त्या महापूर
पिंडीचे ब्रम्हांड झाले, द्वैतास भेटे, अद्वैताचे माहेर    

--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर २४, २०१४

कणकवलीचा राजपुत्र

कणकवलीचा राजपुत्र, त्याला विचारी कुणी ना कुत्र
उडालीय त्याची झोप, आता तो झालाय गलितगात्र

भाऊ पडला, बाप पडला, खालसा झालय संस्थान
रडून झाले, काम नुरले, टवाळक्या करी स्वाभिमान

होती अंगात रग तोवर, देत होता राग, मारत होता गुद्दे
सत्ता गेल्यावर आता, विरोधासाठी शोधत आहे मुद्दे

आरोग्य, विकास, पर्यावरण हे काहीच सुचले नाही
मराठ्यांचा मीच भाई, म्हणे, गुज्जुंची करतो सफाई

भ्रष्टाचाराच्या संस्कारांना मिळाले हे विकारांचे भांडार
द्वेषाहंकाराच्या घराला लवकरच पडणार मोठे खिंडार

--- यम ( यशवंत महाकाळ )
नोव्हेंबर 8, 2014

'सन्मान'

आजकाल काही भक्तांना भलतेच वाटत आहे
की आई एकविरादेवीचा चॉइस फार बदलला आहे
धार्मिक साडीचोळी आणि कोवळया कोंबडी ऐवजी
ती राजकीय दान मागत आहे.
...
पाच वर्षापुर्वी एका भक्ताने 'तेरा' आमदार वाहिले
परवाच अजुन एका भक्ताने 'त्रेसष्ट' आमदार वाहिले
आणि पुढे 'एकशे ऐंशी' वाहीन असे 'नवसनाम्या'त म्हटले.
...
आई फार बिलंदर आहे. भक्तांचा चालुपणा तिला कळत आहे.
म्हणून ती राजकीय दान देण्याऐवजी राजकीय बळी घेत आहे.
तेरा पैकी बारांचा बळी घेवुन एकाचेच दान पदरात टाकले आहे
त्रेसष्टचेही तसेच काहीतरी करण्याचा तिचा प्लान आहे.
...
साड़ी-चोळी-कोंबडी देणारा खराखुरा भक्त हे सारे पहात आहे.
आईचे हे वागणे त्याला खटकत आहे.न राहवून विचारतो आहे -
"असे का करतेस आई ? माणसे तर आपलीच आहेत !"
...
आई म्हणते - "तुझ्यासारखे यांचे मन स्वछ नाहीये !
तू मनापासून एकाच एकाविरेची भक्ती करत आहे.
हे भक्त पूजा माझी घालतात पण
मनात पंढरपुरच्या विठोबाची सरकारी आरती आहे.
कसे सांगू तुला -
माझापण योग्य तो 'सन्मान' राखला जात नाहीये !"

---यम (यशवंत महाकाळ)
नोवेम्बर ६, २०१४

फ़क्त एकदा वाकवा कणा

युती गेली
सत्ताही गेली
हाती येणार
विरोधी बाक

उतरवला आहे माज
पण गेली नाही खाज
जुन्यापुरान्या खोडी
कशा चालणार आज ?

घडयाळ शिकवी राजे
राजकारणाचा बाणा
मोडण्यापूर्वी बाण राजे
फ़क्त एकदा वाकवा कणा
--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर 31, 2014

सेना अग सेना

सेना अग सेना
सेना अग सेना
झाली तुझी दैना
सामील होता येईना
बाहेर राहता येईना

राजा मारी गप्पा
प्रधान शोधी टप्पा
सरदार मारी थापा
निर्णय होईना पक्का

मैत्री केली झाल्या चुका
मैत्री तोडली झाल्या चुका
पुन्हा करताना होतील चूका
सत्तेचा सोडू का मोका !

कसे सांगू राहून मुका
चुकतोय हो काळजाचा ठोका
महाराष्ट्र हिता प्रसंग बाका
मनात माझ्या सत्तेच्या भुका

---यम ( यशवंत महाकाल)
ऑक्टोबर 30, 2014

शिवनेरीची सीट

छ्त्रपतिंवर हक्क शिवसेनेचा
छत्रपतिंचा आशीर्वाद भाजपला
पण, छ्त्रपतिंचे खरे प्रेम मनसेच आहे
पहा, लाज वाचविणारी एक सीट शिवनेरीची आहे
---यम (यशवंत महाकाल)

उद्धव-राज

ना मुत्सद्दी ना कर्तृत्ववान
ना तर्करवि ना संधीसाधू
ना चांगला मित्र ना शत्रु
कायम आम्हा एकच प्रश्न
मोडेन पण कसा वाकू ?

राज तर मोडलाच आहे
उद्धव लवकरच मोडणार आहे
शिवाजीची केवळ हवा आहे
त्यांच्या शाळेला सेनेत टाला आहे
बाळ नितीवर मोठा घाला आहे

--यम (यशवंत महाकाल)

चोर

आधी त्यांनी चहा विकला
कमावलेल्या पैशातुन अर्धी चड्डी विकत घेतली
मग संसार केला

घर खर्चासाठी 'पटेल' देवाची मूर्ती चोरली
भागेना म्हणून 'गांधी'चीही सफाई केली
तरी संसाराची भूक मोठी होती
म्हणून त्यांनी 'छत्रपती' पळवले
आता फुले, शाहू, आम्बेडकर यांच्यावर डोळा आहे
एव्हढ करून समाधान झाले नाही
म्हणून स्वतःचा भगवा शर्ट पांढरा केला


अजब चोर आहे हा !
ह्याला घाबरून चपटे नाक लाल झालय
गोरी चमडी गुळ लावतेय

और तू क्या सुन रहा हैं बे मामू,
तेरी तो वाट लगने वाली हैं !
---यम (यशवंत महाकाल)

Wednesday, October 15, 2014

पूर्वेचे ढग



(काशिद येथील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या एका नयनरम्य अनुभवावरून)

एक संध्याकाळ किनाऱ्यावरची,
समुद्राला भरती, आणि आमची मनं भारावलेली
समुद्राने किनारा भिजवला, तशीच मनेही भिजलेली, ओथंबलेली !

पश्चिमेच्या सूर्याला ओढ क्षितिजाची
भोवती अगणित काळ्या ढगांना ओढ मंद होणाऱ्या प्रकाशाची  
आणि भारावलेल्या, भिजलेल्या आमच्या मनांना ओढ रंगांच्या उधळणीची !

पूर्वेकडे कसं सगळं शांत,  
निरभ्र, निळं आकाश, त्यात चार शुभ्र ढगांचा पुंजका
पक्ष्यांचा मंद विहार, आणि खाली डोंगराच्या पायथ्याशी लाटांचे लटके लपंडाव !

क्षितिजाच्या मिठीत सूर्य, अलगद आणि आवेगात
काळ्या ढगांना चढते लाजरी लाली, सहज आणि क्षणात
आणि आमची मने, स्तब्ध, शांत, तृप्त, साक्षी आणि एका व्यापक शून्यात !!

सूर्य निमाला, क्षितीज काळवंडले
काळे ढग पुन्हा काळेच झाले, लाली ओसरली,
आमची मने काहुरली, मिठ्या सुटल्या, तशी ओथंबाला कोरड आली !       

आणि अचानक ...

अनामिक ओढ जागे, पूर्वेच्या शुभ्र ढगांत
झेपावती चारी, धुंदहोण्या पश्चिमीप्रेमात
डोंगरमाथा ओलांडून धावती ते पश्चिम प्रांगणात !

ओढ अपरंपार पाहुनी, पश्चिमेस गहिवर फार  
पश्चिम दिलदार, साद देवुनी, तात्काळ फेकले रंग गहिरे चार  
लाल, केशरी, तांबूस, पिवळ्या, रंगात नटले-न्हाले चारी, करी नवल अपार !  

नटले ढग, नटला डोंगर, नटल्या साऱ्या लाडिक लाटा,
पक्षी नाचले, आकाश नाचले, नाचे शांतता, नाचे अवघा पूर्वकिनारा
मनात आता नवी शांतता, पुन्हा तृप्तता, पुन्हा एकदा तीच शून्यता ! पुन्हा एकदा तीच शून्यता !!     

--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर १५, २०१४