(काशिद येथील
समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या एका नयनरम्य अनुभवावरून)
एक संध्याकाळ किनाऱ्यावरची,
समुद्राला भरती, आणि आमची मनं
भारावलेली
समुद्राने किनारा भिजवला,
तशीच मनेही भिजलेली, ओथंबलेली !
पश्चिमेच्या सूर्याला ओढ
क्षितिजाची
भोवती अगणित काळ्या ढगांना
ओढ मंद होणाऱ्या प्रकाशाची
आणि भारावलेल्या, भिजलेल्या
आमच्या मनांना ओढ रंगांच्या उधळणीची !
पूर्वेकडे कसं सगळं शांत,
निरभ्र, निळं आकाश, त्यात
चार शुभ्र ढगांचा पुंजका
पक्ष्यांचा मंद विहार, आणि खाली
डोंगराच्या पायथ्याशी लाटांचे लटके लपंडाव !
क्षितिजाच्या मिठीत सूर्य, अलगद
आणि आवेगात
काळ्या ढगांना चढते लाजरी लाली,
सहज आणि क्षणात
आणि आमची मने, स्तब्ध,
शांत, तृप्त, साक्षी आणि एका व्यापक शून्यात !!
सूर्य निमाला, क्षितीज
काळवंडले
काळे ढग पुन्हा काळेच झाले,
लाली ओसरली,
आमची मने काहुरली, मिठ्या
सुटल्या, तशी ओथंबाला कोरड आली !
आणि अचानक ...
अनामिक ओढ जागे, पूर्वेच्या
शुभ्र ढगांत
झेपावती चारी, धुंदहोण्या पश्चिमीप्रेमात
डोंगरमाथा ओलांडून धावती ते
पश्चिम प्रांगणात !
ओढ अपरंपार पाहुनी,
पश्चिमेस गहिवर फार
पश्चिम दिलदार, साद देवुनी,
तात्काळ फेकले रंग गहिरे चार
लाल, केशरी, तांबूस,
पिवळ्या, रंगात नटले-न्हाले चारी, करी नवल अपार !
नटले ढग, नटला डोंगर,
नटल्या साऱ्या लाडिक लाटा,
पक्षी नाचले, आकाश नाचले,
नाचे शांतता, नाचे अवघा पूर्वकिनारा
मनात आता नवी शांतता,
पुन्हा तृप्तता, पुन्हा एकदा तीच शून्यता ! पुन्हा एकदा तीच शून्यता !!
--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर १५, २०१४
No comments:
Post a Comment