Saturday, December 28, 2013

दगड-माती



दगड-माती

दगड एक वावरातला, मातीसोबत राहायचा
कायम तिलाच पहायचा, तिच्याशीच बोलायचा

पडीक होती माती, तोवर, रोज उन्हात तापायची
तापून वाळलेल्या गवताची, पिवळी चादर ओढायची 

पाऊस पडून गेल्यावर, हिरवी हिरवीगार व्यायची
हिरव्यादेठी झुलणाऱ्या रानफुलांनी, पिवळीजर्द व्हायची 

मातीमधले बदल पाहून काळा दगड अचंबीत व्हायचा
मी का असा बदलत नाही? या विचाराने थोडं झिजायचा  

माती पुढे जिरायती झाली, खरीप-रब्बीत मशागती झाली
नांगराने ढेकाळून गेली, तशीच, कुळवाने सपाटून गेली

पाभारीने पेरती झाली, तशीच, पावसाने दुभती झाली 
दोन हंगाम दोन पिकं, माती आता लेकुरवाळी झाली

मातीसारखं व्हायचं, असा विचार दगड रोज करायचा
माती त्याला खिजवायची , पण तो हार नाही मानायचा

माती आता बागायती झाली, एकदम उच्चभ्रू वर्गात गेली
कधी काकडीच्या वेलांनी, कधी केळीच्या पानांनी सजली

धरणाने, विहिरीने तर कधी ठिबकने बारामास न्हाती झाली  
बाजाराची शान, बळीचा मान अन लक्ष्मीची खाण झाली  

माती आता दगडाशी बोलेना, चुकुनदेखील पाहीना  
दगडाने हाही बदल स्वीकारला, मातीमोलपणा ओळखला
 
जसं मातीचं नटण-मुरडणं त्याला आवडलं होतं, भावलं होतं
तसं तिचं बदलणं त्याला कळलं होतं, झिजत झिजत मुरवलं होतं

झिजला जरी रोज तरी, माती मात्र झाला नाही
मातीमोल होईपर्यंत वहावत मात्र गेला नाही    
आज तो, अनेक वास्तूंचा पाया तर अनेक मंदिरांचा कळस आहे
आज तो, अनेक प्रासादांचा खांब तर अनेक धरणांचा बांध आहे

नित्यबदल करत करत नित्यानंद घेत आहे, देत आहे
बदलांचा अतिरेक टाळत आहे, काही नियम पाळत आहे

सर्व काही छान आहे तरी दगडाला खंत मात्र एक आहे
त्याचा निश्चय तिच आहे, त्याचा बदल तिचाच आहे,

त्याचा आधार तिच आहे, त्याची उंची तिचीच आहे
जिचे आहे श्रेय सारे, ती त्याची प्रेय माती कुठे आहे ?

बदलांचा अतिरेक ती अजून टाळत नाहीये, थांबतच नाहीये
माती होती, मातीमोल झाली, आता कवडीमोल होत आहे


No comments:

Post a Comment