खड्ड्यात जावू दे
खड्ड्यात जावू दे हिंदू
तुझा अन खड्ड्यात जावू दे मुसलमान
भगव्याचीही शान नको
हिरव्यालाही मान नको
प्रतिक वेगळी, प्रेषित
वेगळे, प्रेममंत्र हा एकच जाण
सत्य असे हा एकचि धर्म,
सत्यशोध ही भक्ती मान
खड्ड्यात जावू दे मराठा
तुझा अन खड्ड्यात जावू दे बामण
मिशीला या पीळ नको
शेंडीला ही गाठ नको
काम वेगळे, दाम वेगळे, घाम
मात्र हा एकच जाण
कर्मयोग ही खरी साधना,
जनकल्याणा तू साध्य मान
खड्ड्यात जावू दे गरीब तुझा
अन खड्ड्यात जावू दे श्रीमान
गरिबीची ही लाज नको
श्रीमंतीचा हा माज नको
स्थावर वेगळी, जंगम वेगळी, नाशिवंत
हा गुणधर्म जाण
नित्यसुधार ही खरी
श्रीमंती, नित्य राहू दे प्रत्येक दान
खड्ड्यात जावू दे पौरुष
तुझे अन खड्ड्यात जावू दे स्री-धन
कठोरतेचा काच नको
कोमलतेची कीव नको
शरीर वेगळे, मने वेगळी,
आत्मबल परी एकच जाण
आत्मज्ञान ही पहिली पायरी,
आत्मोद्धार तू अंतिम मान
खड्ड्यात जावू दे भेदाभेद अन
खड्ड्यात जावू दे विषमान
भेदांची ही सजावट नको
विषमतेची शर्यत नको
एकचि विश्व, एक वसुंधरा,
एकच माणूस नक्की जाण
तूच मी अन मीच तू, तो ही
एकच, एकच सारे, एकच मान
No comments:
Post a Comment