Monday, December 30, 2013

शून्य-दान



शून्य-दान 

प्रवासाआधी,
माझी ओळख फक्त शून्याशी होती
सुरुवातही तिथूनच होती
मी चालत राहिलो
मिळेल ते गोळा करत राहिलो
मिळाले त्यात आनंद मानला

पूर्ण आनंदातही पुन्हा शून्य शोधत गेलो
जे मिळाले त्याला शून्य मानत गेलो
नव्याने सुरुवात करत गेलो
तसाच चालत राहिलो
अनेक शून्य गोळा करत गेलो
शून्यानेच झोळी भरत गेलो

आता झोळीत शून्य मावत नाही
शून्य सांडू नये, शून्य वाया जावू नये
म्हणून शून्याचेच दान करत आहे 

आनंद याचा आहे की
लोकांनाही शून्य हवे आहे
शून्याचा हा प्रवास
त्यांनाही करायचा आहे 
माझे अहोभाग्य !
माझे हे ‘शून्य-दान’ही सत्पात्री आहे

लोकहो,
दात्याच्या अधिकाराने माझे काही सांगणे आहे !

माझ्या शून्याची पूजा करू नका,
माझ्या शून्याची नक्कल करू नका,
माझ्या शून्याचा अभ्यास करा नि
तुमचे वेगळे शून्य निर्माण करा
जे आत्ता तुमच्याकडे आहे,
त्याला शून्य माना नि
या तुमच्या शून्याला सोबत घेवून
तुमच्या शून्य-मार्गावर
बिनधास्त प्रवासाला सुरुवात करा
शून्य गोळा करत चला
शून्य-गन्तव्याकडे वाटचाल करत रहा

आता शेवटचे सांगतो ...

शून्याचा परीघ कितीही मोठा झाला तरी
जेथून सुरुवात केलीत ते शून्यकेंद्र विसरू नका
तुम्हाला त्याच शून्याकडे परत यायचे आहे !  

No comments:

Post a Comment