Monday, December 30, 2013

शून्य-दान



शून्य-दान 

प्रवासाआधी,
माझी ओळख फक्त शून्याशी होती
सुरुवातही तिथूनच होती
मी चालत राहिलो
मिळेल ते गोळा करत राहिलो
मिळाले त्यात आनंद मानला

पूर्ण आनंदातही पुन्हा शून्य शोधत गेलो
जे मिळाले त्याला शून्य मानत गेलो
नव्याने सुरुवात करत गेलो
तसाच चालत राहिलो
अनेक शून्य गोळा करत गेलो
शून्यानेच झोळी भरत गेलो

आता झोळीत शून्य मावत नाही
शून्य सांडू नये, शून्य वाया जावू नये
म्हणून शून्याचेच दान करत आहे 

आनंद याचा आहे की
लोकांनाही शून्य हवे आहे
शून्याचा हा प्रवास
त्यांनाही करायचा आहे 
माझे अहोभाग्य !
माझे हे ‘शून्य-दान’ही सत्पात्री आहे

लोकहो,
दात्याच्या अधिकाराने माझे काही सांगणे आहे !

माझ्या शून्याची पूजा करू नका,
माझ्या शून्याची नक्कल करू नका,
माझ्या शून्याचा अभ्यास करा नि
तुमचे वेगळे शून्य निर्माण करा
जे आत्ता तुमच्याकडे आहे,
त्याला शून्य माना नि
या तुमच्या शून्याला सोबत घेवून
तुमच्या शून्य-मार्गावर
बिनधास्त प्रवासाला सुरुवात करा
शून्य गोळा करत चला
शून्य-गन्तव्याकडे वाटचाल करत रहा

आता शेवटचे सांगतो ...

शून्याचा परीघ कितीही मोठा झाला तरी
जेथून सुरुवात केलीत ते शून्यकेंद्र विसरू नका
तुम्हाला त्याच शून्याकडे परत यायचे आहे !  

Saturday, December 28, 2013

खड्ड्यात जावू दे



खड्ड्यात जावू दे

खड्ड्यात जावू दे हिंदू तुझा अन खड्ड्यात जावू दे मुसलमान
भगव्याचीही शान नको
हिरव्यालाही मान नको
प्रतिक वेगळी, प्रेषित वेगळे, प्रेममंत्र हा एकच जाण
सत्य असे हा एकचि धर्म, सत्यशोध ही भक्ती मान

खड्ड्यात जावू दे मराठा तुझा अन खड्ड्यात जावू दे बामण
मिशीला या पीळ नको
शेंडीला ही गाठ नको
काम वेगळे, दाम वेगळे, घाम मात्र हा एकच जाण
कर्मयोग ही खरी साधना, जनकल्याणा तू साध्य मान

खड्ड्यात जावू दे गरीब तुझा अन खड्ड्यात जावू दे श्रीमान
गरिबीची ही लाज नको
श्रीमंतीचा हा माज नको
स्थावर वेगळी, जंगम वेगळी, नाशिवंत हा गुणधर्म जाण
नित्यसुधार ही खरी श्रीमंती, नित्य राहू दे प्रत्येक दान

खड्ड्यात जावू दे पौरुष तुझे अन खड्ड्यात जावू दे स्री-धन
कठोरतेचा काच नको
कोमलतेची कीव नको
शरीर वेगळे, मने वेगळी, आत्मबल परी एकच जाण
आत्मज्ञान ही पहिली पायरी, आत्मोद्धार तू अंतिम मान

खड्ड्यात जावू दे भेदाभेद अन खड्ड्यात जावू दे विषमान
भेदांची ही सजावट नको 
विषमतेची शर्यत नको
एकचि विश्व, एक वसुंधरा, एकच माणूस नक्की जाण
तूच मी अन मीच तू, तो ही एकच, एकच सारे, एकच मान


दगड-माती



दगड-माती

दगड एक वावरातला, मातीसोबत राहायचा
कायम तिलाच पहायचा, तिच्याशीच बोलायचा

पडीक होती माती, तोवर, रोज उन्हात तापायची
तापून वाळलेल्या गवताची, पिवळी चादर ओढायची 

पाऊस पडून गेल्यावर, हिरवी हिरवीगार व्यायची
हिरव्यादेठी झुलणाऱ्या रानफुलांनी, पिवळीजर्द व्हायची 

मातीमधले बदल पाहून काळा दगड अचंबीत व्हायचा
मी का असा बदलत नाही? या विचाराने थोडं झिजायचा  

माती पुढे जिरायती झाली, खरीप-रब्बीत मशागती झाली
नांगराने ढेकाळून गेली, तशीच, कुळवाने सपाटून गेली

पाभारीने पेरती झाली, तशीच, पावसाने दुभती झाली 
दोन हंगाम दोन पिकं, माती आता लेकुरवाळी झाली

मातीसारखं व्हायचं, असा विचार दगड रोज करायचा
माती त्याला खिजवायची , पण तो हार नाही मानायचा

माती आता बागायती झाली, एकदम उच्चभ्रू वर्गात गेली
कधी काकडीच्या वेलांनी, कधी केळीच्या पानांनी सजली

धरणाने, विहिरीने तर कधी ठिबकने बारामास न्हाती झाली  
बाजाराची शान, बळीचा मान अन लक्ष्मीची खाण झाली  

माती आता दगडाशी बोलेना, चुकुनदेखील पाहीना  
दगडाने हाही बदल स्वीकारला, मातीमोलपणा ओळखला
 
जसं मातीचं नटण-मुरडणं त्याला आवडलं होतं, भावलं होतं
तसं तिचं बदलणं त्याला कळलं होतं, झिजत झिजत मुरवलं होतं

झिजला जरी रोज तरी, माती मात्र झाला नाही
मातीमोल होईपर्यंत वहावत मात्र गेला नाही    
आज तो, अनेक वास्तूंचा पाया तर अनेक मंदिरांचा कळस आहे
आज तो, अनेक प्रासादांचा खांब तर अनेक धरणांचा बांध आहे

नित्यबदल करत करत नित्यानंद घेत आहे, देत आहे
बदलांचा अतिरेक टाळत आहे, काही नियम पाळत आहे

सर्व काही छान आहे तरी दगडाला खंत मात्र एक आहे
त्याचा निश्चय तिच आहे, त्याचा बदल तिचाच आहे,

त्याचा आधार तिच आहे, त्याची उंची तिचीच आहे
जिचे आहे श्रेय सारे, ती त्याची प्रेय माती कुठे आहे ?

बदलांचा अतिरेक ती अजून टाळत नाहीये, थांबतच नाहीये
माती होती, मातीमोल झाली, आता कवडीमोल होत आहे


Friday, December 6, 2013

शिटी



शिटी

चाळीच्या या टोकाला राहतो मी,
त्या टोकाला जात होतो...
जाता जाता शिटी मारत होतो
सकाळी सकाळी “गोमू संगतीनं” हे शिटी वाजवून म्हणत होतो
गृहीत धरा, शिटी मारणं मला चांगलं जमतं ....!

चाळीतली चार घरे वाटेत होती
चारी घरे शिटी ऐकत होती
चारी घरातील चार व्यक्तींना
मारलेली शिटी खूपच लागली होती
बहुतेक, शिटी मारणं मला चांगलं जमत असावं ....!

पहिल्या घरातील एक व्यक्ती गच्चीत उभी होती
गच्चीतल्या कुंडीत पाणी घालत होती...
शिटी ऐकताक्षणी हातातला पाईप आदळून खाली
“हलकट मेला” असे म्हणत फणफणत आत गेली
समस्त पुरुष जमातीबद्दल जन्माचा तिरस्कार दाखवून गेली
हाऊज दॅट ?, शिटी मारणं मला खरंच चांगलं जमतं ??

दुसऱ्या घरातील एक व्यक्ती आरशासमोर उभी होती
नसलेल्या सौंदर्याला प्रयत्नपूर्वक सुंदर करत होती
“माझ्या पिरतीची राणी तू होशील काssय ?” ही ओळ संपली तशी
होकारार्थी मान डोलवत, पुढची ओळ गुणगुणत
गाण्याच्या गर्भितार्थाशी एकरूप होत होती
जमतंय रे, शिटी मारणं मला नक्कीच चांगलं जमतंय ....!

तिसऱ्या घरातील एक व्यक्ती व्हरांड्यात खुर्ची टाकून बसली होती.
शिटी ऐकताच, लगबगीने उठत, कापऱ्या आवाजात हळूच म्हणाली ---
“बेटा, डॉक्टर घाणेकरांची आठवण करून दिलीस,
काय रुबाब, काय डौल, काय ऐट, देखणा पुरुष अस्सल..
अहाहा, आम्ही पोरी जाम मरायचो त्यांच्यावर!
आणि जळायचो त्या काळ्यांच्या आशेवर !!?,
छान वाटलं, बाकी, शिटी कडक वाजवतोस तू !!”
आजी अजून तरुण होत होत्या
कारण, शिटी मारणं मला चांगलंच जमलं होतं ....!

चौथ्या घरातील एक व्यक्ती जिन्याच्या पायऱ्यांवर खेळत होती
शिटी ऐकताच, अजब कुतूहल, आगळा आनंद डोळ्यात आणून ती म्हणाली --
“ये काका, तुझ्यासालखी शित्ती मलापण शिकवना, 
कसली भाली वाजवतो ले तू... आमच्या दादुलापण अशी वाजवता येत नाय”
आता प्रश्नच नाही, शिटी मारणं मला लयी भारी जमलं होतं ....!

आश्चर्य आहे -- गाणं एकच, शिटी मारणारा एकच, शिटी एकच
चार व्यक्तींवर चार मिनिटांत चार वेगळे परिणाम साधून गेली
पहिलीचं वय पस्तीस, तिला तिरस्कार देवून गेली
दुसरीचं वय पंचवीस, तिला प्रेमभावना देवून गेली
तिसरीचं वय पासष्ट, मला चिरतरुण मैत्रीण देवून गेली
चौथीचं वय पाच, मला चक्क गुरु करून गेली
....
अहो,
माझं वय काय विचारताय ?  
ही तर संगीताची जादू आहे
पहा, माझी शिटी चिरंजीव होत आहे ...!