Wednesday, October 15, 2014

पूर्वेचे ढग



(काशिद येथील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या एका नयनरम्य अनुभवावरून)

एक संध्याकाळ किनाऱ्यावरची,
समुद्राला भरती, आणि आमची मनं भारावलेली
समुद्राने किनारा भिजवला, तशीच मनेही भिजलेली, ओथंबलेली !

पश्चिमेच्या सूर्याला ओढ क्षितिजाची
भोवती अगणित काळ्या ढगांना ओढ मंद होणाऱ्या प्रकाशाची  
आणि भारावलेल्या, भिजलेल्या आमच्या मनांना ओढ रंगांच्या उधळणीची !

पूर्वेकडे कसं सगळं शांत,  
निरभ्र, निळं आकाश, त्यात चार शुभ्र ढगांचा पुंजका
पक्ष्यांचा मंद विहार, आणि खाली डोंगराच्या पायथ्याशी लाटांचे लटके लपंडाव !

क्षितिजाच्या मिठीत सूर्य, अलगद आणि आवेगात
काळ्या ढगांना चढते लाजरी लाली, सहज आणि क्षणात
आणि आमची मने, स्तब्ध, शांत, तृप्त, साक्षी आणि एका व्यापक शून्यात !!

सूर्य निमाला, क्षितीज काळवंडले
काळे ढग पुन्हा काळेच झाले, लाली ओसरली,
आमची मने काहुरली, मिठ्या सुटल्या, तशी ओथंबाला कोरड आली !       

आणि अचानक ...

अनामिक ओढ जागे, पूर्वेच्या शुभ्र ढगांत
झेपावती चारी, धुंदहोण्या पश्चिमीप्रेमात
डोंगरमाथा ओलांडून धावती ते पश्चिम प्रांगणात !

ओढ अपरंपार पाहुनी, पश्चिमेस गहिवर फार  
पश्चिम दिलदार, साद देवुनी, तात्काळ फेकले रंग गहिरे चार  
लाल, केशरी, तांबूस, पिवळ्या, रंगात नटले-न्हाले चारी, करी नवल अपार !  

नटले ढग, नटला डोंगर, नटल्या साऱ्या लाडिक लाटा,
पक्षी नाचले, आकाश नाचले, नाचे शांतता, नाचे अवघा पूर्वकिनारा
मनात आता नवी शांतता, पुन्हा तृप्तता, पुन्हा एकदा तीच शून्यता ! पुन्हा एकदा तीच शून्यता !!     

--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर १५, २०१४

Monday, October 13, 2014

ईजंट शी मॉडर्न ?, इज शी मॉडर्न ?





तिचं वॉक मॉडर्न, तिचं टॉक मॉडर्न,
तिचे थॉट मॉडर्न, व्हाटेव्हर हॅज शी गॉट, बीकम्स मॉडर्न,
तिचं बिहेवियर मॉडर्न, तिचं अॅटीट्युड मॉडर्न
तिची स्टाईल मॉडर्न, तिची लाईफ-स्टाईल मॉडर्न,
तिचा ड्रेसिंगसेन्स मॉडर्न, तिचा ड्रायविंगसेन्स मॉडर्न
ओह, शी ड्राईव्हज मी क्रेझी, ईजंट शी मॉडर्न ?

हिचं चालणं साधं, बोलणं साधं
विचारही जुनेच, आधुनिकतेचा पत्ताच नाही
वागणं जुनाट, अॅटीट्युड ? ते काय असतं बुवा ??
स्टाईल नाही, फॅशन नाही, लाईफ-स्टाईलचा सवालच नाही
ड्रेसिंगसेन्स डबडा, अँड शी कांट ड्राईव्ह
ओह, शी टर्न्स मी ऑफ यार, इज शी मॉडर्न ? 
========================================
टायनी टॉप्स, अँड शॉर्टर शॉर्टस्
मिडीयम ब्रेन अँड लार्ज पॉकेट्स
फादरची मर्स अँड मदरच्या टीप्स
ब्रदरचा सपोर्ट अँड फ्रेण्ड्सच्या लिंक्स
गॉसिपसाठी सोशल अँड कनेक्ट ऑलवेज ग्लोबल,
ओह, शी इज अ ग्लोबल फिगर, ईजंट शी मॉडर्न ?

पायघोळ चुडीदार, लांबलचक बंदगळा कुर्ता
मेंदू लय भारी पण दमडीचा नाही पत्ता
बापाची नाही गाडी आणि आईचे ‘सातच्याआत’चे नियम
भावाची चाले दादागिरी आणि मित्रांचे असते कुंपण
कट्ट्यावर ‘दुनियेच्या’ गप्पा पण कनेक्ट फक्त लोकल
ओह, शी इज सच अ ‘काकूबाई’, इज शी मॉडर्न ?  
========================================
अवरली सिगार अँड डेली बॉटल
विकली पब अँड फोर्टनाईटली डेटिंग
मंथली आऊटिंग अँड क्वार्टरली ‘लिव इन’  
सिक्स मंथली ऑन पिल्स अँड इयरली अॅबोर्शन
नाऊ, तिचं माईंड, ब्रेन, बॉडी आर नॉट नॉर्मल
ओह, स्टिल शी प्रीटेंडस् टू बी नॉर्मल, ईजंट शी मॉडर्न ?          

अवरली क्लासवर्क अँड डेली होमवर्क 
विकली प्रॅक्टिकल अँड फोर्टनाईटली सबमिशन 
मंथली युनिटटेस्ट अँड क्वार्टरलीपण युनिटटेस्ट  
सिक्स मंथली टर्मिनल अँड इयरली फायनल्स
नाऊ, हर बॉडी इज हडकुळ, बट माईंड अन ब्रेन आर दांडगं!
ओह, स्टिल शी हॅज सम ‘न्यूनगंड’, इज शी मॉडर्न ?    
=======================================
ती कपडे निवडू शकते, पण तिचं करीअर नाही
ती मित्र निवडू शकते, पण तिचा नवरा नाही
ती कार चालवू शकते, पण तिचं आयुष्य नाही
ती कुटुंब चालवू शकते, पण तिचं डोकं नाही
ती पैसा कमवू शकते, पण तिला पैसा दिला जातो
ओह, शी एन्जोइज हर हसबंडज मनी, ईजंट शी मॉडर्न ?         

हिचे कपडे निवडते आई, पण करीअर मात्र स्वतःच निवडते
ही मैत्री सगळ्यांशी करते, पण नवरा स्वतःच निवडते
ही कारही चालवते आणि आयुष्यही
ही कुटुंबही चालवते आणि डोकंही
ही स्वतः पैसा कमवते, म्हणून नवऱ्याचा पैसा घेत नाही    
ओह, अॅट टाईम्स, हर हसबंड एन्जोइज हर मनी, इज शी मॉडर्न ? 
============================================
ती मुल वाढवू शकते, पण तिचं स्वातंत्र्य नाही,
ती आयुष्य जगू शकते, पण तिच्या नवऱ्याच्या मनाप्रमाणे !
तिचं शरीर फिट ठेवते, पण तिचं मन फिट नाही
ती किटी पार्टीला जावू शकते, पण राजकीय/सामाजिक पार्टीला नाही
ती कँडल मार्चला जाते, मेणबत्ती पेटवते, मिडियात एक बाईट देते 
ओह, आय वंडर ! शी इज अ पेज-थ्री पर्सन, ईजंट शी मॉडर्न ?

ही मुलाचं स्वातंत्र्य जपते, आणि स्वतःचही वाढवते
ही स्वतःच्या मनाप्रमाणे जगते, इतरांना जगू देते
शरीर थोडं अनफिट असलं तरी मन फुलटू फिट आहे  
कुटुंब, व्यवसाय सांभाळत समाजकारण, समाजसुधार करत आहे
ही मेणबत्तीचं पेटवत नाही, पण अनेकांचं रक्त पेटवत असते
ओह, सरप्राईज ! शी इज अ पेज-वन पर्सन, इज शी मॉडर्न ?
=============================================
तिने क्षणभराचा स्वैराचार स्वीकारला,
आणि आयुष्यभराचं स्वातंत्र्य गमावलं
‘स्वैराचाराचे प्रदर्शन हेच स्वातंत्र्य’ असं ती मानत राहिली
स्वैराचाराच्या नव्या परंपरांच्या जोखडात तिचं ‘मॉडर्न’त्व जपत राहिली
तिचं सगळंच टाकावू, तत्कालीन, अनित्य आणि दिखावू होतं
ओह, शी प्रीटेंडस् टू बी मॉडर्न ! अँड शी प्रेसेंट्स टू बी मॉडर्न !

स्वैराचार मात्र हिच्या गावीही नव्हता, घरातही नव्हता आणि दारातही नव्हता
वरपांगी तात्कालिक बंधनांच्या खाली केवळ शाश्वत, टिकावू स्वातंत्र्य होतं
‘जगाला उद्धारण्याचं’ बळ हिला याच बंधनांच्या शिस्तीतून मिळालं होतं
हिची प्रतिभा, प्रगल्भता, पौरुषत्व, पुरोगामित्व याच शिस्तीचं देणं होतं
शिस्तबद्ध स्वातंत्र्याने हिचं वैश्विक व्यक्तिमत्व फुललं होतं
ओह, शी इस रिअली मॉडर्न ! येस !! शी इस रिअली मॉडर्न !!
==============================================


---- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर १४, २०१४

सिंहगडावरील एक शिळा



सिंहगडाच्या चढणीवरची, भली थोरली एक शिळा
येती-जाती, चढती-उतरती, साऱ्यांना ही लावी लळा ... ll धृ ll  

सिंहगडाची चढण चढती, मावळे, हिलाच ओलांडून
गनिमांस गर्दीस मिळविती ते हिच्याच आडोश्यातुन
कुणा निवारा, कुणास आसरा, कुणास वाटे अस्र  
कुणी नतमस्तक, तर, कुणा लाभला कपाळमोक्ष
बोथटलेली तलवार नि भाला, हिनेच ‘धारदार’ केला .... १

अरुणाच्या प्रखरतेत तेवत, वरुणाच्या धारा झेलत
वृक्षवेलींची हिरवाई लेवत, मातीच्या मिठीत मिरवत
कधी स्मित, कधी क्षुब्ध, तर कधी निश्चल
कधी शांत, कधी उत्साही, तर कधी चंचल
नित्यनवदिनी नवलीलांचा, हिने ‘आविष्कार’ केला.... २    

गिरीप्रेमींचे लक्ष्य होई, प्रेमीयुगुलांचे भक्ष्य होई   
पांथस्थास विसावा देई, ध्यानस्थास चिरशांती देई
बच्चे नाचती, कच्चे रमती, सच्चे ध्यासती,
बागडती, हुंदडती, हिजसवे, क्षण सुंदर करती
जीवनतृष्णेच्या तृप्तीचा, हिने सदैव ‘साक्षात्कार’ केला ...३    

--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर १३, २०१४
http://yamauvach.blogspot.in

एका रविवारी (सप्टेंबर २८, २०१४) सिंहगडावर ट्रेकसाठी गेलो तेंव्हा एक शिळा मनात भरली. त्यावेळी ही कविता सहज सुचली.