आपल्या रोजच्या जीवनात
प्रत्येक क्षण काही अनुभव घेवून येत असतो. प्रत्येक अनुभवाचा प्रकार, पार्श्वभूमी,
वेळ, व्याप्ती, परिणाम हे वेगवेगळे असतात. एवढेच नव्हे तर, वास्तविक अनुभव जरी एकच
असला तरी त्यातून काढलेला अर्थ हा बदललेला असतो. कोणी एखादा अनुभव कसा घेईल याचा काही
नियम नाही. अनुभवांना ‘अनुभव’ राहू द्यावे, उगाच त्यातून ‘अर्थ’ काढत बसू नये. अनुभवांची
मजा निघून जाते.
मलाही काही अनुभव आले. ते
मी जगलो असल्याने सर्व खरे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. त्यातील काही निवडक
अनुभव येथे देत आहे. त्यातून माझे मी अर्थ काढलेच आहेत. (?!? How is that ? वरच्या
परिच्छेदात वेगळच सांगितलंय ?!?). अर्थ काढताना मी तो माझ्यापुरता काढला आहे.
अनुभव १.
आम्ही पूर्वी आकुर्डीत राहत
असू. तेंव्हाची म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सेंट उर्सुला
शाळेकडून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चांभार काका बसतात. त्यांच्याकडे
एकदा जाण्याचा योग आला. आजकाल use and throw चा जमाना असला तरी काही जुन्या ‘खोडी’
जात नाहीत. माझी तुटलेली चप्पल मी शिवायला गेलो होतो. अंगठा तुटला होता आणि लगतची थोडी
शिलाई उसवली होती. काकांकडे गर्दी नव्हती. माझीच वाट पहात असावेत असे मला वाटले.
त्यांनी चप्पल पाच मिनिटात शिवून दिली. मी ती घालून पाहिली आणि योग्य वाटली म्हणून
‘किती झाले ?’ असे विचारले.
ते म्हणाले, “दोन रुपये”. मला
आश्चर्य वाटले. एवढे कमी पैसे !
मी सहज काकांना म्हटले, “काका,
२०१२ चालू आहे. दोन रुपयात काय होणार ? एवढे कमी पैसे कसे घेता ?? चांगले पाच-दहा
रुपये घ्यायचे !”.
त्यांनी माझ्याकडे एक
कटाक्ष टाकला. काहीच बोलले नाहीत. हळुवार हसले फक्त !. मी त्यांना पाच रुपये देवू
केले. त्यांनी तीन रुपये परत केले. त्याचं ते हसू, तो कटाक्ष आणि त्यांनी परत
केलेले तीन रुपये मला अनेक दिवस अस्वस्थ करत होते.
पुढे एके दिवशी चि. पार्थने
शाळेत दप्तराचे दोन तुकडे केले. म्हणजे दप्तराची एक उसण पूर्ण निघाली. आम्ही पुन्हा
चांभार काकांकडे गेलो. माझी अस्वस्थता टिकून होती. काकांनी मला ओळखले. ते हसले.
दप्तर शिवून दिले. फक्त दहा रुपये मागितले. शिवण चांगली मोठी होती तरीही ! माझा प्रश्न
कायम होता. ‘का ? का एवढे कमी पैसे घेत असतील हे काका ??’ मी तो न राहवून
विचारलाच. म्हटले – “काका, तुम्ही फार कमी पैसे घेता. कसे परवडते तुम्हाला?”. काका
पुन्हा हळुवार हसले. त्यांचं हसू भयानक होतं. मला अस्वस्थ करणारं. काकांनी बोलावे
असे मला वाटत होते. शेवटी ते बोलले. म्हणाले, “अहो, तुम्ही मला मागेच हे सांगितले
होते. मी पैसे वाढवून मागण्याचा प्रयत्नही केला. पण अहो, जीभ रेटलीच नाही. नाही
मागता आले जास्तीचे पैसे. तुम्हाला सांगू का, आपली गरज छोटी आहे. तेव्हढयात भागतंय
की. मग कशाला मागायचे जास्तीचे पैसे ?” असे म्हणून पुन्हा ते हळुवार हसले. मी काही
बोलणार हे लक्षात येताच विषय थांबवावा म्हणून ते लगेच म्हटले, “काढा दहा रुपये!”. मी
दहा रुपये दिले.
मला तिथे थांबवेना. काकांशी
नजरही मिळवता येईना. मी खजिल झालो होतो. ज्यांना शिकवायला गेलो त्यांनीच मला
शिकवले होते. मी तेथून निघालो. मी वारंवार ते हातातले शिवलेले दप्तर आणि पायातल्या
शिवलेल्या चपला यांच्याकडे पहात होतो.
त्या उसवलेल्या दप्तराबरोबर
माझे उसवलेले तत्त्वज्ञानही शिवून मिळाले होते.
अनुभव २ :
आम्ही दीड वर्षापूर्वी मानस
पार्क, चिखली प्राधिकरण येथे राहायला आलो. आमच्या शेजारीच एक diagonal commercial complex
नावाची इमारत आहे. तेथे तळमजल्यावर अनेक दुकाने आहेत. समोर फुटपाथ आहे आणि
त्यापुढे काही अंतरावर रस्ता आहे. आमच्या पार्थला या रस्त्यावर एके दिवशी
संध्याकाळी ३५०० रुपये सापडले. पाचशेच्या सात नोटा होत्या. नोटांना चार घड्या
घातल्या होत्या. सापडले त्यावेळी मीही सोबत होतो. आम्ही सर्व दुकानदारांना व
प्रवाश्यांना विचारले. कुणीही हरवले आहेत असे सांगितले नाही. दुकानांमध्ये एक
पिठाची गिरणी आहे. तिचे मालक कायम तिथेच बाहेर बसलेले असतात.
ते म्हणाले, “पैसे
माझ्याकडे द्या. कुणी आले शोधत तर देईन मी त्याला”. मला ते पटले नाही.
मी नकार देतच म्हटले, “अहो,
मी शेजारीच राहतो मानस पार्क मध्ये. कुणी आलेच तर घेवून या माझ्याकडे”.
मी आणि पार्थ तेथून निघालो.
वाटेत पार्थने विचारले, “आपण या पैशाचे काय करणार?”. मी म्हणालो, “रक्कम मोठी आहे.
कुणीतरी शोधत येईलच. आले तर त्यास परत देवू.”
“पण आपण त्याला कसे ओळखणार
की त्याचेच पैसे आहेत म्हणून ?” पार्थ आता सुटला होता.
“हे बघ, पैसे किती सापडले
आहेत हे फक्त तुला नि मला माहित आहे. इतर कुणालाही आपण रक्कम सांगितली नाही. किती
नोटा आहेत हे ही फक्त तुला नि मला माहित आहे. जो माणूस पैसे मागायला येईल, त्याला
आपण रक्कम आणि नोटा विचारू. त्याने ते अचूक सांगितले तर समजायचे की ते पैसे
त्याचेच आहेत.”
पार्थच्या चेहऱ्यावर समाधान
होतं. ते मी पाहत होतो. असे क्षण फार कमी असतात. लहान मुले फार कमी वेळा आपल्या उत्तराने समाधानी
होतात. माझ्यात समाधानाची भावना निर्माण होणार इतक्यात पार्थने पुढचा चेंडू (म्हणजे
प्रश्न) टाकला. समाधानही क्षणभंगुर असतं, असं म्हणतात.
“समजा, पैसे न्यायला कोणी
आलेच नाही तर, ते पैसे आपले होणार काय?”. हा यॉर्कर होता.
मुलांच्या निरागसता,
कुतूहल, जिज्ञासा या सर्व सद्गुणांना मी जाम टरकतो. मुले कधी काय विचारतील याचा
नेम नाही.
“पार्थ, हे पैसे आपले
नाहीत. आपण हे कमावले नाहीत. आपण हे वापरू नाही शकत. कुणी आले नाही तर आपण हे
मंदिरात दानपेटीत टाकू. फारफार तर आपण एक महिनाभर वाट पाहू.” मी म्हणालो.
“मंदिरात का टाकायचे ते
पैसे ?” पार्थने पुढचा बाउन्सर टाकला.
“ज्या गोष्टी कुणाच्याच
नसतात, त्या देवाच्या असतात. पैसे आपले नाहीत. कुणाचे आहेत ते माहित नाही. म्हणून
देवाचे आहेत. देव मंदिरात असतो. तेथे पैसे दिल्यास ते इतरांसाठी वापरले जातील.” मी
काहीबाही उत्तर दिले.
पार्थने थांबावे अशी माझी
मनोमन इच्छा होती. तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बुद्धीबद्दलची शंका मला
दिसत होती. फलंदाज ‘लल्लू’ आहे असे समजून त्याने चेंडू टाकणे बंद केले असावे. असो.
ते पैसे घ्यायला कुणीतरी
यावे असे वाटत होते. त्याचे दोन फायदे होते. एक त्या माणसाला त्याचे पैसे मिळतील
आणि मला पार्थच्या प्रश्नांपासून सुटका!
चक्क देवाने ऐकले माझे !
दुसऱ्यादिवशी संध्याकाळी मी
आणि पार्थ हॉलमध्ये टिव्ही पाहत बसलो होतो. इतक्यात बेल वाजली. पार्थने दार उघडले.
पाहतो तर, पिठाच्या
गिरणीवाले मालक एका मनुष्यास घेवून आले होते.
म्हणाले, “हे diagonal चे वॉचमन
आहेत. त्यांचे पैसे हरवले आहेत. सकाळी त्यांचे मुकादम भेटले होते. म्हणाले, अहो, आमच्या
वॉचमनचा सगळा पगारच हरवला. मी त्यांना सांगितले कि तुम्हाला तो सापडलाय. मी वॉचमनला
घेवून जाईन त्यांच्याकडे आणि पैसे देईन.”
मी म्हणालो, “हे छानच झाले.”
दुसरा मनुष्य अत्यंत चिंताग्रस्त
वाटत होता. कपडेही व्यवस्थित नव्हते. पैसे हरवल्याची चिंता डोळ्यांवर होती.
मी रक्कम आणि नोटा
विचारल्या. त्यांनी बरोबर सांगितले. अगदी चार घडी करून ठेवल्या होत्या हे ही
सांगितले. मी विचारले, “मग, पैसे गायब कसे झाले?.” यावर तो म्हणाला, “साहेब, पँटचा
खिसा फाटका होता. लक्षातच नाही आले. कुणीतरी दिलेली आहे पँट, तीच वापरतोय. पण
साहेब, ते पैसे माझेच आहेत. कालच पगार झाला त्याचे पैसे आहेत, वाटल्यास आमच्या
मुकादमला विचारा.”
मी पार्थला पैसे आणायला
सांगितले. त्याने देव्हाऱ्यात ठेवलेले ते पैसे आणले. मी त्यालाच द्यायला सांगितले.
पार्थने पैसे दिले. त्या
माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव मी वर्णन नाही करू शकत. तो गहिवरला होता. क्षणभर शांत
झाला होता.
तेव्हढ्यात त्याने पाचशेची
एक नोट बाहेर काढली,
आणि म्हणाला, “साहेब, हे
ठेवा, तुम्ही माझा पगार मला सापडवून दिल्याबद्दल !”
मी उडालोच ! माझी विकेट
पडली होती !!
मी लागलीच भानावर येत ‘नको,
अहो असा काय करताय ?. ठेवा ते!’ असा विनंतीवजा आदेश दिला. मलाच लाजल्यासारखे झाले.
मला काही बोलवेनादेखील. मी
त्या माणसाकडे बघत राहिलो. त्याला हात जोडले. त्यानेही हात जोडले. आम्ही एकमेकांचा
निरोप घेतला.
मी आणि पार्थ घरात आलो.
पुन्हा हॉलमध्ये बसलो. पार्थने माझ्याकडे पाहिले. त्याची ही नजर मी आता चांगलीच
ओळखतो. सीमारेषेवरून पळत येवून गोलंदाजी करणारा मायकेल होल्डिंग केविलवाण्या फलंदाजाकडे
ज्या नजरेने बघत येत असेल, तशी असते पार्थची ही नजर. “पार्थ, प्लीज आता प्रश्न
नको.” मी क्रीझ सोडून पळून चाललो होतो.
पार्थ ऐकत नाही. “बाबा, ऐका
ना !”
“बोला” आमची शरणागती. मी तो
चेंडू खेळायचे ठरवले.
“बाबा, ते काका आपल्याला
पैसे का देत होते? ते त्यांचे पैसे होते ना ! मग ?” अवघड असते पालकांचे जगणे !
“अरे पार्थ, त्या काकांसाठी
३५०० रुपये ही महिन्याभराची कमाई होती. एवढी रक्कम की ज्यावर महिन्याचा सर्व खर्च अवलंबून आहे, ती
हरवणे आणि सापडणे ह्या दोन्हीही मोठ्या गोष्टी आहेत. ती रक्कम आपण त्यांना परत
केली. त्यांना आपल्याला Thank You म्हणायचे होते. ती त्यांची Thank you म्हणायची
पद्धत आहे. हरवलेल्या गोष्टी शोधून देणाऱ्याला बक्षीस देण्याची पद्धत असते. त्या
काकांना वाटले की आपल्याला बक्षीस द्यावे. म्हणून त्यांनी आपल्याला पाचशे रुपये
देवू केले.”
“मग बाबा, तुम्ही घ्यायचं
ना ते बक्षीस. तुम्ही का नाही घेतलं ते ?” पार्थने आता body line सुरु केली होती.
मी कसाबसा संयम धरून तो ही
चेंडू खेळायचा ठरवला. रक्तबंबाळ होणार होतोच.
“पार्थ, अरे ते पैसे आपले
नाहीत. त्यांच्या कमाईचे आहेत. हे सांगितलं ना मी काल तुला !?” मी त्याला टाळत
म्हटलं.
“ते नाही बाबा, बक्षीस का
नाही घेतलं?” पार्थ अशक्य बनत चालला होता. मला प्रश्नाचं उत्तर नीट येत नाही असं
जरा जरी वाटलं तरी त्याला आणखी चेव येतो.
“हे बघ, ते काका गरीब आहेत.
त्यांच्याकडे घालायला नीट कपडेपण नव्हते. त्यांना तेच पैसे अपुरे पडत असणार.
त्यांना आपण उलट मदत करायला हवी. त्यांच्याकडून बक्षीस कसं घ्यायचं रे ? चांगलं
नाही ते !! एवढं असूनही त्यांनी आपल्याला पाचशे रुपये देवू केले. अगदी सहज! हसत
हसत. किती मोठं मन होतं त्यांचं !!”
“हं”, पार्थ मधला होल्डिंग
शांत झाला की असा आवाज काढतो.
पार्थ त्याच्या टिव्ही
बघण्यात गुंग झाला. माझ्याभोवती एक प्रश्न निष्कारण गुंता करू लागला.
“ते काका गरीब आहेत” हे
वाक्य मी कुठल्या अधिकाराने वापरलं? कोणत्या अधिकाराने मी त्यांना गरीब म्हणालो? मी
सहज विचार केला, समजा माझा महिन्याभराचा पगार (साधारण एक लाख रुपये समजा) एका वॉचमनला
सापडला असता, तर मी त्याला त्याचा सातवा भाग (जसा ३५०० चा सातवा भाग ५०० होतात तसा)
म्हणजे साधारणतः पंधरा हजार रुपये बक्षीस म्हणून देवू केले असते का ? माझे
माझ्यापुरते उत्तर “नाही” असेच होते. पण त्या वॉचमनने ते मला देवू केले होते. मीच गरीब
ठरलो होतो. तो वॉचमन, त्याची मनाची श्रीमंती किती विनम्रपणे दाखवून गेला ! आणि मी
त्याला गरीब म्हटले.
माझे मन मला खात राहिले.
अजूनही खातंय. काही चुका आयुष्यात कायम लक्षात राहतात, त्यातलीच ही एक.
त्याहून भयानक चूक म्हणजे
मी पार्थला सांगणे की ते गरीब आहेत. मी नकळत गरीब / श्रीमंत हा भेद त्याला शिकवला
होता. मनाने श्रीमंत असलेला माणूस पैसे कितीही कमी असले तरीही गरीब होत नाही, हे
मी त्याला सांगायला विसरलो. आपण शब्द बोलून जातो, ते नक्कीच परिणाम करतात मुलांवर!
मुलंही ते लक्षात ठेवत असतात.
कोणताही चेंडू परत खेळता
येत नाही.
कोणताही शब्द परत घेता येत
नाही.
काही चुका दुरुस्त करता येत
नाहीत.
आयुष्यभर आपण त्यांच्या
आठवणींसोबत राहत असतो, कायमचं !
बाकी अनुभव पुढील अंकात !
No comments:
Post a Comment