Sunday, September 14, 2014

विचार ते भाव – एका प्रवासाची पूर्वतयारी



विचार ते भाव – एका प्रवासाची पूर्वतयारी

भारतीय संस्कृतीमध्ये ‘देव’ ही संकल्पना अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या मनावर रुजवली जाते. अगदी प्रत्येक कुटुंबात हे होत असतं. आमचं कुटुंबही याला अपवाद नाही. त्यात भर म्हणजे आमचे वडील म्हणजे आमचे ‘नाना’ हे श्रद्धावान वारकरी. वारकरी सांप्रदयातील प्रत्येक परंपरा, नित्यनेम यांचे पालन करण्यात आमच्या नानांचे सातत्य अचाट आहे. रोज नित्यनेमाने सकाळी काकडा आरती, वारांप्रमाणे नित्यनेमाचे अभंग, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण,  संध्याकाळचा हरिपाठ, अखंड हरीनाम सप्ताहांमधील प्रवचने, कीर्तने यांचे नियमाने श्रवण, आषाढी-कार्तिकीची न चुकता केलेली वारी, नियमित दानधर्म नि सदाचार  यात वयाच्या विसाव्या वर्षापासून ते आज वयाची सत्तरी ओलांडली तरी नानांनी खंड पडू दिला नाही, एवढे ते सातत्य ! आमचे नाना एवढे देव देव का करतात? असा प्रश्न मला कायम पडायचा नि आजही (माझी चाळीशी आली तरी) पडतो. या प्रश्नावर नानांचे उत्तर ठरलेलं असतं –
‘तो आहे, त्याला भजावे, आपले करावे!,’
इतकी  सोप्पी, साधी नि सरळ परमार्थामागची भूमिका केवळ एक सच्चा वारकरीच करू शकतो. हे पटवून देताना ‘आपला तो एक देव करोनी घ्यावा l तेणेवीण जीवा सुख नोहे ll ’ असा जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग आहे, त्याचाही नाना कायम उल्लेख करतात. अशा वातावरणात वाढताना मला ‘देव’ या संकल्पनेबाबत कुतूहल न निर्माण होते, तरच नवल !

शालेय काळापासून लागलेली ही कुतूहल वजा ओढ पुढे अभियांत्रिकीचा अभ्यास करतानाही कायम राहिली. याच काळात अनेक कीर्तने, प्रवचने यांचे श्रवण झाले. ज्ञानेश्वरीवरील प्रवचने ऐकण्याचे मला जणू वेडच लागले. अशाच एका प्रवचनात मला विज्ञान – अज्ञान – ज्ञान अशा काही अध्यात्मातील संकल्पना असतात हे कळले. ते प्रवचन ह.भ.प. डॉ. श्री. नामदेवशास्री सानप (न्यायाचार्य) की जे आज भगवानगडाचे महंत आहेत, यांचे होते. त्यांनी विज्ञान – अज्ञान - ज्ञान यांतील फरक खूप सुरेख उदाहरणे देवून निरूपण करून सांगितला. त्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायातील पहिल्या नऊ ओव्या होत्या. त्यातील काही  मुद्दाम येथे अर्थासकट देत आहे.

“एथ विज्ञाने काय करावे l ऐसे घेसी जरी मनोभावे l तरी पै आधी जाणावे l तेचि लागे ll ३ ll
मग ज्ञानाचिये वेळे l झाकती जाणिवेचे डोळे l जैसी तीरी नाव न ढळे l टेकली सांती ll ४ ll
तैसी जाणीव जेथ न रिघे l विचार मागुता पावूली निघे l तर्कु आयणी नेघे l आंगी जयाचा ll ५ ll  
अर्जुना तया नांव ज्ञान l येर प्रपंचु हे विज्ञान l तेथ सत्यबुद्धि ते अज्ञान l हेही जाण ll ६ ll
या ओव्यांचा, वै. गुरुवर्य परमपूज्य ह.भ.प. प्रा. श्री. सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांनी संपादीत केलेल्या सार्थ ज्ञानेश्वरीतील अर्थ येथे उधृत करत आहे.
(योगाच्या ज्ञानाने युक्त झालेल्या, अर्जुना,..
येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे, अशी जर तुझी मनापासून समजूत असेल, तर तेच अगोदर समजणे जरूर आहे. ll ३ ll कारण की, स्वरूपज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, ll ४ ll त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही ll ५ ll अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच, ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात, हेहि तू समज. ll ६ ll

अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या मला ‘विज्ञान आधी जाणणे गरजेचे आहे’, ही माऊलींची भूमिका कळत होती. (हो, कारण, मला समजत असलेली तेव्हढी एकच गोष्ट होती!.) पण, जाणीव, विचार, तर्क जिथे संपतात, त्याला ज्ञान म्हणावे, आणि विज्ञानाला खरे मानणे हे अज्ञान, हे माऊलींचे तत्वज्ञान काहीकेल्या झेपत नव्हते. हे म्हणजे ज्यांच्या जीवावर (म्हणजे विचार आणि विज्ञान यांच्या) आयुष्यातील उदरनिर्वाह होणार होता त्यालाच नाकारण्यासारखे होते. अशा विचारसरणीचा स्वीकार करण्याची हिंमत त्यावेळीही माझ्याकडे नव्हती आणि कदाचित, आजही नाही. आमच्या नानांमुळे लागलेली अध्यात्माची गोडी आता माझ्या आयुष्यात थोडी कोडी आणि थोडी भीती निर्माण करत होती. हे सर्व काही अजब होतं !

पण माझं वाचन, श्रवण चालू होतं. जसं जसं वाचन वाढत गेलं तसतसं प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी प्रश्न वाढतच गेले. ‘देव’ या संकल्पनेत विश्वास निर्माण होण्याऐवजी शंकाच जास्त निर्माण झाल्या. माझा विज्ञानवादी दृष्टीकोन जोमाने वाढत होता, बहरत होता, फुलत होता. याच काळात वारकरी सांप्रदायातील अनेक वाद, मतप्रवाह समोर आले. अनेकांची दांभिकता, मत्सर समोर आले. मंदिरांमध्ये देवदर्शनास उभे असताना काही अपमान झाले. श्री क्षेत्र आळंदीत माउलींची समाधी डोळे भरून पहात असताना कुणीतरी अक्षरशः मला हाताने धरून बाहेर काढले, माझ्यावर ओरडले. मला ते सहन झाले नाही. आजही आळंदीत गेलो तरी मंदिरात जात नाही. देवाला नमस्कारही फार कमी वेळा केला जातो. प्रश्न आणि शंकेची जागा आता तिरस्कार घेईल की काय असं वाटायला लागून मला माझीच लाज वाटू लागली. पण दुसरीकडे, आपण एवढेही अहंकारी असू नये, असं एक मन कायम सांगत राहायचं. कदाचित, आत्तापर्यंत केलेल्या विचारांचे ते फळ असावे असे वाटे. आमचे नाना जर केवळ श्रद्धेपोटी देवाला आपलेसे करून घेवू शकत असतील तर आपण निदान आपली बुद्धी पणाला लावून देवाबद्दलचा तिरस्कार तरी नक्कीच टाळू शकतो, असं वाटत राहायचं. एक आशेचा किरण मला जिवंत ठेवत होता. 

यथावकाश, पुढे नोकरी, व्यवसाय, वैयक्तिक उत्कर्ष आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या रहाटगाडग्यात संघर्षासोबत यश आणि सुख दोन्हीही अनुभवले खरे, पण ‘देव’ या संकल्पनेबाबत अनुत्तरीत राहिलेले प्रश्न अधून मधून डोके वर काढायचे. थोडे फार संदर्भ ग्रंथांतून झालेले वाचन आणि काही व्याख्यानांमधून झालेले श्रवण यातून माझी उत्तर शोधण्याची प्रक्रिया चालूच होती. पण विशेष यश मिळत नव्हते. माझं ‘देव शोधणं’ काहीसं थंड पडलं होतं.

दरम्यानच्या काळात एक दीड वर्षापूर्वी आम्ही आकुर्डीतील घर बदलून चिखलीतील नव्या घरी रहायला आलो. शेजारी सौ. कांचन व श्री. अभय पाटील आणि कुटुंबीय यांची सोबत लाभली. एके दिवशी आमचा मुलगा पार्थ घरातून पाच सहा तास गायब झाला. तो शोधण्याच्या प्रक्रियेत आणि आम्हाला धीर देण्यात श्री व सौ. पाटील यांची मदत झाली. श्री घळसासी सरांनी काही मंत्रोच्चार आणि सूचनांच्याद्वारे सर्व काही सुरुळीत केले. पार्थ सापडला. पाटील दम्पतींनी या संदर्भात आम्हाला श्री. घळसासी सरांना भेटण्याचा आग्रह धरला. पार्थ, पत्नी सौ. प्रार्थना, आणि मी, असे आम्ही तिघेही सरांना भेटलो. सरांनी पहिलाच प्रश्न केला – “तुम्हा दोघांपैकी रागीट आणि हट्टी कोण आहे?” पहिल्याच यॉर्कर वर आम्ही क्लिन बोल्ड झालो होतो. मी ‘रागीट’ आणि प्रार्थनाने ‘हट्टी’ असल्याची कबुली दिली. सरांनी आम्हाला वागण्याच्या काही टिप्स दिल्या. थोडी चर्चा करण्याच्या ओघात सर म्हणाले –
“देव देऊळ बांधूनही मिळत नाही आणि नाही बांधलं तरी काही फरक पडत नाही. कधी कळायचं आपल्याला?”  
वेळ कमी होता. चर्चा विशेष झालीच नाही. पण सरांचं हे वाक्य कायम मनावर कोरलं गेलं. ‘देव’ या संकल्पनेबाबत मी आत्तापर्यंत ऐकलेला हा सर्वांत संतुलित असा दृष्टीकोन होता. मी पुन्हा काही वर्षे मागे गेलो. माझा समज तपासून पाहू लागलो. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सरांकडून मिळतील की काय अशी अचानक आशा वाटून लागली. पुढे प्रार्थनाने सरांचा माईन्ड सायन्सचा कोर्स केला. सर काय शिकवतात यावर घरी दर आठवड्याला चर्चा व्हायची. अनेक विषय बोलले जायचे. माझ्या सासूबाईसुद्धा (सौ. ललिता डुंबरे) अध्यात्माच्या अभ्यासक आहेत. त्यांची ‘गुरु’ या संकल्पनेवर नितांत श्रद्धा आहे. “अध्यात्म कळायचं असेल तर गुरु करा” असा त्यांनी मला आणि प्रार्थनाला दम वजा सल्ला दिला. त्या म्हणाल्या --
“अध्यात्म अथांग असतो आणि आपले ज्ञान मर्यादित असते! स्वतः उत्तरे शोधण्यात वेळ वाया घालवू नका. शिष्याला जेव्हढी तहान तेव्हढाच गुरु मिळतो. नियतीचे संकेत वाचायला शिका. शरण जा, गुरु कल्याणच करतो”
सासूबाई ज्या अधिकाराने बोलत होत्या त्यावरून ‘माझं गुरु करणं’ आता टळणार नव्हतं. हा आता एक नवीन शोध सुरु होणार होता. पर्याय नव्हता. कदाचित, तेवढा एकच मार्ग शिल्लक होता. मी विचार करत होतो.

नानांची श्रद्धेतून अध्यात्माकडे झालेली वाटचाल, ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरीतील अगाध आणि तितकंच अगम्य ज्ञान, श्री. नामदेवशास्रींसारख्या प्रवचनकारांच्या निरुपणातून मला आलेली समज, माझं वाचन–श्रवण, कु. पार्थसोबत घडलेली घटना, श्री. घळसासी सरांचे देवाबद्दलचं ते संतुलित वाक्य, सौ. प्रार्थनासोबत होणाऱ्या चर्चा, सासुबाईंनी गुरुचे सांगितलेले महत्व, अशा अनेक गोष्टींची मी सांगड घालत होतो. हे असं काय होतंय? असे अनुभव मला का येत असावेत? अशी माणसे माझ्या आयुष्यात का आली असावीत? यातून काय साधायचं असेल नियतीला? माझ्या आयुष्याकडून काही वेगळं अपेक्षित आहे का? मी कसा घडणार आहे? माझा वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक पातळीवर काय आणि कसा उत्कर्ष होणार आहे? अशा प्रश्नांपासून तर मी कोण आहे? इथपर्यंत, अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरांची प्रचंड तहान घेवून मी रोज, एकांतातील जवळ जवळ प्रत्येक क्षण अस्वस्थ होत होतो, कासावीस होत होतो. ही अध्यात्मिक तहान आता व्याकूळ करत होती. खूप त्रास होत होता. मी अपुरा पडत होतो. आता मला गुरु हवाच होता !

अशातच, आंबोलीचे शिबीर आयोजित करण्यात आले. आम्ही सहभागी व्हायचे ठरवले. आंबोलीच्या शिबिरात सर्व स्वानंदींना पहिल्यांदा भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सेवाभाव, समर्पण आणि मुक्त वागणं मला खूप भावलं. चांगलं वाटलं. खूप दिवसांनी अशी भारावून गेलेली माणसं पाहायला मिळाली. ही सर्व माणसे ‘जिवंत’ होती.    त्यांच्या ‘जिवंतपणाचा’ सहवास लाभावा नि वाढावा, असं मनोमन वाटून गेलं. गुरु-शिष्यांमधील अनोखं नातं पाहायला मिळालं. मीही श्री. घळसासी सरांच्या माईंड सायन्सचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. ‘स्वानंदी’ व्हायचं ठरवलं !

क्लासच्या पहिल्याच दिवशी, प्रार्थनेनंतर सरांचं पहिलंच वाक्य कानी पडलं. ते म्हणाले–
“तुम्ही सारे ईश्वराचे रूप आहात. ते रूप जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्हालाच ते शक्य आहे”. 
मला ते `अधिकार आहे’ हे आजपर्यंत कुणी सांगितले नव्हते. सरांच्या ‘अधिकार’ या शब्दोच्चारातही प्रचंड उर्जा होती. सरांच्या प्रत्येक विचारावर, प्रत्येक शब्दावर मी लट्टू होत होतो. सर शरीर समजावून सांगत होते. त्याची मनाशी सांगड घालत होते. मी शब्द नि शब्द वेचीत होतो. नोट्स काढत होतो. काय लिहू नि काय नको असे झाले होते. पहिल्याच दिवशी मी मला मिळालेल्या फुलस्केप वहीची जवळजवळ पाच पाने नोट्स काढल्या. तास संपला. मी खुश होतो. कितीतरी नवीन ऐकायला मिळाले. माझ्या ज्ञानात भर पडली. पहिल्याच दिवशी सरांनी मला खिशात टाकले होते. आठवड्यानंतर पुन्हा क्लास आला. सर शरीर आणि मनाकडून आता बुद्धी, चित्त, याकडे वळले होते. सर बोलू लागले, की मी लिहू लागायचो. यादिवशी सहा पाने लिहून झाली. दोन दिवसांत (म्हणजेच क्लासच्या चार तासांत) जवळ जवळ अकरा पाने नोट्स काढल्या. (अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना एवढे कष्ट घेतले असते तर?, असो. नको त्या कटू आठवणी !). तहानच तेवढी मोठी होती. पाने तेवढी होणारच !! दोन क्लासच्यामधील आठवड्यात माझे जुने विचार आणि सरांनी दिलेले नवीन विचार यातील युद्धात माझ्या तोंडचे पाणी पळायचे, हे वेगळे सांगायला नको. जेवढा वाद मी कधी इतरांबरोबरही घातला नाही, तेवढा आता स्वतःबरोबर घालत होतो. शब्दाला शब्द देत होतो. सरांनी माझेच माझ्याशी भांडण लावून दिले होते. माझे प्रश्न पुन्हा वाढू लागले. याआधीच्या प्रश्नांचा रोख तत्वज्ञान समजून घेण्याकडे होता. आताच्या प्रश्नांचा रोख स्वतःला समजून घेण्यात होता. सुटका होण्याऐवजी मी अधिक अडकत चाललो होतो. सर सांगायचे पडणारे प्रश्न लिहून ठेवा. माझी दीड पाने प्रश्नांनी भरली होती. उत्तरे कधी मिळणार? ही तहान मला पुनःश्च अस्वस्थ करत होती. मी शब्दांची, विचारांची भांडणे सहन करत होतो. अशातच क्लासचा तिसरा दिवस आला. सर आज प्रचंड भारावून बोलत होते. म्हणत होते –
“तुम्ही माझे शब्दच ऐकणार आहात काय? माझे भाव तुम्हांला कधी कळणारच नाही का ? तुम्हाला माझी कळकळ कधी दिसणारच नाही का ? जरा शब्दांच्या बाहेर, विचारांच्या बाहेर येवून, भावविश्वात डोकावून तरी पहा ! मन आणि बुद्धीच्या पलीकडे काहीतरी आहे. त्याचा ध्यास तुम्हाला कधी लागणारच नाही का ? किती अडकून बसणार आहात ? काय कमी आहे तुमच्याकडे ? का भिक मागता ? किती दिवस असं फाटकं जगणार आहात ? पहा तरी एकदा स्वतःकडे ! एकदा विचारांच्या बाहेर येवून बघा तरी !!”

सर थांबले. संपूर्ण वर्ग थांबला होता. स्तब्ध होता. शांत होता. सरांचे डोळे पाणावले होते. आवाजात गहिवर होता. माझ्या अंगावर रोमांच होते. माझ्याही डोळ्यात पाणी होते. विचार, शब्द थांबले होते. या क्षणी माझ्यात, सरांत, वर्गात आणि वातावरणात केवळ एकच गोष्ट होती – ‘भाव’ !. अश्रू आणि रोमांच यांनी सजवलेला भाव. बाकी सर्व ‘शून्य’ झालं होतं. संपलं होतं. जणू जग जगायचंच थांबलं होतं. केवळ ‘भाव’ उरला होता. मी पहिल्यांदा तो अनुभवला. सर आम्हाला विचारांपलीकडे जायला सांगत असताना स्वतः विचारांच्या पलीकडे गेले. तेथून त्यांनी साद घातली. आम्हाला विचारांच्या पलीकडच्या प्रवासात घेवून गेले. काही क्षणच ती अनुभूती होती पण ‘भाव’ समजायला पुरेशी होती. किती सहज, ध्यानीमनी नसताना, अचानक, क्षणिक असं ते दर्शन होतं. ‘भावाचं दर्शन’ झालं होतं. ‘या अश्रूंचा, या रोमांचाचा अर्थ काय ?’ असं कुणाला विचारलं तर कुणालाही सांगता नसता आला. येणार नाही. हाच ‘भाव’! अवर्णनीय केवळ अनुभवता येतं, हे आज पहिल्यांदा कळलं. निर्गुण, निराकार, निर्विकार, निर्विचार दिसत नाही पण अनुभवता येतं. केवळ अनुभूती हाच भाव. माझा शोध संपला होता. त्यादिवशी क्लास संपल्यावर एकही विचार मनात आला नाही. काहीच भांडण झाले नाही. काहीच चर्चा झाली नाही. स्वतःशीही नाही आणि इतरांशीही नाही. सारं काही शांत झालं होतं. मीही शांत झालो होतो. रडणारं मुलं आईकडे गेल्यावर शांत होतं ना, अगदी तसं! सर माझी आई झाले होते. माऊली झाले होते. हो माऊलीच ! मला माऊलींच्या ओव्या आठवल्या.
“ तैसी जाणीव जेथ न रिघे l विचार मागुता पावूली निघे l तर्कु आयणी नेघे l आंगी जयाचा ll ५ ll अर्जुना तया नांव ज्ञान .... “
माऊलींच्या या ओव्या पूर्वी कळल्या नव्हत्या. आता थेट वळल्या होत्या. ‘जाणीव संपते, विचार मागे फिरतात आणि तर्काचे चातुर्य संपते’ याची प्रत्यक्ष अनुभूती सर देत होते. माऊलींनी यालाच ‘ज्ञान’ म्हटले आहे. सरांनी मला विचाररहित ज्ञानाची अनुभूती दिली होती. होय – सर माझे माऊलीच झाले होते.
  
भाव कळला. वळला. आता रोज वळायला हवा होता. वेगवेगळे अनुभव यायला हवे होते. भावनिक पातळीवर ते तपासून पारखून घ्यायला हवे होते. आत्तापर्यंत आलेले अनुभवही असेच तोलून मापून पाहायला हवे होते. हे असे करणे चांगले की वाईट, ह्यात मला पडायचे नव्हते. पण भावाविषयीचे आत्मचिंतन व्हायलाच हवे होते. तरच ‘भाव’ शिकता आला असता. सरांच्या सांगण्याप्रमाणे ‘भावाचेही शास्त्र आहे’, ते शिकणे गरजेचे आहे. मी कामाला लागलो. शोधू लागलो. मी मुद्दाम भूतकाळात शिरलो. आयुष्यात अयशस्वी, अनपेक्षित, द्वेषमुलक, विकारयुक्त, अपरिपूर्ण, अनियमित अशा वर्गवारीत मोडतील अशा अनेक घटना घडल्या होत्या. अगदी अभियांत्रिकीमध्ये काही विषयात नापास होणे, काही विषयात अपेक्षित यश न मिळणे, काही खूप हव्याहव्याश्या वाटणाऱ्या कंपन्या मुलाखत चांगली जावूनही न मिळणे अशा घटना माझ्यात ‘भाव’ नव्हता, हेच सांगत होत्या. काही मित्र आणि मैत्रिणी, काही नातलग यांना कळत-नकळत दुखावले, इथेही मला भावाचीच कमी दिसू लागली. अगदी माझे मुलगा कु. पार्थ सोबतचे संबंध हे देखील नकळत मी बुद्धीच्या, अहंकाराच्या पातळीवरच नेले होते. त्यालाच मी बापाचे प्रेम समजत होतो. छे ! मी चुकीचं वागत होतो !! सरांच्या भाषेत सांगायचे तर ‘मी पार्थचा पालक होण्याऐवजी मालक होवू पाहत होतो’. खरंय ते ! आत्ता कळतंय – सर्वच गोष्टी केवळ बुद्धीच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर तोलून नाही चालत, त्याला भावनेची जोड मिळायलाच हवी. भाव असायलाच हवा. नसेल तर तो आणायला हवा. आणि तो आणता येतो, हा विश्वास सरांनी दिला.

हे झाले अपयशाबद्दल! आयुष्यात अनेक चांगले, यशस्वी क्षण आले. त्यावेळचीही भावावस्था मी तपासून पाहिली.   
आठवीला शिवाजी टेक्निकल शाळेत प्रवेशप्रक्रिया संपून गेली होती. आम्हाला उशीर झाला होता. प्रवेश मिळणार नाही म्हणून मी शाळेतच रडू लागलो. त्या मुख्याध्यापकांनी माझे रडू पाहून मला प्रवेश दिला. रडलो नसतो तर ? कदाचित, मला प्रवेश मिळाला नसता नि मी अभियंता झालो नसतो. तिथे भाव होता. माझ्यात आणि मुख्याध्यापाकांत, दोहोंमध्ये भाव होता. अभियांत्रिकीतील पदविका ते पदवी हा प्रवास तर भारी आहे. पदविकेच्या तिसऱ्यावर्षी वर्गात एकोणतिसावा असणारा मी, चौथ्यावर्षी वर्गात चाचणीत पहिला, अंतिम परीक्षेत वर्गात तिसरा आणि महाराष्ट्रात पाचवा आलो. ६८ टक्क्यांवरून थेट ८८ टक्के. अशक्य वाटत होतं पण झालंय खरं ! रोज एकच जप करायचो - “मला पहिलं यायचंय” . आणि मी आलो. हा भावच होता. अशा अनेक घटना आहेत जिथे ‘भाव’ काम करून गेलाय. तो ‘भाव’ होता, हे मला त्यावेळी किंवा नंतरही का कळले नाही? पण मग मला हे आत्ता का पटतंय?. मी तर तोच होतो नि आहे. मग मला हे आधी का कळले नाही ? उत्तर सापडलं – ही विचारांची मर्यादा आहे. मला माझे विचारच परिपूर्ण आहेत असे वाटत होते. ते तसं नव्हतं. विचार ‘भाव’ असतील तरच परिपूर्ण होतात. आणि भाव असेल तरच कृती होते. हे सामान्य ज्ञान माझ्यासारख्या बुद्धीवाद्याला नव्हतं. विचार आणि भाव यांतील फरक शिकवता शिकवता सरांनी दोहोंचं कृतीसाठी एकत्र होणं शिकवलं होतं. सरांनी हा प्रकाश दाखवला होता. सर माझे गुरु झाले होते.

आता ह्या शिक्षणाचा वापर होणं गरजेचं होतं. पहिला वापर मी शिकवण्यात केला. मी रोज विद्यार्थ्यांसमोर विचार मांडत असतो. मी ते भावनेसोबत कसे आणायचे एवढाच प्रश्न होता. कसं करणार ? मी शिक्षणाचा सर्वात मोठा उद्धेश डोळ्यासमोर आणला – ‘माणूस घडवणे’. मी स्वतःशीच बोलू लागलो.—
“होय. मला माणूस घडवायचाय. ईश्वराने मला या कामासाठीच नेमले आहे. हे पवित्र काम आहे. माझे माझ्या विद्यार्थ्यांवर प्रेम आहे. उत्तमातील उत्तम ज्ञान पवित्र भावनेने मिळवण्याचा माझ्या विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. मी माझे ज्ञान १००% देवू शकतो. मी दिले पाहिजे. मी देणार. कारण तसं करणं माझं कर्तव्य आहे.” 
आहा ! खूप भारावून गेलो. अंगावर क्षणात रोमांच होते. मला रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या एका कवितेची ओळ  आठवली – “मी ईश्वराच्या जगत्कारणाच्या खऱ्या हेतूची पूर्तता मंगल” कवितेने अजून बळ दिले. बस्स ! ठरलं !! आता ह्या ओळी रोज शिकवण्यापूर्वी म्हणायच्या. माझा मंत्र तयार झाला. यंत्र आणि तंत्र याआधीच होते. यंत्र, तंत्र आणि मंत्र याचं मिलन होवून कृती होणार होती. विश्वास बसणार नाही – सांख्यिकी (Statistics) सारखा विषय शिकवतानाही माझ्या ऊर्जेबाबत, शब्द्फेकीबाबत मला चांगले अभिप्राय मिळायला लागले. ‘विषयात रस निर्माण होईल असं शिकवता’ असं एका वरिष्ठ व्यक्तीने सांगितले. एकदा तर व्याख्यान संपले तरी मुले जायला तयार नव्हती. ‘ऐकत राहावे वाटतंय’ असं म्हणाली. हा केवळ ‘भावाचा’ परिणाम होता. मी हाडाचा शिक्षक होतोच. आता ‘भावाचा’ शिक्षक झालो होतो. मी बदलत होतो. सर मला बदलवत होते.

अजून एक अनुभव आहे. तो सांगायलाच हवा. मला लिखाणाची आवड आहे. गेली २-३ वर्षे महिन्याला तीन-चार या वेगाने मी कविता करत आलोय. यातील काही कविता ह्या ‘जमून’ गेल्यात. आणि काही ‘मी का लिहिल्या?’ अशा वाटणाऱ्या आहेत. थोडी चिकित्सक आणि तटस्थ बुद्धी वापरून पाहिल्यावर असं लक्षात आलं की जिथे जिथे मी शब्दांची जुळवाजुळव करून कविता शब्दबंबाळ केली आहे, ती अतिशय टुकार झाली आहे. ती करताना प्रचंड त्रास झाला आहे आणि खूप वेळही लागला आहे. ह्या ‘भाव’ नसलेल्या कविता. ‘का केली?’ या वर्गात मोडणाऱ्या. याउलट, ज्या मला आणि मित्रांना आवडल्या त्या अशा काही मिनिटांत केलेल्या कविता आहेत. म्हणजे अगदी वर्डस्वर्थच्या “The spontaneous oveflow of powerful feelings arising from emotions recollected in tranquility” या कवितेच्या व्याख्येला धरून असलेल्या. या कवितांमध्ये ‘विचार होता. भाव होता’. एकतर माझी स्वतःची अनुभूती होती किंवा इतरांच्या अनुभवाशी मी तादात्म्य पावलो या दोनच अवस्था ह्या या कवितांमागील प्रेरणा होत्या. तिथे ‘भावनिर्मिती’ झाली आणि कविता ‘जमून’ गेली. बाकी सब झुठ था! ही प्रचिती, ही समज उलटा परिणाम करून गेली. मी कविताच लिहिणे बंद केले. गेली चार-पाच महिने एकही कविता केली नाही. भावल्याशिवाय कविता करायचीच नाही असे ठरविलेच आहे मी. (वाचले सारे वाचक!). आश्चर्य याचे आहे की या काळात अनेक विषय डोक्यात येवूनही मला एकही विषय भावला नाही. विचारांची हिंमतच झाली नाही कागदावर येण्याची. पण भावनेशी आता तडजोड करायची नाही. भाव असेल तरच लेखनप्रपंच, अन्यथा नाही. हा लेख लिहितोय हीच काय ती या काळातील माझी साहित्यिक उलाढाल!. एका अर्थाने, कवितेच्या बाबतीत सरांनी माझी ‘वाट’ लावली. माझ्या कवितेला विचारांकडून भावाच्या ‘वाटे’वर नेले.

सर सांगतात – “विचार हे वैयक्तिक आणि वैश्विक गोष्टींना वेगळे करतात. द्वैत निर्माण करतात. तर, भाव वैयक्तिक आणि वैश्विक गोष्टींना जोडतात. अद्वैत निर्माण करतात. भाव ‘दुवा’ आहे. भाव ‘सेतू’ आहे. त्या ईश्वरी शक्तीशी जोडले जा !”   मी आता असाच जोडला जात आहे. माझ्या कामाशी, माझ्या लिखाणाशी, माझ्या जवळच्या माणसांशी, माझ्या दूरच्या माणसांशी, माझ्या मित्रांशी-मैत्रिणींशी, प्राण्यांशी, वनस्पतींशी, वस्तूंशी, वास्तूंशी, समाजाशी, देशाशी, माझ्या गावाशी, माझ्या निसर्गाशी मी ‘भावाने’ जोडला जात आहे. परवा अजबच घडले. मी माझ्या बाईकवरून पुण्यात चाललो होतो. काय हुक्की आली कोणास ठावूक? वाटले – ‘या रस्त्यावरून मी अनेक वेळा प्रवास केला असेल, अनेकजण रोज करतात. रस्त्याला किती सहन करावे लागत असेल ! आपल्या प्रवासात त्याला किती त्रास होत असेल!!’  मी गाडी बाजूला घेतली. खाली उतरलो. गुढघे रस्त्यावर टेकवले. मायेने रस्त्याला दोन्ही हातांनी स्पर्श केला. डोळे आपोआप मिटून गेले. त्याच्याशी एकरूप झालो. त्याचे आभार मानले. त्याक्षणी काय वाटले हे इथे लिहिता येणे कठीण आहे. सरांनी माझ्यातला ‘अहंमय मी’ काढून त्याचे ‘प्रेममय मी’ मध्ये रुपांतर केले होते. आपल्यातला प्रत्येकजण प्रेममय असाच असतो. तो शोधावा लागतो. त्यासाठी शरण जावे लागते. गुरुकडे जावे लागते. आमच्या सासुबाईंचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. गुरूकडे जाण्याची प्रेरणा त्यांची होती. मला सर भेटावे हा ईश्वरी संकेतच होता. आयुष्यात या वेळा येत असतात. आपण जागे असायला हवे. म्हणजे त्या वेळा ‘जगता’ येतात.

भाव अनेक आहेत. कृतज्ञता भाव, कर्तव्य भाव, दातृत्व भाव, उत्तरदायित्व भाव, आत्मीयता भाव, सहकार्य भाव, स्वीकार भाव, समर्पण भाव असे कितीतरी भाव सांगता येतील. पण ‘तो जोडतो’ हे त्यामागचे एकच तत्व आहे. विचार न करण्याने आलेली ‘नेणीव’, विचार चुकीचा केल्याने निर्माण झालेली ‘उणीव’ आणि योग्य विचारांती निर्माण होणारी ‘जाणीव’ यांच्याही पलीकडे नेणारा असा हा ‘भाव’ आहे. ‘भावा’नेच कृतीला अर्थ प्राप्त होतो. ‘विचार’ तोंडचे पाणी पळवतात. ‘भाव’ त्याच पाण्यातून रस निर्मिती करतात. माझा हा ‘विचार ते भाव’ प्रवास जाणीवेकडून ज्ञानाकडे होणाऱ्या प्रवासाची पूर्वतयारी आहे. ‘भाव’ ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.

आमच्या नानांनी कधी विचारच केला नाही की देव असेल की नाही ते ! विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, भाव ठेवला नि ‘देवाशी’ एकरूप होत गेले. ज्ञानेश्वर माऊलींचा काकडा आरतीतला एक अभंग आहे, त्यातील एक चरण आहे –
“हाल का रे कृष्णा डोल का रे l घडिये घडिये गुज बोल का रे ll  हा अभंग म्हणताना नानांनी डोळे मिटलेले असतात. चेहऱ्यावर प्रचंड समाधान असते. ओठांवर चक्क आनंदाचे मंद हसू असते. नाना अक्षरशः डोलतात. तल्लीन होतात. जणू त्यांचा कृष्ण त्यांच्याशी खरेच येवून बोलत आहे. त्याच्या मनीचे गुज सांगत आहे. दोघेही सोबत डोलत असतात. आहा ! आज कळतंय, नानांच्या मनाची अवस्था काय होत असेल ते !! आज माझा ‘बाप’ मला कळतोय, माझ्यातला ‘बाप’ सुद्धा कळतोय, मीही कळतोय, सरांसारखा ‘बाप’ माणूस कळतोय, आणि तो आम्हा सगळ्यांचा ‘बाप’ही कळतोय. ही भावाची किमया आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु !   

(C) यशवंत अंबादास महाकाळ
दिनांक – जून २६, २०१४
संपर्क – ९९६०२७०६९२, yashwant.mahakal@gmail.com
पत्ता - अ-४, मानस पार्क, सेक्टर १६, प्लॉट १०१, राजे शिवाजी नगर, चिखली प्राधिकरण, पुणे – ४११०१९.  

No comments:

Post a Comment