जन्माला आलो, टाहो फोडला,
रडतच जिंदगीचा गणेशा केला
तेंव्हापासून प्रत्येकजण
शिकवतच आलाय
आमच्या घरचं पब्लिक, दारचं
पब्लिक ... सगळे तस्सेच ! मास्तर लेकाचे... !!
पब्लिक होतेच... त्यात
भरीला भर ... भारंभार पुस्तके
सोबत भडकवणारी, भटकवणारी
परिस्थिती...
कायपण साली शिकवायची !!
पुस्तक ‘विज्ञान’ दाखवायचं
...तर परिस्थिती ‘अज्ञान’ !
पब्लिकने ‘माज’ शिकवला...
घरच्यांनीपण आणि
दारच्यांनीसुद्धा ...
‘मोडलं तरी चालेल पण वाकणार
नाही’ ...
गिरे तो भी टांग उपर... हाच
तो ‘माज’ शिकवला,
कायपण सालं ‘शिक्षण’ होतं
!!
पुढे पुस्तकेच ‘मोठी’ होत
गेली,
परिस्थितीच आणखी ‘शहाणी’
होत गेली
पब्लिक आता ‘माजा’सोबत
‘खाज’ ही शिकवू लागलं होतं
तिघांच्याही
गर्भसंस्कारांनी आयुष्य आता
गुंतागुंतीचं, गर्दीचं,
गर्तेचं आणि गर्वाचं झालं होतं
गं .. गं ... गं ... गं
कायपण सालं शिक्षण होतं !!
वय वाढलं ... तसं
पदव्या वाढल्या, पदं वाढली,
पैसा वाढला, प्रसिद्धी वाढली
आता अडचणीही वाढत होत्या...
सुट म्हणता सुटत नव्हत्या
‘माजा’पायी पुस्तके कधीच
बंद केली होती
‘खाजा’पायी परिस्थिती आता
हाताबाहेर गेली होती
पब्लिक आता शिकवायचं सोडून मागे
खेचायला लागलं होतं
खेचताना पडलेला पाहून
हसायला लागलं होतं
विचारांनी कृतीला सोडचिठ्ठी
दिली होती ...
निष्क्रीयतेशी नवा संसार
मांडला होता
आणि ‘निराशा’ आणि ‘विकार’
या दोन गोंडस अपत्यांना जन्म देवून
तिने ‘वांझोटी’ हा कलंक आता
पुसला होता.
विचार आता दोहोंच्या
संगोपनात व्यस्त होते...
‘निराशा’ आणि ‘विकारांना’ बापाचे
प्रेम देत होते
दोषांचे उदात्तीकरण करता
करता
खोटी खोटी प्रगल्भता शिकत
होते
कायपण साले शिक्षण होते ...
कायपण साले शिक्षण होते !!
आता ‘निराशा’ आणि ‘विकार’
वयात आले
निराशा २५ प्रपोजल नाकारून
२६ व्याशी लग्न करती झाली
पण लग्नानंतर २७ व्या
दिवशीच बापाकडे येवून राहिली
He is a hopeless character
असं तिचं नवऱ्याबद्दल मत आहे...
विकाराचे काही विचारू नका
...
लग्नाआधीची ३ , लग्नानंतरची
३ आणि १ लग्न अशी सात लफडी
एकाचवेळी सांभाळत आहे ...
त्याच्यापुढे विचारांचं
डोकं आउट आहे...
पोरगं कुठे शिकलं असेल एवढं
? ... असे वाटून तो चाट आहे !
कायपण सालं शिक्षण आहे ...!
कायपण सालं शिक्षण आहे ...!!
विचार आणि गात्रे आता थकली
आहेत
पर्वताएवढं दुःख आता रोजचं
आहे
जवाएवढं सुखही आता दुरापास्त
आहे
अनुभवाच्या नावाखाली
अडचणींचा डोंगर आहे
आणि
आनंद, समाधान आणि शांती हे
केवळ
तत्वज्ञानाच्या क्रमिक
पुस्तकातले तीन शब्द म्हणून उरले आहेत,
यांचा अनुभव ही तर लांबची
गोष्ट ...
साधा समानार्थी शब्द
शोधतानाही फे फे होतेय
पुस्तक, परिस्थिती आणि
पब्लिक यांच्या शाळेच्या विद्यार्थ्याला
एवढंसुद्धा जमू नये
छ्या ... कायपण सालं शिक्षण
आहे ...! कायपण सालं शिक्षण आहे ...!
दहा दिवस झाले मरून
आपल्याला
पिंडाला कावळा शिवला नाही आपल्या
...
खाली पृथ्वीवर ‘अतृप्त
आत्मा’ म्हणून घोषित केलय आणि
इथे वर यमाजीराजे आता क्लास
घेत आहेत –
शिकवताहेत -
“निर्मिती (creation) मी
केली आहे, तू फक्त देखभाल (maintenance) करायची ...
तू नेमकं उलट करतो ---
तू निर्मिती करायला जातोस
... मग मला देखभाल करावी लागते !!”
तुझ्या भावना, विचार, वेळ
आणि श्वास मी नियंत्रित करतो रे,
तुला फक्त जगायचं असतंय ...
मोकळं व्हायचं असतंय
तेवढं सोडून तू सर्वकाही
करतोस...आणि अडकत जातोस
मोकळा हो, बाळा, मोकळा हो
जन्मताना मोकळा रडलास ना
तसा ...
आणि लक्षात ठेव ...
‘मोकळं जगायला शाळा लागत
नाही’,
हेच खरं कळणं आहे, हेच खरं
वळणं आहे,
हेच खरं शिक्षण आहे, हेचतर
सालं शिक्षण आहे !”
‘यम’ यशवंत महाकाळ
१५ सप्टेंबर, २०१४
No comments:
Post a Comment