Monday, September 29, 2014

‘माती आणि पिंपळ’




कविवर्य श्री. शंकर वैद्य परवा गेले. माणूस गेल्यानंतर आठवणी येतातच. श्री शंकर वैद्य यांच्यासोबतची एक आठवण आहे. ती आठवण खूप दिवस झाले अर्धवट लिहून ठेवली होती. कधी विचारही केला नाही की, श्री. वैद्य सर जातील तेंव्हा ती आठवण पूर्ण लिहून काढावी लागेल. काही गोष्टींच्या वेळा कधी हातून निसटून जातात हेच कळत नाही.

मला आठवतंय... १९९५-९६ चे वर्ष होते ते ...

मी व्ही.जे.टी.आय मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मराठी वाङमय मंडळाचा (मवामं) कार्यवाह म्हणूनही  काम पहात होतो. बरेच कार्यक्रम करायचो आम्ही! दरवर्षी ‘प्रतिबिंब’ हा आमचा ‘युथ फेस्टिवल’ देखील फार उत्साहात साजरा व्हायचा. यात नेहमी मराठी वादविवाद स्पर्धा भरवली जायची. साहजिकच ‘मराठी जास्त कळते’ (?!... वासरांत लंगडी गाय ) म्हणून आमच्या मंडळाच्या कुणाकडे तरी अशा स्पर्धांचं आयोजन यायचं. मग विषय निवडणं, जाहिरात करणं, परीक्षक बोलावणं या गोष्टी ओघाने आल्याच. मी यावेळी काही बड्या साहित्यिक हस्तींना भेटता यावे म्हणून त्या स्पर्धेचं आयोजनही माझ्याकडेच मागावून घेतलं होतं. (पदाचा फायदा की गैरवापर!) आमचा परममित्र मंगेश जोशी जनरल सेक्रेटरी होता. त्याने ते मला देवू केलं. मवामंचे अध्यक्ष श्री. नाईक सर अशा आयोजनामध्ये मदतही करायचे.

‘परीक्षक कोण असावे?’ यावर श्री नाईक सर सुचवतील ते साहित्यिक आम्ही भेटून नक्की करायचे, असं ठरलं. सरांनी आम्हाला माटुंग्याच्याच रुईया कॉलेजमध्ये मराठी शिकवणाऱ्या आणि कॉलेजच्या मागच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या साहित्यिक सौ. पुष्पा भावे यांचं नाव सूचवलं. दूरदर्शनवर नेहमी हसतमुख बातम्या देणारे श्री. अनंत भावे यांच्या त्या पत्नी. आमच्या मवामंच्या दोन कार्यकर्त्यांना (बहुतेक मिलिंद जोशी आणि अमित जोशी असावेत, आता नक्की आठवत नाही) सोबत घेवून मी भर दुपारी आमच्या लंच टाईम मध्ये सौ. भावे मॅडमच्या घरी पोहोचलो. मॅडम घरातच होत्या. त्यांनीच दार उघडले. आम्ही रितसर नमस्कार केला. भावे मॅडमनी दारातच उभे राहून ‘काय काम आहे?’ असं विचारलं. मी ‘व्ही.जे.टी.आय – प्रतिबिंब – वादविवाद स्पर्धा – परीक्षण’ हा सर्व कार्यकारणभाव भावे मॅडमना दारातच उभे राहून दोन-तीन वाक्यात समजावून सांगितला. ‘मी असल्या छोट्या मोठ्या स्पर्धांचं परीक्षण करत नाही. माफ करा !’ अशी दोनच वाक्य बोलून भावे मॅडमनी दरवाजा बंद करण्याची तयारी सुरु केली. त्यांची देहबोली ‘या आता !’ असंच सांगत होती. आमची एका दिग्गज साहित्यिकाशी भेट अवघ्या चार-पाच वाक्यात, तेही जिन्यात सुरु होवून उंबरठ्याच्या अलीकडेच संपली. फार मोठा अपेक्षाभंग होता तो! आम्ही हिरमुसलो. अवाक् होवून परत निघालो. अनंत भावेंचं हसू आणि भावे मॅडमची ‘ती दोन वाक्ये’ यांच्यातील विरोधाभासावर आम्ही जोरदार आश्चर्य व्यक्त करत पुन्हा निमुटपणे व्ही.जे.टी.आय. चा रस्ता धरला. वाटेत, ‘ए, अश्याऽ काय त्याऽऽ ?’ ही मिलिंद जोशीची साजूक तुपात तळलेली कमेंट या सर्व प्रसंगाचा एका वाक्यात सारांश सांगून गेली.

या पहिल्याच प्रसंगामुळे आणि त्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे मराठी वाङमयाच्या साहित्यिकांना भेटायचा माझा उत्साह एव्हाना मावळायला सुरुवात झाली होती. ‘साहित्यिक असं कसं वागू शकतात?, टी.व्ही.वर हे किती छान बोलतात! मग प्रत्यक्ष भेटीत हे असे का वागतात?’ अशा अनेक प्रश्नांवर आमची नुकतीच हिरमुसलेली मनं विचार करू लागली होती. तशातच आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. फ्रेश वाटावं म्हणून कँटीनमधला चहा घेतला. चहा पिता पिता ‘आपल्या वादविवाद स्पर्धेला पहिली ‘पनौती’ लागली’ असं आमचा अम्या जोशी म्हणाला. (जोशीच असले तरीही बोलण्यात मिलिंद आणि अमित ही दोन टोके होती!) अम्या म्हणाला तशी भावना खरंच होती आम्हा सर्वांची! मनात राग होताच. चहा मारल्यावर आम्ही नाईकसरांकडे गेलो. तो सर्व राग आम्ही नाईक सरांसमोर काढला.

सरांनी सर्व प्रसंग ऐकला. ते फक्त हसले आणि शांतपणे म्हणाले, “अरे, असतील त्यांच्या काही अडचणी किंवा पूर्वानुभव!. स्वभावही असतो एकेकाचा! तुम्ही तुमचे काम करत रहा. उगाच विश्वाची चिंता नको. इथे जवळच, चालत, पाच मिनिटांच्या अंतरावर कवी श्री. शंकर वैद्य राहतात, त्यांना विचारा. भेटून या त्यांना. तुम्हाला वेगळा अनुभव येईल. त्यांनी काही वर्षापूर्वी आपल्या मंडळासाठी कार्यक्रम केला होता. व्ही. जे. टी. आय. मध्ये  येवून गेले आहेत ते.”

“चालेल, पण सर, तुम्ही त्यांना एकदा फोन करून सांगा ना की आम्ही येतोय म्हणून. म्हणजे ते आम्हाला निदान घरात तरी घेतील!” मी चिडूनच म्हणालो. माझ्यातला आधीच ठासून भरलेला कुचकटपणा भावे मॅडमनी वाढवायला मदत केली होती. मी ताक फुंकून पित होतो. अजून अपमान नको होते.

“नाही, मी तसं करणार नाही. जा. भेटा. अनुभव घ्या.” सर ठाम होते. कार्यक्रमांच्या आयोजनातून शिकता यावे, म्हणून सर असं नेहमी करायचे.

आम्ही माना डोलावल्या आणि परत आपापल्या वर्गांकडे निघालो. एव्हाना आमचे दुपारचे एक लेक्चर बुडाले होते. मंगेश जोशीच्या भाषेत ही ‘दुनियादारी’ करताना असले छोटे मोठे ‘त्याग’ करावेच लागतात. जाताना ‘उद्या लंचला भेटू’ असं म्हणून आम्ही निरोप घेतला आणि उरलेल्या वेळेपुरते तथाकथित अध्ययनकार्याला वाहून घेतले ! 

डोक्यातून भावे मॅडम जात नव्हत्या आणि वैद्य सरांनी ‘उद्या घरात घेतलेच नाही तर!’ ही भीती मला ‘रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनिंग’च्या लेक्चरमध्येही उगाच गरम करून गेली. काय विषय नि काय अवस्था ! काही दिवसच त्यांचे वेगळेपण घेवून येत असतात.

अखेर तो दिवस संपला. दुसरा सुरु झाला. आज हवेत जरा सकाळपासूनच गारवा होता. दुपारचे ऊनही कमी होते. लंचला ठरल्याप्रमाणे आम्ही कँटीनमध्ये भेटलो. ‘वैद्य सरांकडे जावून येवू’ असे मी म्हटले. मिलिंद आणि अमित दोघेही ‘दुपारी प्रॅक्टिकल असल्यामुळे नाही येवू शकत’ असं म्हणाले. काय बुडवायचं आणि काय नाही याची समज अभियांत्रिकीच्या मुलांना चांगली असते, असा माझा आजवरचा अनुभव आहे. मी एकटा उरलो. ‘मी जावून येतो’ असं म्हटल्या म्हटल्या अम्याने ‘ऑल द बेस्ट’ करून अंगठा वर केला. एखादी मैत्रीण असती तर तिने माझ्या कपाळाला कुंकू लावून ‘विजयी भव’ असं म्हणत आरती ओवाळली असती. भावे मॅडमने ह्या परीक्षकशोधनाच्या कार्यक्रमाचा भाव उगाच वाढवून ठेवला होता. ‘फार काहीतरी ग्रेट करतोय’ असा उगाच वाटत होतं किमान तसा भास तरी होत होता. मी निघालो.

पाचच मिनिटांत मी वैद्य सरांच्या घरी पोहोचलो. सर घरातच होते. त्यांनीच दार उघडले. मी रितसर नमस्कार केला. मी “सर, मी व्ही.जे.टी.आय. मधून आलोय,” असं म्हणून सुरुवात करणार इतक्यात, माझं वाक्य अर्ध्यावर कापत सर म्हणाले, “अहो, आधी आत तर या, असं दारात उभं राहून बोलू नये. चांगलं दिसत नाही ते ! या, आत या.” मी आत आलो. मला हॉलमधल्या सोफ्यावर बसवून ते आत गेले. मी तोपर्यंत घरावर नजर फिरवली. अनेक पुस्तके, छान सजावट, मोकळी ऐसपैस जागा असलेले त्यांचे घर मला भारी वाटले. सर बाहेर आले ते हातात पाण्याचा ग्लास आणि बिस्किटे असलेला ट्रे घेवूनच! उंच किडकिडीत शरीरयष्टी असलेले, सतेज कांतीचे, पांढरा शुभ्र सदरा घातलेले, चष्म्यातून विशिष्ट नजरेने पाहणारे वैद्य सर, त्यांच्या या आदरातिथ्याने मला खूप सुखद धक्का देवून गेले. कालचा निराशामय अनुभव पुसून टाकण्यासाठीच आज एक आशादायी अनुभव जन्म घेत होता. मी एव्हाना भावे-अनुभव विसरलो होतो. आपलं मन फार अजब असतं.

ट्रे टीपॉयवर ठेवत सर सोफ्यासमोरील खुर्चीत बसले आणि म्हणाले, “उन्हातून आला आहात, आधी पाणी घ्या.” मी ठार वेडा झालो. मी पाणी प्यायलो.

“बोला, काय काम काढले व्ही.जे.टी.आय.ने ?” सरांनी विषयाला हात घातला.
“सर, ‘प्रतिबिंब’ या आमच्या युथ फेस्टिवलची वादविवाद स्पर्धा आहे, तिचं परीक्षण करायचे होते. आपला एक अर्धा दिवस वेळ हवा होता.” मी कमीतकमी शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला.
“कधी?”
मी वेळ-वार-तारीख सांगितली.
“विषय काय असतील?”
मी विषय सांगितले.
“चांगले आहेत विषय. वाद होतील असे आहेत. छान. करीन मी परीक्षण !.”
“स्पर्धक कोण – मुंबईचे विद्यार्थी का ?”
“हो. मोस्टली इंजिनीअरिंगचे”
“वा!”
“सर, आम्ही तुम्हाला न्यायला येवू.”
“नको, मी चालत येतो. तुम्ही कष्ट घेवू नका. तशी औपचारीकताही नको”  

समोर काय घडत होते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. चार-पाच मिनिटांत आम्ही जवळजवळ सर्व मुद्धे संपवले होते. माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य सरांनी ताडले असावे. ते लागलीच म्हणाले,
“काय झालं?”
“काही नाही सर, मला वाटलं होतं की तुम्ही नाही म्हणाल !. तुम्ही येणार नाहीत स्पर्धेला !!”
“का?, तुम्हाला नको असेल तर मी ‘नाही’ म्हणतो !” असं म्हणून सर जोरात हसले.

मला रहावले नाही. मी काल घडलेला प्रसंग सांगितला.
सर त्यावर कोणतेही भाष्य न करता फक्त “मी येतोय, काळजी करू नका” असं म्हणाले.
“अहो, तुमचं नाव नाही सांगितलंत ?” सरांनी विषय बदलला.
ह्या सर्व टेन्शन मध्ये मी खरंतर ते विसरलोच होतो.
“यशवंत महाकाळ, थर्ड ईयर प्रोडक्शन इंजिनीअरिंग, व्ही.जे.टी.आय.” मी एका दमात म्हणालो.
“गाव कोणतं तुमचं?” काहीसं कुतूहल भरलेल्या नजरेने विचारलं.  
“सर, ओतूर, जुन्नर तालुक्यातील, पुणे जिल्हा!” मी काहीसं हसत, काहीसं लाजत म्हटलं.

सरांचं गावंही ‘ओतूर’ आहे, हे मला माहीत असूनही मी ती ओळख सुरुवातीला दाखवायची नाही असं ठरवलं होतं. हा भावे-प्रयोगाचा परिणाम होता.

“का रे, ‘मांदारणे’ हे खरं गावाचं नाव सांगायला लाज वाटते का तुला?”

सर, बोचऱ्या अहो-जाहोच्या भाषेतून थेट मोकळ्या एकेरीवर आले. मला हायसे वाटले. सरांनी मी लपवलेले माझे मूळ गाव ओळखले होते. सरांनी थोड्या अधिकारानेच हा प्रश्न केला होता.

“सर...ते...” मला शब्द फुटेना. माझी चोरी पकडली गेली.
“अरे, महाकाळ म्हणजे मांदारण्याचे, मग तू ‘ओतूर’ का सांगतोस?. ओतूर माझे गाव आहे. तुझे गाव नाही. तुझे गाव मांदारणेच.” सर मोठ्याने हसत हसत म्हणाले.
“सर, माझं गाव लहान आहे. कुणाला विशेष माहीत नसते. म्हणून मग जवळचं ‘ओतूर’ सांगत असतो.”
“काहीही सांगतोस, हे काय, मला आहे की माहीत !”
यावर आम्ही दोघेही हसलो. मी आता खुललो होतो. दोन गाववाले भेटले होते.
सर थोडे नोस्टाल्जिक झाले, म्हणाले, 
“अरे, मी लहान असताना, तुमच्या गावी शाळा नव्हती, तेंव्हा तुमच्या गावची पाटलाची पोरं ओतूरला शिकायला यायची. चालत यायची. नदी ओलांडून. त्या पाटलाचं नाव नक्की आठवत नाही, बहुतेक ‘भाऊ’ पाटील असावं.”  भाऊ पाटील हे आमच्या गावातील बडे प्रस्थ होते. आज त्यांचा पुतळा आहे आमच्या गावात ! त्यांची तिसरी पिढी आता वयात आली आहे.
“सर, माझंही चौथीपर्यंतचं शिक्षण ओतूरला, जीवन शिक्षण मंदिरमध्ये झालंय.” मी संबंध जोडत म्हणालो.
“वाह, खेड्यातल्या शिक्षणाची मजा काही वेगळीच असते.!” सर म्हणाले.

मग, आम्ही दोघांनी, ओतूरच्या गल्ल्या, पेठा, झाडं, मंदिरे, शाळा, आळ्या, वेशी, वाड्या, वस्त्या, डोंगर, टेकड्या, नद्या, ओहोळ, जत्रा, श्रावणी सोमवार, कुस्त्यांचे आखाडे हे सारं आठवलं. ओतूरच्या थोर व्यक्तिमत्वांची चर्चा केली. त्यात संत तुकारामांच्या गुरूंपासून ते अनिल अवचट, सुभाष अवचट यांपर्यंत सर्वजण आले. त्यातल्याच एका थोर व्यक्तिमत्वाच्यासोबत माझी बालबुद्धीची चर्चा सुरु होती. माझे अहोभाग्य!

“तुझ्या गावच्या डोंगरावर गेला आहेस काय कधी? त्याच्या पलीकडे गेला आहेस काय कधी?”

“नाही”

“अरे, आम्ही लहान असताना ओतूर, फापाळेशिवार, रोहोकडी, धावशी, अहिनवेवाडी, सारणी, तुझ्या गावचा डोंगर, काय त्याचे नाव - ?”

“सर, भामगिरी..” मी म्हणालो.
“पण, तुम्ही त्याला ‘भामगिरी’ नाही म्हणत” सर चूक दाखवून म्हणाले. “ ‘भामगिरी’ पुस्तकी नाव आहे.”   
“सर, ‘भामकाई’, ‘भामकाई’चा डोंगर’ म्हणतो आम्ही” माझी दुरुस्ती लगेच आली.
“आत्ता कसं, खरा गाववाला वाटतो.” सर हसले, पुढे बोलू लागले,
“तर तुझ्या गावचा डोंगर, तेथून चौधरवाडी,उदापूर, तांबेमळा, मग पुन्हा ओतूर असं मोकाट हिंडायचो. गावची माती पायाखाली तुडवायचो.”
“सर, मी आजही उन्हाळ्याच्या सुट्टीत गुरं-बैल घेवून ‘भामकाई’च्या पायथ्याशी चारायला घेवून जातो.”
मी अधिक मोकळा होत होतो.
“तुला गुरं ‘वळायला’ जातो, असं म्हणायचं आहे का ?” सर आता अधिक मिश्कील प्रश्न करत होते.

माझ्यातील बनावट शहरीबाणा ते हळूहळू बाहेर काढत होते. त्यांनी माझ्यातला गाववाला पक्का ओळखला होता. सरांनी अस्सल ‘गावठी’ शब्द वापरून माझ्यातला ‘गुराखी’ही जागा केला.  

“हो” मी लाजतच म्हणालो. हसलो.
“अरे, ही आपल्या मातीची सेवा आहे. तू केलीस तर त्यात लाज कसली. प्रत्येकाने करावी. मन मोकळं ठेवून करावी. अभिमानानं करावी” सर बोलत होते.

आहा, एक सिद्धहस्त कवी, लेखक त्याच्या गावाबद्दलच्या अस्सल भावना त्याच्याच गावच्या एका वाङमयवेड्या, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मनमोकळेपणाने अतिशय भावूक होवून सांगत होता. काही वेळाच मंतरलेल्या असतात. सकाळच्या गारव्याचा, दुपारच्या उतरलेल्या उन्हाचा अर्थ आता कळत होता. निसर्गातील तो गारवा, ती ऊब मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. सर मला ती अनुभूती देत होते. सर्वकाही सुंदर होतं!

“माती कधी सोडू नये. माती कधीच घात करत नाही. ती कमी देईल कधी कधी. पण उपाशी नाही ठेवणार.” सरांची कवितेसदृश्य अशी ही काही वाक्ये प्रत्यक्ष माझ्या कानावर येत होती.

“ही माती, तिची संस्कृतीच आपल्याला इथपर्यंत घेवून आली, तीच आपल्याला मोठं करत असते. तुलाही ती मोठी करेल. सर्वांनाच ती मोठी करते. वाढवते.” सर अधिक भावूक होत होते.

दोन अनोळखी व्यक्तींना माती किती कमी क्षणांत किती जवळ आणू शकते, त्यांच्यातील अंतर किती पटकन मिटवू शकते, याचा प्रत्यय देणारा एक प्रसंग माझ्यासमोर घडत होता. मी मंत्रमुग्ध होत होतो. सरांनी आपल्या गावाबाबत बोलत राहावे, मी ऐकत राहावे, असे वाटत असतानाच, सर भानावर येत अचानक “असो” म्हणाले.

“अधून मधून एखाद्या कार्यक्रमाला मला ओतूरचे ग्रामस्थ बोलावतात. ओतूरला जातो तेंव्हा कपर्दीकेश्वरावर जाणे होते. आपल्या मातीचा सुंगध, आपल्या मांडवी नदीच्या तीरावरची हवा पुन्हा अनुभवतो. तेवढीच आपली खरी कमाई. तेवढेच आपले भाग्य.” सरांचा आवाज बदलला होता. अधिक कापरा झाला होता.

इतक्यात, सरांनी तो भावनावेग आवरला नि म्हणाले, “बरे वाटले तुला भेटून. माझा ‘गुराखी’ गाववाला भेटला. तू काही काळजी करू नकोस. मी येतो परीक्षणाला.” आता संभाषण थांबणार होते. आनंदाचे क्षण आयुष्यात कमीच असतात. सरांनी भेटीला पूर्णविराम दिला. मी तो नाईलाजाने स्वीकारला. मी सरांची वेळ न घेता आलो होतो, याची मला जाणीव होतीच.  

“थँक्स अ लॉट सर, मलाही छान वाटले. स्पर्धेच्या आदल्यादिवशी सर मी फोन करीन तुम्हांला.” मी सोफ्यावरून उठत म्हणालो.

“त्याची गरज नाही. विसरणार नाही मी. कार्यक्रमात काही बदल झाला तर मात्र आठवणीने फोन कर” सर स्पष्ट आणि मोजकं बोलतात, हे एव्हाना मला उमगलं होतं.

सर मला दारापर्यंत सोडायला आले. आम्ही शेवटचं ‘बाय’ केलं. मी निघालो.

मी व्ही.जे.टी.आय.कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली दाट उंच झाडी प्रसन्न करणारी सावली देत होती. मी रस्त्यावरच्या मातीकडे पाहत चालत होतो. माझ्या गावची माती आणि सरांनी सांगितलेलं ‘मातीचं महात्म्य’ माझ्या मनात सारखं घोळत होतं. घर करत होतं. पक्कं होत होतं. एके ठिकाणी अचानक खूप गारवा जाणवला. मी थांबलो. मी सहज वर पाहिलं, तो एक उंच डेरेदार पिंपळ होता. मला सरांची आठवण आली. त्यांनी नुकत्याच उल्लेख केलेल्या कपर्दीकेश्वराची आठवण आली. कपर्दीकेश्वरालगतच्या टेकडीसदृश्य भागावर, श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या (संत तुकाराम महाराजांचे गुरु) समाधीमागे असलेल्या मैदानावर बरोबर मध्यभागी असाच एक मोठा, उंच पिंपळ आहे. त्याच्या पारावर बसल्यावर दुपारच्या भर उन्हातही कमालीचा गारवा जाणवतो. ओतूरच्या मातीत रुजलेला, वाढलेला आणि सदोदित गारवा देणारा हा पिंपळ. सरही मला त्या पिंपळासारखे वाटले. ओतूरच्या मातीत रुजलेले, वाढलेले आणि कायम गारवा देणारे! वातावरणातील प्रसन्नता, गारवा, ऊब, सरांची वाक्ये, मातीबद्दलचे प्रेम, ओढ या सर्व उत्कट भावनांनी माझं मन भिजून निघत होतं. मी क्षणभर डोळे बंद करून तेथेच उभा राहिलो. तो पिंपळ आठवला. तो गारवा आठवला. सर आठवले. गावची माती डोळ्यासमोर आणली. आहा.. काय तो क्षण होता! हा क्षण मी कायम मनात साठवून घेतला. डोळे उघडले आणि पुन्हा चालू लागलो.            
              
काही मिनिटातच व्ही.जे.टी.आय.आलं. मी कँटीनपर्यंत पोहोचलो. काल याच वेळी मिलिंद, अमित आणि मी मनाच्या अतिशय उद्विग्न अवस्थेत होतो आणि आज, मी, अगदी त्याच वेळी मनाच्या अतिशय उत्कट अवस्थेत होतो. दोन मराठी साहित्यिक मान्यवरांनी दिलेले, मनावर कायमचे संस्कार करणारे, दोन टोकाचे हे अनुभव ! निसर्ग आणि नियती माणसाला कायम आश्चर्यचकित करत आले आहेत. मी तरी त्याला अपवाद कसा असणार !

आज ‘ओतूर’ माझी सासुरवाडी आहे. कायम जाणे-येणे असतेच. वेळ मिळाला की मी माझी शाळा पाहून येतो. कपर्दीकेश्वरावर जावून येतो. मांडवीच्या पाण्यात पाय बुडवून येतो. गेल्या लग्नसराईत ओतूरला एक लग्न होते. मे महिन्यातल्या दुपारची वेळ होती. एकटाच चालत कपर्दीकेश्वरावर गेलो. मांडवीवर पाय थंड केले. चप्पल हातात घेतली. पाय मातीला लागले. मातीची ऊब पायाला मिळत होती. मी टेकडी चढलो. समाधीमागच्या मैदानावर गेलो आणि ‘त्या’ पिंपळाच्या झाडाखाली मांडी घालून बसलो. तोच गारवा अनुभवला! वैद्य सरांबरोबरची भेट आठवली. सर आठवले. त्यांची माती बद्दलची ती वाक्ये आठवली. आहा...मी डोळे बंद करून घेतले. शांत बसलो. डोळ्यांच्या कडा, काही क्षणातच, नकळत, ओल्या झाल्या.                        

परवा वैद्यसर गेले. मला मातीची ऊब शिकवून गेले. पिंपळाच्या सावलीचा गारवा देवून गेले.

‘गेले’ असं कसं म्हणू ?

मातीची ऊब तर कधीच संपणार नाही. ‘त्या’ पिंपळाच्या सावलीचा गारवादेखील कधीच संपणार नाही.

मग ‘सर गेले’ असं तरी का म्हणू ?

‘सर’ आहेत !        


--- यम (यशवंत महाकाळ)
सप्टेंबर २९, २०१४.   

Tuesday, September 23, 2014

अनुभव : काही कोडी - काही उत्तरं




आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक क्षण काही अनुभव घेवून येत असतो. प्रत्येक अनुभवाचा प्रकार, पार्श्वभूमी, वेळ, व्याप्ती, परिणाम हे वेगवेगळे असतात. एवढेच नव्हे तर, वास्तविक अनुभव जरी एकच असला तरी त्यातून काढलेला अर्थ हा बदललेला असतो. कोणी एखादा अनुभव कसा घेईल याचा काही नियम नाही. अनुभवांना ‘अनुभव’ राहू द्यावे, उगाच त्यातून ‘अर्थ’ काढत बसू नये. अनुभवांची मजा निघून जाते.

मलाही काही अनुभव आले. ते मी जगलो असल्याने सर्व खरे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. त्यातील काही निवडक अनुभव येथे देत आहे. त्यातून माझे मी अर्थ काढलेच आहेत. (?!? How is that ? वरच्या परिच्छेदात वेगळच सांगितलंय ?!?). अर्थ काढताना मी तो माझ्यापुरता काढला आहे.

अनुभव १.

आम्ही पूर्वी आकुर्डीत राहत असू. तेंव्हाची म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सेंट उर्सुला शाळेकडून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चांभार काका बसतात. त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. आजकाल use and throw चा जमाना असला तरी काही जुन्या ‘खोडी’ जात नाहीत. माझी तुटलेली चप्पल मी शिवायला गेलो होतो. अंगठा तुटला होता आणि लगतची थोडी शिलाई उसवली होती. काकांकडे गर्दी नव्हती. माझीच वाट पहात असावेत असे मला वाटले. त्यांनी चप्पल पाच मिनिटात शिवून दिली. मी ती घालून पाहिली आणि योग्य वाटली म्हणून ‘किती झाले ?’ असे विचारले.

ते म्हणाले, “दोन रुपये”. मला आश्चर्य वाटले. एवढे कमी पैसे !

मी सहज काकांना म्हटले, “काका, २०१२ चालू आहे. दोन रुपयात काय होणार ? एवढे कमी पैसे कसे घेता ?? चांगले पाच-दहा रुपये घ्यायचे !”.

त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. काहीच बोलले नाहीत. हळुवार हसले फक्त !. मी त्यांना पाच रुपये देवू केले. त्यांनी तीन रुपये परत केले. त्याचं ते हसू, तो कटाक्ष आणि त्यांनी परत केलेले तीन रुपये मला अनेक दिवस अस्वस्थ करत होते.

पुढे एके दिवशी चि. पार्थने शाळेत दप्तराचे दोन तुकडे केले. म्हणजे दप्तराची एक उसण पूर्ण निघाली. आम्ही पुन्हा चांभार काकांकडे गेलो. माझी अस्वस्थता टिकून होती. काकांनी मला ओळखले. ते हसले. दप्तर शिवून दिले. फक्त दहा रुपये मागितले. शिवण चांगली मोठी होती तरीही ! माझा प्रश्न कायम होता. ‘का ? का एवढे कमी पैसे घेत असतील हे काका ??’ मी तो न राहवून विचारलाच. म्हटले – “काका, तुम्ही फार कमी पैसे घेता. कसे परवडते तुम्हाला?”. काका पुन्हा हळुवार हसले. त्यांचं हसू भयानक होतं. मला अस्वस्थ करणारं. काकांनी बोलावे असे मला वाटत होते. शेवटी ते बोलले. म्हणाले, “अहो, तुम्ही मला मागेच हे सांगितले होते. मी पैसे वाढवून मागण्याचा प्रयत्नही केला. पण अहो, जीभ रेटलीच नाही. नाही मागता आले जास्तीचे पैसे. तुम्हाला सांगू का, आपली गरज छोटी आहे. तेव्हढयात भागतंय की. मग कशाला मागायचे जास्तीचे पैसे ?” असे म्हणून पुन्हा ते हळुवार हसले. मी काही बोलणार हे लक्षात येताच विषय थांबवावा म्हणून ते लगेच म्हटले, “काढा दहा रुपये!”. मी दहा रुपये दिले.

मला तिथे थांबवेना. काकांशी नजरही मिळवता येईना. मी खजिल झालो होतो. ज्यांना शिकवायला गेलो त्यांनीच मला शिकवले होते. मी तेथून निघालो. मी वारंवार ते हातातले शिवलेले दप्तर आणि पायातल्या शिवलेल्या चपला यांच्याकडे पहात होतो.

त्या उसवलेल्या दप्तराबरोबर माझे उसवलेले तत्त्वज्ञानही शिवून मिळाले होते.




अनुभव २ :

आम्ही दीड वर्षापूर्वी मानस पार्क, चिखली प्राधिकरण येथे राहायला आलो.  आमच्या शेजारीच एक diagonal commercial complex नावाची इमारत आहे. तेथे तळमजल्यावर अनेक दुकाने आहेत. समोर फुटपाथ आहे आणि त्यापुढे काही अंतरावर रस्ता आहे. आमच्या पार्थला या रस्त्यावर एके दिवशी संध्याकाळी ३५०० रुपये सापडले. पाचशेच्या सात नोटा होत्या. नोटांना चार घड्या घातल्या होत्या. सापडले त्यावेळी मीही सोबत होतो. आम्ही सर्व दुकानदारांना व प्रवाश्यांना विचारले. कुणीही हरवले आहेत असे सांगितले नाही. दुकानांमध्ये एक पिठाची गिरणी आहे. तिचे मालक कायम तिथेच बाहेर बसलेले असतात.

ते म्हणाले, “पैसे माझ्याकडे द्या. कुणी आले शोधत तर देईन मी त्याला”. मला ते पटले नाही.

मी नकार देतच म्हटले, “अहो, मी शेजारीच राहतो मानस पार्क मध्ये. कुणी आलेच तर घेवून या माझ्याकडे”.

मी आणि पार्थ तेथून निघालो. वाटेत पार्थने विचारले, “आपण या पैशाचे काय करणार?”. मी म्हणालो, “रक्कम मोठी आहे. कुणीतरी शोधत येईलच. आले तर त्यास परत देवू.”  

“पण आपण त्याला कसे ओळखणार की त्याचेच पैसे आहेत म्हणून ?” पार्थ आता सुटला होता.

“हे बघ, पैसे किती सापडले आहेत हे फक्त तुला नि मला माहित आहे. इतर कुणालाही आपण रक्कम सांगितली नाही. किती नोटा आहेत हे ही फक्त तुला नि मला माहित आहे. जो माणूस पैसे मागायला येईल, त्याला आपण रक्कम आणि नोटा विचारू. त्याने ते अचूक सांगितले तर समजायचे की ते पैसे त्याचेच आहेत.”

पार्थच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ते मी पाहत होतो. असे क्षण फार कमी असतात.  लहान मुले फार कमी वेळा आपल्या उत्तराने समाधानी होतात. माझ्यात समाधानाची भावना निर्माण होणार इतक्यात पार्थने पुढचा चेंडू (म्हणजे प्रश्न) टाकला. समाधानही क्षणभंगुर असतं, असं म्हणतात.

“समजा, पैसे न्यायला कोणी आलेच नाही तर, ते पैसे आपले होणार काय?”. हा यॉर्कर होता.

मुलांच्या निरागसता, कुतूहल, जिज्ञासा या सर्व सद्गुणांना मी जाम टरकतो. मुले कधी काय विचारतील याचा नेम नाही.  

“पार्थ, हे पैसे आपले नाहीत. आपण हे कमावले नाहीत. आपण हे वापरू नाही शकत. कुणी आले नाही तर आपण हे मंदिरात दानपेटीत टाकू. फारफार तर आपण एक महिनाभर वाट पाहू.” मी म्हणालो.  

“मंदिरात का टाकायचे ते पैसे ?” पार्थने पुढचा बाउन्सर टाकला.

“ज्या गोष्टी कुणाच्याच नसतात, त्या देवाच्या असतात. पैसे आपले नाहीत. कुणाचे आहेत ते माहित नाही. म्हणून देवाचे आहेत. देव मंदिरात असतो. तेथे पैसे दिल्यास ते इतरांसाठी वापरले जातील.” मी काहीबाही उत्तर दिले.

पार्थने थांबावे अशी माझी मनोमन इच्छा होती. तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बुद्धीबद्दलची शंका मला दिसत होती. फलंदाज ‘लल्लू’ आहे असे समजून त्याने चेंडू टाकणे बंद केले असावे. असो.

ते पैसे घ्यायला कुणीतरी यावे असे वाटत होते. त्याचे दोन फायदे होते. एक त्या माणसाला त्याचे पैसे मिळतील आणि मला पार्थच्या प्रश्नांपासून सुटका!

चक्क देवाने ऐकले माझे !

दुसऱ्यादिवशी संध्याकाळी मी आणि पार्थ हॉलमध्ये टिव्ही पाहत बसलो होतो. इतक्यात बेल वाजली. पार्थने दार उघडले.
पाहतो तर, पिठाच्या गिरणीवाले मालक एका मनुष्यास घेवून आले होते.  
म्हणाले, “हे diagonal चे वॉचमन आहेत. त्यांचे पैसे हरवले आहेत. सकाळी त्यांचे मुकादम भेटले होते. म्हणाले, अहो, आमच्या वॉचमनचा सगळा पगारच हरवला. मी त्यांना सांगितले कि तुम्हाला तो सापडलाय. मी वॉचमनला घेवून जाईन त्यांच्याकडे आणि पैसे देईन.”
मी म्हणालो, “हे छानच झाले.”
दुसरा मनुष्य अत्यंत चिंताग्रस्त वाटत होता. कपडेही व्यवस्थित नव्हते. पैसे हरवल्याची चिंता डोळ्यांवर होती.
मी रक्कम आणि नोटा विचारल्या. त्यांनी बरोबर सांगितले. अगदी चार घडी करून ठेवल्या होत्या हे ही सांगितले. मी विचारले, “मग, पैसे गायब कसे झाले?.” यावर तो म्हणाला, “साहेब, पँटचा खिसा फाटका होता. लक्षातच नाही आले. कुणीतरी दिलेली आहे पँट, तीच वापरतोय. पण साहेब, ते पैसे माझेच आहेत. कालच पगार झाला त्याचे पैसे आहेत, वाटल्यास आमच्या मुकादमला विचारा.”

मी पार्थला पैसे आणायला सांगितले. त्याने देव्हाऱ्यात ठेवलेले ते पैसे आणले. मी त्यालाच द्यायला सांगितले.
पार्थने पैसे दिले. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव मी वर्णन नाही करू शकत. तो गहिवरला होता. क्षणभर शांत झाला होता.
तेव्हढ्यात त्याने पाचशेची एक नोट बाहेर काढली,
आणि म्हणाला, “साहेब, हे ठेवा, तुम्ही माझा पगार मला सापडवून दिल्याबद्दल !”

मी उडालोच ! माझी विकेट पडली होती !!
मी लागलीच भानावर येत ‘नको, अहो असा काय करताय ?. ठेवा ते!’ असा विनंतीवजा आदेश दिला. मलाच लाजल्यासारखे झाले.
मला काही बोलवेनादेखील. मी त्या माणसाकडे बघत राहिलो. त्याला हात जोडले. त्यानेही हात जोडले. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

मी आणि पार्थ घरात आलो. पुन्हा हॉलमध्ये बसलो. पार्थने माझ्याकडे पाहिले. त्याची ही नजर मी आता चांगलीच ओळखतो. सीमारेषेवरून पळत येवून गोलंदाजी करणारा मायकेल होल्डिंग केविलवाण्या फलंदाजाकडे ज्या नजरेने बघत येत असेल, तशी असते पार्थची ही नजर. “पार्थ, प्लीज आता प्रश्न नको.” मी क्रीझ सोडून पळून चाललो होतो.

पार्थ ऐकत नाही. “बाबा, ऐका ना !”

“बोला” आमची शरणागती. मी तो चेंडू खेळायचे ठरवले.

“बाबा, ते काका आपल्याला पैसे का देत होते? ते त्यांचे पैसे होते ना ! मग ?”  अवघड असते पालकांचे जगणे !  

“अरे पार्थ, त्या काकांसाठी ३५०० रुपये ही महिन्याभराची कमाई होती. एवढी रक्कम की  ज्यावर महिन्याचा सर्व खर्च अवलंबून आहे, ती हरवणे आणि सापडणे ह्या दोन्हीही मोठ्या गोष्टी आहेत. ती रक्कम आपण त्यांना परत केली. त्यांना आपल्याला Thank You म्हणायचे होते. ती त्यांची Thank you म्हणायची पद्धत आहे. हरवलेल्या गोष्टी शोधून देणाऱ्याला बक्षीस देण्याची पद्धत असते. त्या काकांना वाटले की आपल्याला बक्षीस द्यावे. म्हणून त्यांनी आपल्याला पाचशे रुपये देवू केले.”

“मग बाबा, तुम्ही घ्यायचं ना ते बक्षीस. तुम्ही का नाही घेतलं ते ?” पार्थने आता body line सुरु केली होती.

मी कसाबसा संयम धरून तो ही चेंडू खेळायचा ठरवला. रक्तबंबाळ होणार होतोच.

“पार्थ, अरे ते पैसे आपले नाहीत. त्यांच्या कमाईचे आहेत. हे सांगितलं ना मी काल तुला !?” मी त्याला टाळत म्हटलं.

“ते नाही बाबा, बक्षीस का नाही घेतलं?” पार्थ अशक्य बनत चालला होता. मला प्रश्नाचं उत्तर नीट येत नाही असं जरा जरी वाटलं  तरी त्याला आणखी चेव येतो.

“हे बघ, ते काका गरीब आहेत. त्यांच्याकडे घालायला नीट कपडेपण नव्हते. त्यांना तेच पैसे अपुरे पडत असणार. त्यांना आपण उलट मदत करायला हवी. त्यांच्याकडून बक्षीस कसं घ्यायचं रे ? चांगलं नाही ते !! एवढं असूनही त्यांनी आपल्याला पाचशे रुपये देवू केले. अगदी सहज! हसत हसत. किती मोठं मन होतं त्यांचं !!”

“हं”, पार्थ मधला होल्डिंग शांत झाला की असा आवाज काढतो.

पार्थ त्याच्या टिव्ही बघण्यात गुंग झाला. माझ्याभोवती एक प्रश्न निष्कारण गुंता करू लागला.

“ते काका गरीब आहेत” हे वाक्य मी कुठल्या अधिकाराने वापरलं? कोणत्या अधिकाराने मी त्यांना गरीब म्हणालो? मी सहज विचार केला, समजा माझा महिन्याभराचा पगार (साधारण एक लाख रुपये समजा) एका वॉचमनला सापडला असता, तर मी त्याला त्याचा सातवा भाग (जसा ३५०० चा सातवा भाग ५०० होतात तसा) म्हणजे साधारणतः पंधरा हजार रुपये बक्षीस म्हणून देवू केले असते का ? माझे माझ्यापुरते उत्तर “नाही” असेच होते. पण त्या वॉचमनने ते मला देवू केले होते. मीच गरीब ठरलो होतो. तो वॉचमन, त्याची मनाची श्रीमंती किती विनम्रपणे दाखवून गेला ! आणि मी त्याला गरीब म्हटले.

माझे मन मला खात राहिले. अजूनही खातंय. काही चुका आयुष्यात कायम लक्षात राहतात, त्यातलीच ही एक.   
त्याहून भयानक चूक म्हणजे मी पार्थला सांगणे की ते गरीब आहेत. मी नकळत गरीब / श्रीमंत हा भेद त्याला शिकवला होता. मनाने श्रीमंत असलेला माणूस पैसे कितीही कमी असले तरीही गरीब होत नाही, हे मी त्याला सांगायला विसरलो. आपण शब्द बोलून जातो, ते नक्कीच परिणाम करतात मुलांवर! मुलंही ते लक्षात ठेवत असतात.

कोणताही चेंडू परत खेळता येत नाही.
कोणताही शब्द परत घेता येत नाही.

काही चुका दुरुस्त करता येत नाहीत.
आयुष्यभर आपण त्यांच्या आठवणींसोबत राहत असतो, कायमचं !    

बाकी अनुभव पुढील अंकात !