Tuesday, February 18, 2014

वारस




शिवसेना काय नि मनसे काय, बोलाचीच आहे चुरस 
दोन्ही पक्षात भरला आहे, नुसता आळस एके आळस

धोरणांच्या जागी निघतात, केवळ तोंडातून वाफा
नसलेल्या मुद्द्यांवर गुद्दादेण्या निघे यांचा ताफा

टोल, मराठी, भैय्या, छट यांचेच पडले मनसेला
शिवस्मारक, शिववडा, जैतापूर याशिवाय सुचेना सेनेला

रोगापेक्षा यांचा असतो इलाजच येथे जालीम
बोंबा आणि ठोसा यांची रोजच मिळते तालीम

साहेबांच्या बोंबांमागे सुद्धा होता एक पवित्र उद्धेश
साहेबांच्या गुद्दयात नव्हता कधी नौटंकीचा लवलेश

साहेबांची दिशा स्वतःची, संघटनेची, जनकल्याणाची
शिवसेनेची दिशा सेक्रेटरीची, मनसेची दिशा सरकारची

साहेबांनी घडवल्या प्रेमाने कार्यकर्त्यांच्या पिढ्या,
नि घामाने उभारल्या वेळोवेळी कर्तृत्वाच्या गुढ्या

आता कार्यकर्तेच घडवत आहेत पुढल्या काही पिढ्या
त्या घडवतानाही या नेत्यांच्या कपाळी पडती आढ्या

वारस म्हणवती बाळासाहेबांचे, नसे एकही गुण
प्रदर्शन नि भाषण तेवढे घेतले, कस दिला टाकून

शिवसैनिक घडवणाऱ्या साहेबांनी स्वतःचा वारस घडवला नाही
साहेबांना ‘महाराष्ट्राचे काय होईल?’ असे जराही वाटले नाही !

शिवरायानंतर मावळ्यांनी चालविली, जशी दीड शतके शिवशाही
तशी सेना सैनिकही चालवतील, पण आड येते नेत्यांचीच ठाकरेशाही   

--- यम (यशवंत महाकाळ)
फेब्रुवारी १७ , २०१४ 
 

No comments:

Post a Comment