Thursday, January 31, 2013

उथळ आणि खोल

तो होता उथळ, ती होती खोल
भेटीअंती पहिल्याच, झाले मनोमिलन

तिने त्याला तिच्या मनाची खोली दिली,
त्याने तिला उथळ असे काही क्षण दिले.

कधी उथळ कधी खोल गप्पा होत होत्या
दोहोंमधील प्रेमाला आता त्या पूरक होत्या

पुरुषप्रधान संस्कृतीत वाढले होते दोघे,
याचेच परिणाम नकळत या नात्यात दिसत होते

नात्यामधला उथळपणा हळू हळू वाढत होता
नात्यामधल्या खोलीलाही कमी कमी करत होता

उथळपणा जिवंत ठेवण्यासाठी खोली रोज मरत होती, 
उथळपणातील आनंद शोधताना खोली हरवून बसली होती

तिने खोली हरवली होती..पण स्वतः हरली नव्हती
स्वतःला पुन्हा शोधण्याची ताकद ती विसरली नव्हती 

विचार केला, धीर धरला, एकाग्र ती राहिली
उथळपणा कमी करण्याची खुणगाठ तिने बांधली

गप्पा तिने चालू ठेवल्या, विषय मात्र बदलले
उथळपणा, उपभोग जावून त्याग आणि प्रेम आले

शरीर सोडून मनाकडे यावे असे त्याच्या बुद्धीला सांगितले
उपभोगाच्या महालातून त्याला त्यागाच्या मंदिरात आणले

त्याग त्याला जड गेला, विचारच तसा नव्हता केला
विचार पुरा नाही, सरावही हवा, असा टोला तिने दिला.

उपभोगाची सवय टाळून त्यागाची सवय हवी होती
शाश्वत प्रेमाच्या वृक्षासाठी अश्या बीजाची गरज होती

तिचा हेतू त्याला पटला, प्रेमापोटीच सारे आहे
उपभोगापेक्षा त्यागातील आनंद मोठा आहे.

उपभोग सोडताना त्रास होत होता, सहन त्याने केला
स्वतःचे मन मारून, प्रेमासाठी त्यागाचा श्रीगणेशा केला

आता त्याग रोजचा आहे, उपभोगाची उरली आठवण
त्यागाने बहरलेला प्रेमवृक्ष पाहून त्याचे भरून येते मन

भरल्या मनी विचार करी, आत्ता त्यागच सर्वस्व आहे
मग सुरुवातीपासून उपभोगाचे एवढे का वर्चस्व आहे ?

विचारी तो खोलीला, तुला कसा त्याग कळतो, मला का नाही
उत्तर तिचे सोपे---" स्वभाव कळतो, पण स्वीकार आणि बदल होत नाही "

"पुरुषाला शाप मोहाचा, स्रीला मर्यादेचे वरदान, हे स्वभाव जरी खरे
स्रीने पौरुषत्व घ्यावे, पुरुषाने मर्यादी, त्यागी व्हावे हे बदल करावे बरे! "

Wednesday, January 30, 2013

थांबला तो संपला

यश अपयश हे सापेक्ष असते...
कोणत्यातरी संदर्भातून अथवा प्रमाणाशी तुलना करून ते मोजले जाते ... निव्वळ यश किंवा निव्वळ अपयश अशी गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. संधी, धोरण, दिशा, साधनसंपदा, मनुष्यसंपदा, प्रयत्न आणि नशीब यावर यश अवलंबून असते. या सातांपैकी पहिली संधी आणि शेवटचे नशीब हे पूर्णपणे मानवाच्या हातात नाही....जसा जन्म आणि मृत्यू माणसाच्या हातात नाही तसेच...
उरलेले पाच म्हणजेच धोरण, दिशा, साधनसंपदा, मनुष्यसंपदा आणि प्रयत्न एवढेच मानवाच्या हातात आहे. पण या पाचांमध्ये अचूकता आणणे माणसाला शक्य नाही (कारण अंतिम सत्य न उलगडल्यामुळे) . तो त्या दृष्टीने प्रयत्न मात्र करू शकतो. तरीही या पाचामधला काही अंश माणसाला अगम्यच राहतो.

माणसाला जेंव्हा उद्दिष्टे साध्य होत नाहीत, म्हणजेच यश मिळत नाही, त्यावेळी त्याची कारणमीमांसा करताना "संधी मिळाली नाही" अथवा "आमच्या नशिबात नव्हते" अशा प्रकारची बेजबाबदारपणाची आणि भेकडता दर्शवणारी विधाने करतो. याउलट, मला अपयश का आले? याचा माझ्या ज्ञानाशी आणि कर्तृत्वाशी काही संबध आहे का? याचा पडताळा करून पाहणारी धैर्यशील, जबाबदार, संवेदनशील आणि सत्यशोधक व्यक्तिमत्वेच त्यांची उद्दिष्टे पूर्ण करू शकतात. यशावर हक्क हीच माणसे सांगू शकतात. बाकी सारे अपयशाचे धनी. गमतीचा भाग असा की, उद्दिष्टपूर्तीसाठी प्रचंड ध्यास बाळगणारी, सायास करणारी ही व्यक्तिमत्वे उद्दिष्टप्राप्तीनंतरसुद्धा प्रचंड अस्वस्थ असतात, पुढची उद्दिष्टे त्यांना खुणावत असतात. न सापडलेली सत्ये त्यांना कायम आकृष्ट करत असतात....ही व्यक्तिमत्वे हे खरे कर्मयोगी. हे खरे संतुलित मन... हे खरे स्थितप्रज्ञ.

मला कधी कधी असे वाटते की, अशा माणसांचे त्यांच्या उद्दिष्टांवर लक्षच नसते मुळी ! त्यांचे लक्ष केवळ त्यांच्या ज्ञानवृद्धी आणि कर्तृत्व-सुधार यांवर असते. ही प्रक्रिया कायम सुरु असते . या वाटेवर, एका क्षणी, ज्ञान आणि कर्तृत्व आपोआप अशा पातळीवर येवून पोहोचतात की जे उद्दिष्टपूर्तीसाठी पुरेसे असतात. या क्षणी ही मंतरलेली व्यक्तिमत्वे एवढी बेभान झालेली असतात, की यश मिळाले आहे, आपले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, याचेही भान त्यांना राहत नाही. ज्या ज्ञान, कर्तृत्व आणि यश याने मुग्ध होवून आपण या माणसांवर, या क्षणी, अभिनंदनाचा वर्षाव करत असतो... त्याच क्षणी, त्या कल्लोळातही, ही व्यक्तिमत्वे त्याच ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या आणि यशाच्या मर्यादा, त्रुटी , झालेल्या चुका यांच्या वर्षावात मनापासून न्हावून निघत असतात. आपण थांबलेलो असतो... ते दोन पाऊले मागे गेलेले असतात... पुढची दोन पाऊले अधिक ज्ञानाची आणि अधिक कर्तृत्ववान टाकण्यासाठी ...! अंतिम सत्याला आव्हान देण्यासाठी...!! ते मिळणार नाही हे माहित असताना सुद्धा....!!!

अंतिम सत्य शोधताना अपयश येणार आहे हे माहित असतेच या व्यक्तिमत्वांना... मग का शोधा? असल्या पराभूत वृत्तीने विचार न करता, ही व्यक्तिमत्वे, समस्त चराचर विश्वाच्या कल्याणाचा एकच ध्यास घेवून आपले ज्ञान आणि कर्तृत्व कायम पणास लावत असतात.... कधीही न थांबता.... कधीही न संपण्यासाठी...!!

लहानपणी ओतूरच्या जीवन शिक्षण मंदिर या शाळेत शिकताना शाळेच्या हौदावर "थांबला तो संपला" असे मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेले असायचे... त्याचा खरा अर्थ आज हा उतारा लिहिताना कळतोय...

...... यम

Monday, January 28, 2013

नशीब

माणसाचे यश हे अनेक गोष्टींसोबत नशिबावर अवलंबून असते, असे अनेकजण म्हणतात.
कोणाचे नशीब जास्त चांगले तर कोणाचे जास्त वाईट असेही तर्कवितर्क चालू असतात.
मला समजलेला नशिबाचा अर्थ मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.---

मला कळलेल्या माणसाच्या काही मर्यादा अशा -
१. माणूस वेळेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो केवळ त्याच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकतो.
२. माणसाच्या मनात कोणते विचार येतील यावर त्याचे नियंत्रण नसते. मनात आलेल्या विचारांवर तो केवळ प्रक्रिया करू शकतो.
३. माणसाने केलेल्या कृतीचा नेमका काय परिणाम होईल अथवा काय फळ मिळेल यावरही त्याचे नियंत्रण नसते.
४. माणसाला सत्याचा ध्यास आहे पण सत्याच्या अनुभूतीपासून त्याला कायम वंचित रहावे लागते.

आणि गंमत अशी आहे की,
या मर्यादा जरी अमान्य केल्या तरीही, एक गोष्ट मान्य करावी लागेल की -
'प्रत्येक माणसाला वेळ, विचार, कृतीचे फळ आणि सत्याची अनुभूती यांची समान संधी निसर्गतः उपलब्ध असते.'.
वेळ सर्वांकडे २४ तासच आहे...
विचार निर्माण होण्याची प्रक्रिया सदोदित सुरुच असते .... सर्वांमध्ये सारख्याच वेगाने
फळाची समान संधी सर्वांकडे आहे ...
सत्याची ओढ सर्वांमध्ये तेवढीच आहे.... अगदी खोटे बोलणाऱ्या मध्येही !

पण ही समान संधी , माणसाला ज्ञानाअभावी कळत नाही वा कर्तृत्वाअभावी फलद्रूप करता येत नाही.
निसर्गाने (निर्मिकाने ) या गोष्टी मानवाला देताना अन्याय केला नाही ... समभाव ठेवला.

या मर्यादांमुळेच माणसाचे यशही मर्यादीत राहिले आहे...
यालाच त्याने नशीब म्हटले....
नशीब म्हणजेच माणसाला न उनगडलेल्या, वर उल्लेखलेल्या या चार मर्यादांचा एकत्रित परिणाम होय...!
समान संधीचा अर्थ आपण असाही लावू शकतो कि... सर्वांचे नशीब सारखेच असते ...
भिन्न असतात त्या दिशा, प्रयत्न, नियंत्रण आणि सत्य शोधकता. हीच भिन्नता प्रत्येकाचे यश भिन्न करते .
प्रत्येकाचे नशीब सारखेच असते .

अमर्याद यश आणि अमर्याद अपयश यांपासून माणसाला वंचित ठेवण्यासाठी 'नशीब' या संकल्पनेचा प्रभावशाली उपयोग निर्मिकाने केला असावा असे मला वाटते... संतुलन साधण्याचा त्याचा हाही एक मार्ग असावा, कदाचित !

..... यम

Friday, January 11, 2013

Facts, Feedback and Figues

Facts are frequently falsified by feedback and figures.

- said this during a programme on root cause analysis...

- ha anupras (alliteration) alankar ahe.