Sunday, March 17, 2013

प्रेम आणि वासना

माझ्या वासनेला तू प्रेम समजलीस
प्रेमात पडलीस, मलाही पाडलंस, 
आता मी प्रेम करू लागलो तर,
तुला माझ्या प्रेमात वासना दिसू लागली
माझ्या प्रेमाचा दर्जा हलका ठरवू लागलीस …!

प्रेम आणि वासना यातला फरक फक्त तुलाच कळतो का गं ?!

एवढेच जर कळते तुला, तर,
एकच मागणे आहे ….
एकदा तरी, नीट ओळख, अन
माझ्या प्रेमाला प्रेमच म्हण, अन,
माझ्या वासनेला वासना !

दोघांचही स्वतःच एक स्थान आहे,
त्यांचा आदर कर,
त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहेच,
तू कितीही अमान्य केलस, तरीही
परावलंबित्व देखील आहेच !

त्यांतील सहजता बघ, सुंदरता बघ , सत्यता बघ
तुला प्रेम आणि वासना अभिन्न वाटतील,
असे अनेक क्षण मी तुझ्यासोबत अनुभवलेत
तुही अनुभव !

बघ जमतंय का ते …
कर माझ्यासाठी एवढं , एकदातरी !

Sunday, March 10, 2013

हे प्रशांतसूर्या...!



असंख्य सूर्यांच्या असंख्य किरणांमधील उर्जा
ज्याक्षणी तेजोमय प्रकाश ओकत होती
त्याक्षणी पृथ्वीवरील काही अभागी शरीरं 
असंख्य अंधारयातना भोगत होती
त्यांत तुही होतास,
तुझ्या वाट्याचा अंधार सहन करत …!
निर्मिकाच्या निर्मितीतील मर्यादांचे
क्रूर वास्तव हसत हसत झेलीत, शांतपणे…!

ना कधी त्रागा केलास, ना कधी चिडलास
ना कधी सहानुभूती मागितली, ती कधी स्वीकारली
ना कधी  'त्या'च्या मर्यादांचा उद्धार केलास 
ना कधी दुर्दैवी नि दुर्बलांच्या पंक्तीत बसलास
भौतिक अंधाराच्या  मर्यादा तू कायमच तुच्छ मानल्यास
अन, आत्मिक चैतन्याच्या कक्षा नियमित रुंदावत नेल्यास
स्वतःची दुःखे विसरून, इतरांची आपली मानलीस,
जगत-कल्याणाची ताकद स्वतःत निर्माण करत राहिलास, समर्थपणे ….!

तुझे अंतरीचे चैतन्य, आज, ज्ञानाचा प्रकाश घेवून आले आहे
तुझे सखोल ज्ञान, आज, अनेकांचे ज्ञान-चक्षु बनले आहे,
तुझे अभिनव उपक्रम, आज, अनेकांना उत्कर्षाची प्रेरणा देत आहेत,
तुझी सुबोध उत्पादने, आज, अनेकांचे जीवन सुखकर करत आहेत,
आणि, तू स्वतः, आज, या भारतवर्षाचा आदर्श बनला आहेस
एवढी उंची गाठल्यावरही तू यशाने बेभान होत नाहीयेस,
विनम्रपणे जमिनीवरच राहून, तू, अंतरात्म्याची खोली शोधत आहेस
अंतरीच्या चैतन्याला आव्हान देत आहेस, नवतेज निर्मित आहेस, विजीगिषु वृत्तीने ….!

हे प्रशांतसूर्या,
तुझ्या याच तेजात ताकद आहे,
त्या असंख्य सूर्यांच्या असंख्य किरणांनी
निर्माण केलेला अंधार मिटवण्याची,
तिमिरमुक्त सृष्टी निर्माण करण्याची …!
त्यासाठीच,
मित्रा, तू तळपत राहा …!!

Sunday, March 3, 2013

शिस्तीत फुललेलं प्रेम

भेटू म्हणालास, भेटला नाहीस
बोलू म्हणालास, बोलला नाहीस
लिहिन म्हणालास, लिहिलही नाहीस
वेळ पाळीन म्हणालास, पाळली नाहीस
शब्द पाळीन म्हणालास, पाळला नाहीस
प्रेम आहे म्हणतोस, मग करत का नाहीस ?
शिस्तीचे तू गोडवे गातोस, मग अंगी बाणत का नाहीस ?
किती वेळा समजावू, पण कळत का नाहीस?
कळलं जरी थोडं, मग वळत का नाही ?

का बोलतेय मी हे सार काही ? हक्काने की अधिकाराने ?
पण तळमळ वाटते, काळजी वाटते आपल्या प्रेमाची,
प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून बोलते रे सार
शिस्त नाही तर प्रेम कसे करणार ?
कल्पनेने कधी प्रेम करता येते का ?
स्वप्ने रंगवून कधी प्रेम वाढते का?
बेशिस्त माणसे प्रेम नाही करू शकत
केले तरी टिकवू नाही शकत
ऐक - "शिस्त ही प्रेमाची पहिली पायरी आहे".

"ए हलो, असा गुडग्यात डोके घालुन काय बसलाय ?
आभाळ नाही कोसळलंय, मीच बोलतेय फक्त …
प्रेम आहे नि करतेही तुझ्यावर…म्हणूनच बोलतेय एवढं !
….
ए चल निघायला हवं….
उद्या भेटू
८:१७ ची दादर - ठाणे गाठायचीय
आईला शब्द दिलाय, वेळेत येईन असा ! "