Thursday, June 13, 2013

तो क्षण प्रेमाचा !

तो क्षण प्रेमाचा !

जिथं उच्छ्वास संपतो
नि श्वास सुरु होतो, तो क्षण प्रेमाचा !

जिथं दुःख संपतं
नि आनंद सुरु होतो, तो क्षण प्रेमाचा !

जिथं अपूर्णत्व संपतं
नि पूर्णत्व सुरु होतं, तो क्षण प्रेमाचा !

जिथं भूतकाळ संपतो
नि भविष्यकाळ सुरु होतो, तो क्षण प्रेमाचा !

जिथं पारतंत्र्य संपतं
नि स्वातंत्र्य सुरु होतं, तो क्षण प्रेमाचा !

जिथं एका गोष्टीची वाट पाहणं संपतं
नि दुसऱ्या गोष्टीची वाट पाहणं सुरु होतं, तो क्षण प्रेमाचा !




जिथं वासना संपते,
नि उपासना सुरु होते , तो क्षण प्रेमाचा !
हे सोडा,
अगदी सोप्पं सांगतो,

जिथं गर्भ संपतो,
नि विश्व सुरु होतं, तो क्षण प्रेमाचा !

माझ्या प्रेमाचा पिसारा

नाही विकारांचा वारा
नाही विचारांना थारा
आहे निशब्दांचा झरा
माझ्या प्रेमाचा पिसारा

नाही अभावही जरा
नाही भावाचाही तोरा
आहे निर्मळाचा झरा
माझ्या प्रेमाचा पिसारा

ना आनंदाचा दरारा
ना दुःखाचाही थरारा
आहे निश्चलाचा झरा
माझ्या प्रेमाचा पिसारा

नाही स्वप्नांचा डोलारा
नाही वास्तवाचा मारा
आहे निर्माणाचा झरा
माझ्या प्रेमाचा पिसारा

ना उणीवांचा उभारा
ना जाणिवांचा पहारा
आहे नेणीवांचा झरा
माझ्या प्रेमाचा पिसारा

हा शाश्वताचा गाभारा
हा चैतन्याचा निवारा
हा समाधानाचा झरा
माझ्या प्रेमाचा पिसारा

---- यम